काव्य रचनेतून चळवळीचे संवर्धन झाले आहे- प्रा. डॉ. रामदास नाईक नवरे

कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा आणि बोधिसत्व संत कबीर जयंतीच्या निमित्ताने युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आयोजित धम्मनिनाद काव्यसंमेलन संपन्न झाले. यामध्ये संमेलनाध्यक्ष मनोगतात बोलताना प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे म्हणाले, "मानवी भावना व्यक्त करण्यासाठी कविता हे एक माध्यम आहे, कवितेने अन्यायाला ही वाचा फोडली आहे असे इतिहास सांगतो, त्यामुळे कवितेने आंबेडकरी चळवळ संवर्धित केली आहे". सरांनी आपल्या स्वरचित कविता गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले. महोत्सवाची सुरुवात त्रिसरण आणि पंचशील मा. ज्योती डोंगरे आणि मा. अनिता गवळी यांच्यामार्फत सामूहिक ग्रहण करून झाली. प्रास्ताविकामध्ये प्रा. किरण भोसले यांनी कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा कशासाठी? याविषयी काही मुद्दे सांगितले. स्वागताध्यक्ष म्हणून सतीश भारतवासी यांनी भूमिका बजावली आणि मनोगत व्यक्त केले. संमेलनाध्यक्षांचा परिचय प्रा. सचिन कांबळे यांनी करून दिला. या महोत्सवाची सुरुवात 'चांदण्याची छाया, कापराची कायाl माऊलीची माया होता, माझा भिमराया" या सुंदर गीताने गायक मा. विकास कांबळे यांनी केली. या महोत्सवामध्ये माधुरी वसंत शोभा, गंगाभाऊ काकडे, किशोर दीपंकर, आम्रपाली पारवे, मंदा सोनताटे, नामदेव मोरे, रामहरी वरकले, संगीता रामटेके, संजय धांडे, प्रशांत कांबळे कोतोलीकर, सुरेश वडार, रवी माळापुडेकर, स्वप्निल गोरंबेकर, संदीप धनवडे, विजयकुमार चोपडे, प्रा. सचिन कांबळे, सतीश भारतवासी, प्रा. किरण भोसले इत्यादींनी स्वरचित काव्यवाचन, गायन केले. मा. वंदना कांबळे आणि संतोष भोसले यांनीही गीतगायन केले. शेवटी आभार आणि धम्मपालन गाथा मंदा सोनताटे यांनी व्यक्त केले. हा कृतीकार्यक्रम प्रत्येक पौर्णिमेला घेतला जाईल असे संयोजकांमार्फत आवाहन करण्यात आले आहे.