समाज मंदिरांचा असामाजिक वापर...?
समाज मंदिरांचा असामाजिक वापर...?
अनुसूचित जातीच्या लोकांना सार्वजनिक सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबवता यावेत या उदेशाने प्रत्येक गावात शासकीय योजनेतून लाखो रुपये खर्च करून समाजमंदिर उभारण्यात आली आहेत. मात्र काही समाजमंंदिराचा वापर सामाजिक कार्यासाठी न होता असामाजिक कारणांसाठी बिनबोभाट केला जात असल्याने, सुसंस्कृत नागरिकांतून खंत व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला या समाजमंदिराचा उपयोग सामाजिक चळवळीसाठी केला गेला. डॊ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवजयंती, शाहूराजे जयंती, तसेच लग्न, साखरपुडा, पक्षाच्या बैठका, समाजाच्या अंतर्गत बैठका व बचत गटांच्या चळवळी या समाज मंदिरातूनच उदयास आल्या... उभ्या राहिल्या... आणि रुजल्या...! समाजात घडत असलेल्या अनेक घडामोडीचे केंद्रस्थान म्हणून समाज मंदिराकडे पाहिले जात होते. अनेक चांगल्या कामाचा शुभारंभ या समाज मंदिरातूनच झाला. समाज मंदिरातच अनेक बरे वाईट निर्णय घेण्यात आले. समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी या समाज मंदिरातूनच समतेचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा नारा देण्यासाठी समाजातील आबालवृद्ध एकत्र येऊन आवाज उठवत असत. या समाज मंदिरातच डॊ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक ग्रंथांचे वाचन, संविधानाचे वाचन, बुद्ध धर्मातील अनेक ग्रंथांचे वाचन, मनन आणि चिंतन केले जात होते. राजकीय, सामाजिक, चर्चा येथेच रंगल्या जात होत्या. या समाज मंदिरातच विद्यार्थी शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शनासाठी एकत्र येत होते. या समाज मंदिरातच महिलांच्या अनेक चळवळी आणि होणार्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी संघटन केले जात होतं. या समाज मंदिरातच डॊ.आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, शिव, शाहू, फुले यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जात होती. याच समाज मंदिरात अभ्यास करून समाजातील अनेक तरुण आज डॊक्टर, इंजिनिअर, वकील, प्रशासकीय अधिकारी, होऊन वरिष्ठ पदावरती पोहोचलेले आहेत.
मात्र काळ बदलेलं तसा या समाज मंदिराचा वापरही बदलत चाललेला आहे. काही गावातील मोजक्या समाज मंदिरात आता शैक्षणिक विषयावरती चर्चा होण्या ऐवजी, काही व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण दिवसभर या मंदिरात वरच्या पातळीवर वाद विवाद करताना दिसतात. कामधंदा सोडून काही तरुण मोबाईल वरील दिडजीबी डेटा खर्च होईपर्यंत सामाज मंदिरात रेंगाळतात हे वास्तव आहे. कहर म्हणजे काही गावातील समाज मंदिराचा वापर तर पूर्ण दिवसभर अनेक बेकार तरुण तीन पानी जुगाराचा क्लब म्हणून करताना दिसतं आहेत...? आहेत हे दुर्दैवी म्हणावे लागेल.
काही गावात तर समाज मंदिराचा वापर जनावरांचा गोटा म्हणूनच केला जात आहे, असे सांगितले तर अतिशयोक्ती वाटेल..? मात्र हे सत्य नाकारता येणार नाही कारण गाय, म्हैस, शेळी, बकरी बांधणे यासाठी ही समाजमंदिर असतात असा काहीजणांच्या व्होरा असावा. समाज मंदिरात असणार्या तथागत गौतम बुद्ध, डॊ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुर्त्या, पुतळे, प्रतिमा केवळ जयंती आणि पुण्यतिथी निमित्तानेच साफ करायचे असतात असा समज, समाज बांधवांचा असावा..? त्यामुळे या मूर्त्यांच्या वर वर्षभर धूर, धूळ आणि गंज चढला तरी लक्ष दिले जात नाही, मात्र जयंती, पुण्यतिथी निमित्य इमानईतबारे या प्रतिमा साफ करण्याचे सोपस्कार पार पाडले जाते हे खेदजनक आहे. समाज मंदिराच्या भिंतीवरती सुविचार, सुभाषिते ऐतिहासिक चित्रे असावीत अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. मात्र या ऐवजी भिंतीवर कोळ्यांची जाळी, ओरखडे, रेघोट्या आणि मावा, गुटका, तंबाखू यांच्या पिचकार्या बघून समाजमंदिरात प्रसन्न वाटण्याऐवजी विद्रुप वाटले नाही तर नवलच म्हणावे लागेल. समाज मंदिरातील सार्वजनिक साहित्याचा वापर वैयक्तिक कारणांसाठी करायचा असतो असा समज काहीजणांचा असावा..? मंदिरातील सार्वजनिक भांडी, लाईट, फर्निचर हे सार्वजनिक न राहता वैयक्तिक वापरासाठी कामी आणले जात आहे. समाज मंदिरातून ‘बुद्धम् शरणम् गच्छामिचे’ सूर ऐकू येणे अपेक्षित आहे मात्र त्याऐवजी चित्रविचित्र व्हिडिओ..? आणि कर्णकर्कश गाण्यांचे ध्वनी...? ऐकायला हमखास मिळतील. शेवटी ज्या उद्देशाने समाज मंदिराची निर्मिती झाली तो उद्देशच फोल ठरत आहे याचे वैषम्य वाटते. समाज एकत्र यावा...! आणि अन्याय, अत्याचार आणि दुराचार याला वाचा फुटावी, म्हणून समाज मंदिराची संकल्पना अस्तित्वात आली होती. मात्र तिलाच हरताळ फासला जात आहे, हे समाजाचे दुर्दैव आहे.
बहुतांश समाज मंदिरात आजही अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून समाज मंदिराचा उपयोग होत आहे. मात्र काही ठराविक गावातील समाजाच्या अनुचित वर्तनामुळे समाज मंदिरांची अवहेलना व बदनामी होत आहे. हे थांबून समाज मंदिर म्हणजे संस्कारक्षम केंद्र बनून चळवळीचे उगमस्थान ठरावे अशी माफक अपेक्षा आहे.
0 Comments