मनुवादी वृत्तींविरोधात संघर्ष करावा लागेल..!

सन 2014 सालापासून मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यापासून देशाची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या हजारो वर्षापासून चालत आलेली सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी भारतीय संविधानाने ज्या सुख-सुविधा, कायदे निर्माण केले त्याला तिलांजली देऊन देशात नविन कायदे आणले जात आहेत. देशाची प्रगती न करता सारा देश कसा धर्मा-धर्मात, जाती-जातीत विखुरला जाईल व कशाप्रकारे जातीय विष समाजामध्ये पसरेल अशीच काहीशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. 

नागरिक हक्क, सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करणे तसेच कोणत्याही धर्माची निवड करण्याचा हक्क त्यास अबाधीत ठेवणे हे कोणत्याही लोकशाही प्रधान देशाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. मात्र या भारत देशामध्ये असे होताना दिसून येत नाही. प्रत्येक स्तरावर जातीय द्वेष मजबूत होत चालला आहे. हजारो वर्षापासून सुरू असलेला जातीय द्वेष आज सुध्दा देशाच्या काना-कोपर्‍यात आपले ठाण मांडून आहे. या कोरोनाच्या काळातसुध्दा जातीय अत्याचाराच्या घटना दररोज सुरूच आहेत. विशेषत: स्वत:ला पुरोगामी म्हणणार्‍या महाराष्ट्रातसुध्दा दररोज प्रत्येक जिल्ह्यात मागासवर्गीय व्यक्तीवर अत्याचार होत आहेत. जीवंत माणसांना मारले जात आहे तर मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करून स्मशानभूमी बाटू नये या भामट्या मनुवादी विचारातून मृतदेहाची अवहेलना केली जात आहे.

मागासवर्गीय स्त्रीयांवर दररोज विनयभंग, बलात्काराच्या घटना घडत आहेत. आठवड्यातील पाच दिवसात मागासवर्गीय समाजावर अत्याचार होत आहेत ही सर्व माहिती माहितीच्या अधिकारात उघडकीस येत असेल तर इतक्या वर्षात या देशावर राज्य करणार्‍या सरकारने कोरोना काळात जशी तत्परता दाखवून यंत्रणा उभी केली तशी जातीय अत्याचार रोखण्यासाठी यंत्रणा आजपर्यंत उभी का केली नाही हा देखील प्रश्‍न यावेळी उपस्थित होत आहे. या कोरोनाच्या काळात जो कोविडबाधीत मृतांवर अंत्यसंस्कार करतो तो मागासवर्गीय असणारा सफाई कर्मचारी ही या जातीयवादी विचारसणीचा बळी ठरला असून तो फक्त कोविडबाधीत मृतांचे दहन करतो म्हणून त्याला बहिष्कृत केले जात आहे, त्याच्याशी संवाद तोडला जात आहे असे भयावह वास्तव आज भारतीय समाजामध्ये पहावयास मिळत आहे.

अशा विचित्र परिस्थितीत भारत देश येऊन ठेपला असताना मेन स्ट्रिम मिडीया याकडे लक्ष न देता स्वप्नांच्या दुनियेत संपूर्ण देशाला घेऊन जाण्याचा प्रयत्न राजेरोसपणे करताना दिसत आहे. मुळ प्रश्‍नांना बगल देऊन भंपक, खोट्या बातम्या डंके की चोटपर केल्या जात आहेत. गेली 7 वर्षे भाजपने केलेल्या कामांचा फायदा भारत देशातील कोणत्या व्यक्तीस झाला हे सांगण्याऐवजी कोरोना काळात मोदींची झालेली कुचकामी प्रतिमा सुधारण्यासाठी मोदींचे गुणगाण आणि त्यांची राष्ट्रभक्ती, कोरोना काळातील पॅकेज याची बातमी कम जाहिरात सध्या सर्व मिडीयामध्ये सुरू आहे. वास्तवीक पाहता हिटलरने ’अधिकार, तर्क आणि भावना’  या त्रिसुत्राचा वापर करून जशी लोकप्रियता मिळवली त्याच त्रिसुत्राचा वापर करून मोदींनी या देशात खोट्या बातम्या, लोकशाही प्रधान देशामध्ये भंपक धार्मिक कट्टरवादाला खतपाणी घालून सत्ता काबीज केली याचा भांडा फोड जर आपणांस करायचा असेल तर सामाजिक समानता, आर्थिक विषमता नष्ट करण्याचा व सर्व नागरिकांस समान जगण्याचा अधिकार पुन्हा या देशात प्रस्थापित करायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिका, चेतवा आणि संघटीत व्हा’’ (Educate, Agitate & Organize) या त्रिसुत्राचा अवलंब करावा लागेल व सर्व समाजामध्ये आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल चिड उत्पन्न करून, त्यांना संघटीत करून या मनुवादी वृत्तींविरोधात संघर्ष करावा लागेल.