महाराष्ट्र राज्यात दररोज दलितांना मारले जात आहे. जालना येथे जातीयवादी गावगुंडांनी पंधरा वर्षाच्या निष्पाप अनिकेत घुगे या बौध्द तरूणाची हत्या केली आहे. तरी आपण जातीवादी गावगुंडांना अटक करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश द्यावेत व पीडित कुटुंबियांना तात्काळ वीस लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी पँथर सेनेचे विदर्भ अध्यक्ष संकेत जगताप यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.




पुरोगामीत्वाचा मुखवटा घातलेल्या महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे काही दिवसांपूर्वी जातीयवादी हत्याकांड घडले होते. अनिकेत भाऊसाहेब घुगे वय 15 वर्षे असे या अल्पवयीन मुलाचे नांव असून दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणूक रॅलीतून तो गायब झाला होता. त्यानंतर चार दिवसांनी रात्री 11 च्या सुमारास गावाच्या बाजूला असणार्‍या ऊसाच्या शेतामध्ये त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. या अमानुषपणे घडवलेल्या जातीयवादी हत्याकांडाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटत असून बौध्द तरूणाची हत्या करणार्‍या जातीयवादी नराधमांना अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.