About Us
आपला भारत देश स्वतंत्र होऊन 73 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासाकडे पाहिल्यास आपणांस अगदी ठळकपणे दिसून येते की, येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक विषमता बळकट होत चालली आहे तर त्याची आजन्माची सोबती म्हणून दारिद्रयाची विषमता ही लख्ख भरलेल्या जनमाणसात गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे विचित्र वास्तव स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यातच जाती-जातीत आरक्षणावरून भडकवण्याचे कामसुध्दा अगदी कटाक्षाने काही मंडळींकडून सुरू आहे.
स्वतंत्र भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरीकास स्वाभिमानाने जगण्याचा, मुक्त श्वास घेण्याचा तसेच सुखी जीवन जगण्यासाठी लागणार्या सर्व सुख-सुविधा मिळविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला असतानादेखील त्यांना तो मिळत नाही किंबहुना त्यांना तो मिळू दिला जात नाही. तसेच या वाढत चाललेल्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक विषमतेबरोबरच जातीयवादाची मुळेसुध्दा बळकट होत चालली आहेत. मूळताच या सर्वांचा नायनाट करण्यासाठी व तमाम भारतीयांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी संविधानाची निर्मिती झाली. मात्र या संविधानालाच छेद देण्याचे काम प्रस्थापित व्यवस्थेकडून सुरू आहे. संविधानाची अंमलबजावणी तंतोतंत न करता सध्याचे तथाकथित प्रस्थापित मक्तेदार मंदिर बांधण्यात व विरोधकांना राष्ट्रभक्तीचे धडे सांगण्यात मग्न आहेत. स्वातंत्र्याचा व लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी काही प्रसारमाध्यमे मात्र या सर्व बाबींवर मुग गिळून गप्प बसल्याचे दिसत आहेत. विविधतेने नटलेल्या अनेक धर्माच्या या भारत देशामध्ये एकाच धर्माचा किंवा एकाधिकाराचा अजेंडा राबविण्यात हे लोक आपली धन्यता मानून रात्रंदिवस एक करीत आहेत.
सद्यस्थितीला होत असलेले वंचित घटकांवरील अन्याय-अत्याचारास वाचा फोडण्यासाठी, असा अन्याय भविष्यात होऊ नये यासाठी तसेच वंचित घटकाबरोबरच भारत देशातील तमाम भारतीयांची प्रगती व्हावी व भारत देश एकसंघ रहावा यावर विचार विनिमय सुचविण्यास वृत्तपत्राशिवाय दुसरा मार्गच असू शकत नाही.
आजपर्यंत स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर विविध चळवळी झाल्या. यामध्ये साहित्य आणि वृत्तपत्राचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. शासन-प्रशासनाप्रती जनतेमध्ये निर्माण झालेले नैराश्य दूर करण्यासाठी, समाज मनाचा आढावा घेण्यासाठी व जनतेमध्ये सकारात्मक चैतन्य निर्माण करण्याचे काम काही कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक पत्रकारितेने केलेले आहे. अशा प्रामाणिक पत्रकारितेचा वारसा चालवून जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.
लोकशाहीमध्ये लोकांची भूमिका महत्वाची असते. परंतु लोकांना आपले हक्क, अधिकाराची जाणिव नसल्याने किंवा आपले लोक राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असल्याने ते मानसिकदृष्ट्या गुलाम आहेत. बाबासाहेबांच्या विचारानुसार, ‘‘गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही !’’ हीच जाणिव करून देण्याचे काम यापुढे साप्ताहिक भीमयान करत राहिल. आपल्याकडून या वृत्तपत्रास प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता साप्ताहिक भीमयान आपले हे कार्य अविरत चालूच ठेवेल याची ग्वाही देतो...!
0 Comments