सूर्याचा 'जय भीम' 


अभिनेता-निर्माता सूर्या आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्याने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याने आपल्या आगामी ‘जय भीम’ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे. जे पाहून त्याचे चाहते खूप आनंदित झाले आहेत. या चित्रपटात सूर्या वकीलच्या भूमिकेत दिसणार आहे. जो शोषित, पीडित, वंचित आणि आदिवासी समुदायाच्या हक्कांसाठी लढताना दिसणार आहे. साऊथ सुपस्टार सूर्याच्या या चित्रपटाची खास बाब म्हणजे तो त्यांचा 39 वा चित्रपट आहे. टी.एस. गणनवेल यांनी दिग्दर्शन व लेखन केले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आधी चेन्नईमध्ये जय भीमचे शूटिंग सुरू झाले होते. परंतु साथीच्या आजारामुळे ते थांबविण्यात आले. सूर्याने जय भीम चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर प्रदर्शित करताना त्यांनी लिहिले- जय भीमचा पहिला लुक शेअर करण्यास मला खूप आनंद झाला आहे. पोस्टरमध्ये सूर्या डॅशिंग लुकमध्ये दिसत आहे. त्याने काळा कोट घातला आहे. सोबतच वंचित समाजातील लोकांचा लढा लढताना दिसणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जय भीम हे टायटल पा रंजीत यांच्याकडे रजिस्टर होते परंतु सूर्याच्या मागणीवरून या आगामी चित्रपटासाठी त्याला निसंकोचपणे त्यांनी देऊ केले. जय भीममध्ये प्रकाश राज आणि रशिशा विजयन सूर्याबरोबर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमात अभिनय करण्याबरोबरच सूर्या त्याची निर्मिती देखील करणार आहे. हा चित्रपट त्याच्या प्रोडक्शन हाऊस 2 डी एन्टरटेन्मेंट अंतर्गत तयार करण्यात येत आहे. नेहमीच साऊथ चित्रपटांची कॉपी करणारे बॉलीवूड शोषित, पीडित, वंचित आणि आदिवासी समाजाची व्यथा मांडणाऱ्या चित्रपटांचे धडे गिरवणार का हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे
.