नांदणी शाखेला क्लार्क द्या : नागरिकांतून मागणी

नांदणी/प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि. कोल्हापूर शाखा नांदणी येथे एकच क्लार्क असून सर्व कामाचा बोजा एकाच व्यक्तीवर पडत असल्यामुळे नांदणी परिसरातून वाढीव क्लार्कची मागणी होत आहे. 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि. कोल्हापूर शाखा नांदणी ही ठेवीकरिता एक नंबर वर असून त्या करिता गावकर्‍यांनी कौतुक सत्कार ही केला आहे. नांदणी गाव पंचक्रोशीत मोठे असून महसूल ही येथे मोठा प्राप्त होतो. जवळपासची सर्व गावे नांदणी बाजारपेठेकरिता जोडलेली आहेत. शेतकरी वर्ग आणि मोठ्याप्रमाणात येथे संस्था असल्यामुळे ठेवींची संख्याही मोठी आहे. नदी काठचा भाग असल्यामुळे सधन भाग म्हणून नांदणीची पंचक्रोशी ओळख आहे. या सर्व ठेवी नांदणी शाखेमध्ये जमा केल्या जातात. तसेच इतर सर्व व्यवहारही या बँकेमध्ये केले जात असल्यामुळे नागरिकांचा व्यवहार वेळेवर पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र शाखेकडे एकच क्लार्क असल्यामुळे कामाचा ताण एकाच व्यक्तीवर पडत आहे. या आधी या शाखेकडे दोन क्लार्क होते मात्र बदली झाल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. रिक्त जागी क्लार्क मिळावा आणि सर्व व्यवहार सुरळीत पार पडावेत याकरिता नागरिकांतून क्लार्कची मागणी होत आहे.