अन्याय-अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे

संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये जातीय अन्याय, अत्याचार वाढत चालला आहे. ऐकीकडे विकासाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक कट्टतरतावादी विचाराला बळ दिले जात आहे. तर महाराष्ट्रात सो-कॊल्ड पुरोगामीत्वाचा विचार मांडणारे शरद पवार हिंदूत्वाचा पुरस्कार करणार्‍या शिवसेनेबरोबर राजकीय विवाह करून राज्यात नांदत आहेत. देशाच्या या जडणघडणीत सामान्य नागरिक, कष्टकरी, अनु. जाती-जमाती, आदिवासी, अल्पसंख्यांकांच्या उत्थानाचा आलेख रसातळाला पोहोचत आहे. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी तीन त्रिकुटांनी संगनमत करून सत्ता हस्तगत तर केली पण या सत्तेच्या हव्यासापोटी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घातलेली काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळ्या विचारांच्या मातीत जन्मलेली राष्ट्रवादी यांचा खरा चेहरा आता हळहळू उघडकीस येत आहे. भाजपकडून देशात गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत कट्टर हिंदूत्वाचे मैदान जरी तयार केलेे गेले असले तरी त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम वरून फुल पॅन्ट आणि आतून हाफ खाकी चड्डी घालणार्‍या या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वयंसेवकांनी इमानेइतबारे सुरू केले आहे. 

दररोज उघडकीस येणार्‍या अन्यायाच्या, अत्याचाराच्या, बलात्काराच्या आणि विशेष करून अनु. जाती-जमातीच्या समूहावर होणार्‍या जातीय अत्याचाराच्या बातम्या आता नव्याने जोर धरू लागल्या आहेत. अनु. जाती - जमातीतील समूहाने काबाड कष्ट करून मिळवलेल्या स्वत:च्या मालकी हक्काच्या घरावर मनुवाद्यांकडून जे.सी.बी. फिरवला जात आहे, जादूटोणा करण्याच्या नावाखाली लोकांना भर चौकात डांबून जनावरासारखे मारले जात आहे. तर दुसरीकडे शासनाच्या माध्यमातून अनु. जाती-जमाती, अल्पसंख्याक आणि आदिवासींची शैक्षणिक नाकेबंदी करण्यासाठी संवैधानिकरित्या मिळणारे अनुदानही बंद केले जात आहे. अशाचप्रकारे मुस्लिम समाजाला लव जिहाद, गाईची कत्तल, धर्मांतर आणि आतंकवादाचे पोषक ठरवून मारले जात आहे. दररोज होणार्‍या या अन्याय, अत्याचारावर हा समूह मात्र अर्धांगवायू झाल्यासारखा शांत बसला आहे. प्रत्येकवेळी आमच्याच जातीने किंवा समाजानेच का रस्त्यावर उतरायचे आणि इतरांशी वैर का पत्करायचे असा सवाल काही सडलेल्या मेंदूंमधून बाहेर पडत आहे. 

या संकुचित विचाराला उत्तर म्हणून बाबासाहेबांच्या भाषणातील काही विचार आपणां समोर मांडत आहे तो असा, ‘महार लोक हे बहुसंख्यांक आहेत. कोणी काही म्हटले तरी त्यांचे कर्तव्य उघड आहे. इतर अल्पसंख्यांक जातींचे जेणेकरून समाधान होईल तेच धोरण आपण अखेरपर्यंत कायम ठेविले पाहिजे. निष्कारण दोषारोप करणार्‍या लोकांना याच धोरणाची कास धरून आपण समर्पक उत्तर देऊ शकतो. अस्पृश्यात भांडणे लागावी व महाराविरूध्द चांभाराला उभे करून आपल्या कार्याचा नाश करावा व आपल्याकडे बोटे दाखवून आपल्याला हिणवावे हा तर आपल्या हितशत्रूंचा एक डावच आहे. तो आपण हाणून पाडला पाहिजे. बहुसंख्य समाज या नात्याने ही जबाबदारी महार वर्गावरच अधिक व प्रामुख्याने पडते व त्यांनी ती सांभाळलीच पाहिजे असे महार समाजाला माझे वारंवार निक्षून सांगणे आहे.’ असे बाबासाहेब सांगतात तर दुसर्‍या एका भाषणात एक किस्सा सांगत म्हणतात ‘आज सकाळी एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्हाला सर्वस्वी स्पृश्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आम्ही जर त्यांच्याविरूध्द काही तक्रार केली तर ती तक्रार देखील ऐकून घेण्याला स्पृश्य अधिकारी तयार नसतो तेव्हा या गोष्टीला आम्ही काय करावे. तेव्हा मी म्हणतो, हे जरी खरे असले तरी मी तुम्हाला असे विचारतो की, शेळी होऊन अशा प्रकारचे आयुष्य किती दिवस आणखी कंठणार? कधी ना कधी तरी अन्यायाविरूध्द तोंड काढावे लागणार नाही काय? आपण जर या अन्याचा प्रतिबंधच केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय? मी तुम्हासमोर कोट, बूट, पाटलोण घालून उभा आहे. माझ्या हातात सोन्याने घड्याळ आहे. मी स्वच्छ आहे. मला महार म्हणण्याची कोणाची ताकद आहे काय? तरी पण मी महार आहे. ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मी जर कच खाल्ली असती तर ही स्थिती प्राप्त झाली असती का? माझ्या हातात सोन्याचे घड्याळ दिसते ते दिसले असते काय? तेव्हा सांगण्याचा मतलब हा की, अन्यायाच्या विरूध्द तुम्ही लोकांनी ‘जशास तसेच’ या न्यायाने प्रतिकार करायला शिकले पाहिजे. कर्तव्याला जागरूक रहा. तेव्हा मला तुम्हाला शेवटी इतकेच सांगावयाचे आहे की, यापुढचा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे. त्या करता आपण आपली तयारी भक्कम पायावर केली पाहिजे.’’

बाबासाहेबांनी सांगितलेले हे विचार अंगीकारून सडलेल्या मेंदूला पुन्हा एकदा ऊर्जा दिली पाहिजे आणि राजेरोसपणे होणार्‍या अन्याय-अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे.