आ. यड्रावकर जातीयवादी कि मानवतावादी
आ. यड्रावकर जातीयवादी कि मानवतावादी
जयसिंगपूर (ता.शिरोळ) /प्रतिनिधी -
येत्या 29 मे 2023 रोजी सकल बहुजन समाज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समिती शिरोळ तालुक्याच्या वतीने बाबासाहेबांचा पुतळा सि.स.नं. 1251 या बंद कोर्टाच्या जागेतच व्हावा या आग्रही मागणीसाठी जयसिंगपूर नगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मागणीबाबत आमदारांची भूमिका काय ? याकडे आता संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. वास्तविक पाहता आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी ही जनतेची नसून आमदारांनीच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आंबेडकरांचा पुतळा जयसिंगपूरच्या मध्यभागी बसवणार असल्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची पुर्तता करावी ही मागणी जनतेमध्ये जोर धरू लागताच यातून दोन स्वयंघोषित समित्या स्थापन झाल्या. त्या म्हणजे सि.स.नं. 1251 ची म्युझियम समिती आणि दुसरी म्हणजे सि.स.नं. 1266 मुतारीच्या जागेची पुतळा समिती. विशेष म्हणजे या मुतारीच्या जागेच्या समितीचे अध्यक्ष आमदार स्वत: आहेत.
सि.स.नं. 1251 च्या समितीची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यासह म्युझियम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची होती. तर सि.स.नं. 1266 मुतारीच्या जागेच्या समितीची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यासंबंधीची होती. आमदारांनी या दोन समित्यांमध्ये समेट घडवून न आणता निव्वळ राजकारणासाठी दोन्ही समित्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि सि.स.नं. 1251 च्या समितीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा हा शब्द वगळून फक्त म्युझियम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी देण्यात आल्याचा ठराव देऊन खिंडीत गाठले. या समितीनेही आपली फसवणूक झाल्याचे माहित असूनही तसे न दाखवता फटाके वाजवून, साखर खाऊन त्यास मान्यता दिली. *या झालेल्या प्रकारावर आक्षेप नोंदवत काही तरूणांनी ‘एल्गार’ पुकारत बाबासाहेबांचा पुतळा सि.स.नं. 1251 च्याच जागेत बसणार असे ठणकाऊन सांगितल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा योग्य व पवित्र जागेतच बसविण्याच्या जनआंदोलनास सुरूवात झाली. तर दुसरीकडे सि.स.नं. 1266 मुतारीच्या जागेच्या समितीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याचा ठराव ही दिला. या दोन्ही ठरावाला जनतेने विरोध करताच आमदारांकडून दोन्ही समित्यांची मागणी मान्य करीत असल्याची उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. यड्रावकरांनी केलेल्या या जातियवादी राजकारणाला चॅलेंज देण्यासाठी सकल बहुजन समाजामार्फत दोन्ही स्वयंघोषीत लाचारवीरांच्या समित्या बारखास्त करण्यात आल्या.
मुतारीसारख्या जागेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवून आमदार कोणता पराक्रम गाजवणार आहेत याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. आमदारांनी फक्त जातीयवादाच्या मानसिकतेतून बाबासाहेबांचा पुतळा मुतारीसारख्या गलिच्छ जागेत बसवून विटंबना करण्याचा घाट घातला असेल तर याची भली मोठी किंमत आमदारांना मोजावी लागणार आहे. यापूर्वी याचप्रकारचे गलिच्छ, जातीयवादी राजकारण करणार्या मंत्र्याकडून बाबासाहेबांबद्दल अपशब्द निघाल्यानंतर त्याच्यावर काही भीमसैनिकांकडून शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर ‘फेस शिल्ड’ घालून फिरण्याची नाचक्की निर्माण झाली होती. आपल्या हातून घडलेल्या बेजबाबदार कृत्याबद्दल जाहीर माफी मागून मंत्र्याने विषय संपवला होता. याच घटनेचा संपूर्ण इतिहास लक्षात घेऊन आमदारांनी आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा. तसे न करता आमदारांनी मुतारीच्याच जागेत प्रख्यात पंडीत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवणार असल्याचा चंग बांधला असेल तर भविष्यात आमदारांना ‘बॉडी शिल्ड’ घालून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरावयास लागले तर काही नवल वाटायला नको.
बाबासाहेबांनीच दिलेल्या भारतीय संविधानाच्या जोरावर आमदार व मंत्री झालेल्या यड्रावकरांना त्यांच्यावर पडलेला जातीयवादाचा शिक्का जर का पुसायचा असेल तर मंत्री पदासाठी, आपली राजकीय सत्ता वाचवण्यासाठी ‘काय झाडी, काय डोंगार’ बघत गुवाहाटी व्हाया मुंबई चा मार्ग जसा निवडला तसाच सि.स.नं. 1251 याच जागेत आंबेडकरांचा पुतळा उभारावा यासाठी गुवाहाटी व्हाया मुंबईचा मार्ग धरून महामानवाचा यथोचित सन्मान करावा लागेल. तसेच आपल्या एका बेजबाबदार कृत्याने आंबेडकरी समाजाच्या अस्मितेशी न खेळता व एकाग्रही समाज मागणीचा विचार करून यड्रावकरांना आपण जातीयवादी आहोत की मानवतावादी हे सिद्ध करावे लागणार आहे.
0 Comments