आण्णाभाऊंचा पुतळा बसविला म्हणून पोलीसांकडून मातंग समाजावर लाठीचार्ज

नांदेड/प्रतिनिधी दि. 03 : 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामधील गौळ अंबुलगा या गावामध्ये लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा एक दिवसा आगोदर बसविण्यात आला होता. ज्या ठिकाणी हा पुतळा बसविण्यात आला त्या जागेचा नमुना नं. 8 मातंग समाजाच्या नावाने नोंद असून सदर जागेची कागदपत्रे मातंग समाजाकडे आहेत. 

गावातील जातीवादी मानसिकतेतून मनुवादी विचारसरणीच्या काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मातंग समाजाच्या विरोधात तक्रार देऊन तो पुतळा काढण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला आणि राजकीय दबावापोटी सदर डिव्हिजनचे डी.वाय.एस.पी. यांनी समस्त मातंग समाजावर लाठीचार्ज केला. घराघरात घुसून लोकांना बाहेर काढून मारहाण करण्यात आल्याचे समजते. 

दोन दिवसापूर्वी प्रशासकीय कार्यालयातील संबंधित अधिकारी व तहसिलदारांनी या गावास भेट देऊन आण्णाभाऊंच्या पुतळ्याची पाहणी केली असता यासंदर्भात कोणताच आक्षेप घेतला नव्हता आणि त्याच दिवशी हा विषय मार्गी सुध्दा लागला होता. परंतू आता पोलीस यंत्रणा राजकीय दबावास बळी पडल्याने पोलीसांकडून मातंग समाजावर भ्याड लाठी हल्ला करण्यात आला आहे. सदर मारहाणीमध्ये अनेक कार्यकर्ते व गावकरी जखमी झाले आहेत. 

पुरोगामी महाराष्ट्राला लोकशाहीर साहित्यसम्राट आण्णाभाऊंचा विसर पडलेला दिसतोय. या महामानवाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या साठी समस्त मराठी माणसात महाराष्ट्र बद्दल अस्मिता जागविण्याचे काम केले व अखेर मुंबईसह अखंड महाराष्ट्र घडवून आणला. शेतकर्‍याच्या, कष्टकर्‍याच्या, गिरणी कामगाराच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. अशा महापुरूषाचा विसर या पुरोगामी महाराष्ट्राला पडावा ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. 

    सदर ठिकाणची बातमी घेण्यासाठी  गेलेल्या एका पत्रकारासही जबर मारहाण केली आहे. यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच गावात घुसून लहान-मोठ्या, आबालवृद्धांना ही मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मिडीयाद्वारे समोर येत आहेत. या घटनेचा सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.