महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 10 ते 15 वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सन 2014 साली पायउतार होताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तथाकथित पुरोगामी सरकारने कोणतीही न्यायालयीन बाजू मजबूत न करता मराठा वोटबँकच्या दृष्टीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचे पुढे काय झाले हे आपणां सगळ्यांना ज्ञातच आहे. 

मराठा समाज हा राजकिय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बलाढ्य असलेला समाज म्हणून महाराष्ट्रात परिचीत होता. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजामध्ये दोन भाग निर्माण झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले. एक म्हणजे श्रीमंत मराठा आणि दुसरा गरीब मराठा. श्रीमंत मराठ्यांनी कोणतीही सामाजिक जाणीव न ठेवता ‘दि ग्रेट मराठा कार्ड खेळून’ राजकिय सत्तेत्तून आर्थिक व शैक्षणिक क्षेत्र घराणेशाहीत मर्यादित केले. यामुळे आपोआपच गरीब मराठ्यांचे राजकिय अस्तित्व संपूष्टात आल्याने आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती डबघाईस आली. हा आजवरचा आपल्या डोळ्यासमोरील इतिहास असताना देखील गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्यांनी निर्माण केलेल्या राजकिय अस्पृश्यतेविरोधात बंड पुकारताना दिसत नाही किंवा तो बंड पुकारू नये म्हणून त्यास इतरांना आरक्षणाच्या माध्यमातून मिळत असलेल्या सवलतींवर  टीका टिप्पणी करण्यास भाग पाडले जाते. जर का याआधी मराठा समाज हा आरक्षण देणारा होता तर त्याला आरक्षण मागण्याची वेळ का आली याची साधी उजळणी ही कोणी करताना दिसत नाही.

श्रीमंत मराठा वर्गाचे अस्तित्व हे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विषमतेवर अवलंबून आहे आणि ही विषमता ब्राम्हण्यवादी विचाराचे प्रतिक आहे. याच विचारसरणीला अनुसरून भटाबामणांनी शिवरायांना शुद्र हिनवून राज्याभिषेक नाकारला. लोकराजा शाहू महाराजांबद्दल खोट्या बातम्या पेरून बदनामी केली.  शाहू महाराजांचे लोकल्याणकारी अद्वितीय कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहचू नये म्हणून अस्पृश्यांचा राजा म्हणून मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर आणून त्यांची समाधी शोधली, समान हक्काचा पुरस्कार केला, सर्व जातीस शिक्षण खुले केल्याने त्यांच्यावर अनेक प्रकारे हल्ले करण्यात आले. 

आता हीच विचारसरणी जाती-जातीत भेदभाव, ताण-तणाव निर्माण करून आपले विष मिसळत असल्याने बहुजन समाजातील नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून ही ब्राम्हणवादी व्यवस्था नेहमी कार्यरत राहिली आहे. स्वातंत्र्य काळात बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला होता तसेच सध्याच्या काळात सुध्दा शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे असणारे रक्ताचे वारसदार, वैचारिक वारसदार यांचाही निवडणूकीवेळी पराभव केला जातो यावरून ब्राम्हणवादी व्यवस्थेचा असलेला पगडा किती मजबूत आहे हे दिसते. 

ही विषमता दूर करण्यासाठी प्रथमत: भटा-बामणांनी सांगितलेला इतिहास विसरून महात्मा फुलेंनी सांगितलेला इतिहास वाचवा लागेल. शिवरायांनी आठरापगड जातीला एकाच छताखाली घेऊन सर्व समाजाच्या न्याय-हक्कांसाठी, त्यांच्या सुख-सुविधेसाठी निर्माण केलेल्या स्वराज्याची ओळख करून स्वराज्याचा गाडा पुढे नेणार्‍या शाहू महाराजांचे कार्य समजून घ्यावे लागेल आणि याचाच वसा आणि वारसा स्वतंत्र भारताच्या संविधानात अबाधित ठेवणार्‍या बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात करावे लागणार आहे. 

मराठा व बहुजन ही दुफळी निर्माण करणार्‍या ब्राम्हण्यवादी राजकीय शक्तींविरोधात युध्द पुकारावे लागेल. शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांसह समाविष्ट असलेल्या बहुजन समाजास न्याय मिळवून देण्यासाठी एक नवीन राजकीय ताकद निर्माण करून "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य बहुजन समाजास अंमलात आणावे लागणार आहे.