पदोन्नतीसाठी कास्ट्राईबचे 25 जूनला राज्यभर आंदोलन

जयसिंगपूर/प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने ७ मे २०२१ रोजी अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे नोकरीतील पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे . आरक्षणानुसार त्यांना तात्काळ पदोन्नती मिळावी यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. ॲड.कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झालेल्य बैठकीत संपूर्ण राज्यात एकाच दिवशी महासंघाचे वतीने अंदोलन करणेबाबत निर्णय घेणेत आला .सदर बैठकीमध्ये महासंघाचे महासचीव मा नामदेवराव कांबळे , कार्याध्यक्ष रविंद्र पालवे , राज्य सरचिटणीस आकाश तांबे , जिल्हा अध्यक्ष गौतम वर्धन यांच्यासह विविध शाखेचे जिल्हा अध्यक्ष सहभागी झाले होते अशी माहिती राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी सांगितली .
राज्यात मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांची सुप्रीम कोर्टात पदोन्नती आरक्षणाबाबत विरोध अनुमती याचिका प्रलंबित असताना महाराष्ट्र शासनाने ७ मे २०२१ रोजी अध्यादेश काढुन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलले आहेत . हा अन्याय दुर करण्यासाठी कास्ट्राइब कर्मचारी महासंघाने पुढाकार घेतला आहे त्यास अनुसरून आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची २६ जून २०२१ रोजी जयंती आहे. सदर दिवशी मागासवर्गीय समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण बहाल केले आहे. हा दिवस "आरक्षण दिन" म्हणून साजरा केला जातो . छत्रपती शाहु महाराज यांच्या जंयती निमित्य औचित्य साधून मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे डावललेले नोकरीतील पदोन्नती मधील आरक्षणा संदर्भातील शासन निर्णय रद्द करून पुन्हा पदोन्नती मधील आरक्षण देणेबाबत सुधारित आदेश काढणेबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आग्रही आहे . त्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे वतीने शुक्रवार दि .२५ जुन२०२१ रोजी विभागीय आयुक्त , राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी व तहसिलदार यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा . ॲड .कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष गौतम वर्धन यांनी दिली .