14 एप्रिल 2021 रोजी संपूर्ण जगभरात डॊ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थटामाटात, नाचगाण्याच, ग्लॅमरसरूपात साजरी केली जात असली तरी या उत्सवाच्या नादात बाबासाहेबांच्या विचारांना मुठमाती देण्याचे काम दुसर्‍या-तिसर्‍या कोणाकडून केले जात नसून आपल्यासारख्या सुशिक्षित, क्षणिक सुखसाधू समाजाकडून केली जात आहे. हे आपण आजवर केलेल्या आपल्या कार्यातूनच निदर्शनास येत आहे.

बाबासाहेबांनी सांगितलेल्या स्वाभिमान, राजकीय हक्क आणि शिक्षण या त्रिसुत्राचे अनुकरण न करता बाकी सर्व नाहक गोष्टी करण्यात मग्न असल्याचीच विदारक परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाली आहे. यातच भर म्हणजे बौध्द संस्कृतीचा पगड मजबूत न होता उलट हिंदू धर्माच्याच गटारीत अंघोळ करण्याची सवय समाजाला लागली आहे. एखादा गणपती उत्सव येतो त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या जयंतीला उत्सव देण्याचे काम काही मंडळींकडून वर्षानुवर्षे सुरू असून हा उत्सव दारू पिऊन नाचणे, डी.जे. वाजवून वरात काढण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे. समाजातील तरूणांना नाचगाण्याच्या जाळ्यात अडकवून बाबासाहेबांच्या विचारांची होळी दरवर्षी या माध्यमातून केली जात आहे. हजारो वर्षे मनुस्मृतीने अस्पृश्यांवर लादलेली गुलामी बाबासाहेबांनी संविधानामार्फत कायमची मोडून अस्पृश्यांमध्ये स्वाभिमान जागा केला. भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किती महत्व आहे याची जाणीव करून दिली. या मौलिक विचारांची तमा न बाळगता काही मंडळींनी स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी समाजाला शत्रुच्या दावणीला बांधण्याचेच काम केले. अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्कांसाठी एका माणसाला एका युगात जे काही करता येणे शक्य होते ते बाबासाहेबांनी करून राजकीय हक्क मिळवून दिले. या राजकीय हक्काचा फायदा समाजाच्या हितासाठी न करता त्यासाठी न झगडता आपल्या तलवारी म्यान करून शत्रुच्या गोटात सामिल झाल्याचे किंबहुना जे मिळेल त्यात धन्यता मानून समाजाचा विश्‍वासघात केल्याचेच काम काही पुढारींकडे बघितल्यास तंतोतंत जाणवते. 

अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी अस्पृशांना शिक्षणाशिवाय तोरणापाय नाही हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला. या शिक्षणाचा फायदा समाजातील अशिक्षित बांधवांसाठी शिक्षित व्यक्तीने करावा हे सांगून सुध्दा आज समाजातील हीच सुशिक्षीत व्हाईट कॊलर मंडळी (काही अपवाद वगळून) चांगल्या पगाराची नोकरी मिळताच देखणी बायको आणि आपल्या पोराबाळात अडकून समाजाचे काही देणे-घेणे नसल्यासारखे वागताना सर्रास दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीत भारताची राजकीय सत्ता ही कट्टर हिंदूत्ववादी असणार्‍या भाजपकडे असून या बहुमत असलेल्या सरकारकडून दरवेळी नविन कायदे करून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. विशेषत: शोषित, पिडीत, वंचित समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक नाकेबंदी करण्याची व्युहरचना अंमलात आणली जात आहे. जातीय अत्याचाराच्या संख्येने उच्चांकी गाठली आहे. सर्व सरकारी क्षेत्रांचे खाजगीकरण करण्याचा धडाका या मनुवादी करकारने लावल्याने नोकरी मिळणेसुध्दा मुश्किल झाले आहे. ज्यांना यापूर्वी मिळाली त्यांची मात्र आता या नोकरीतून हकालपट्टी होत आहे. आपल्या नालायकपणामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीकडे पाहता असाच प्रश्‍न पडतो की, यासाठीच का अस्पृश्यांसाठी बाबासाहेबांनी स्वत:चे संपूर्ण आयुष्य फूकट खर्ची घातले का? या व अशा आजवर केलेल्या नाकर्तेपणामुळे सध्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठ्या अडचणींना आपणांस सामोरे जावे लागत आहे. जर का आपणांस बाबासाहेबांनी आपल्याच उन्नतीसाठी लावलेले झाड तोडून टाकायचे नसेल तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या स्वाभिमान, राजकीय हक्क व शिक्षण या त्रिसुत्राचे तंतोतंत पालन करावे लागेल. स्वत:चा स्वाभिमान जागा करून निस्वार्थीपणाने काम केले पाहिजे. जर का राजकीय, सामाजिक व शैक्षणिक हक्क मिळत नसतील तर ते मिळविण्यासाठी आपआपसातील पोकळ मतभेद विसरून एकत्र यावे लागेल व आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागेल. पुढील पिढीसाठी हा मार्ग खडतर न करता तो सोयीस्कर व सुखाचा करावा लागेल. या वर्षानुवर्षे चालत असलेल्या उत्सवाचे रूपांतर बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांच्या निर्धारात करावे लागेल, हीच खरी मानवंदना बाबासाहेबांना शाबित होणार आहे.