आगळगाव प्रकरण: अँट्रॉसिटी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक नाही


पिडीत कुटुंबाचे दि.१७ रोजी पुन्हा आंदोलनचा इशारा,  विविध आंबेडकरी संघटना सहभागी होणार, १२ दिवस झाले तरी आरोपींना अटक झालेली नाही

सांगली दि.११ : 

आगळगाव तालुका कवठेमहांकाळ येथील पिडीत महिला मंगल कांबळे हिने तिचे राहते घर जेसीबीच्या सहाय्याने उद्वस्त केल्याने दि. ३१ ऑगस्ट रोजी आरोपी विजय माळी, शोभा माळी व इतर ४ ते ५ अनोळखी लोकांवर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांना २२ दिवसांचा संघर्ष करावा लागला. तथापि गुन्हा दाखल होऊन १२ दिवस झाले तरी आरोपींना अटक झालेली नाही, २४ तासाच्या आत आरोपींना अटक करून कायद्यानुसार कोर्टात हजर करणे बंधनकारक आहे, पण तसे झालेले नाही. पंचनामा व पोलीस तपास याचे विडीओ रेकोर्डिंग होणे अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत गरजेचे आहे पण तसे करण्यात आले नाही. पिडीत महिलेनी घरपट्टी व इतर शासन कराच्या पावत्या कागदपत्रे पोलिसांना सादर केलेले आहेत.  पंचानामातील पंच देखील पिडीत व्यक्तीच्या परिचयाचे नाही, पोलिसांनी सरकारी नोकरी करणारे पंच म्हणून घ्यावे जेणेकरून भविष्यात ते फितूर होणार नाहीत, यासोबत पिडीत व्यक्तीचा जबाब नोंदविताना २२ दिवसाचा विलंबा बाबत स्पष्टीकरण नोंदविलेले नाही, तपासात अनेक त्रुटी दिसून येत आहेत, आजही जेसीबी जप्त करण्यात आलेला नाही. यामुळे भविष्यात आरोपींना याचा फायदा होईल, या अशा त्रुटीमुळे अँट्रॉसिटीच्या खटल्यात शिक्षेचे प्रमाण कमी होत असते, असे रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम म्हणाले. 

सदर गुन्ह्याचा तपास जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले हे करत आहेत. या त्रुटी बाबत तसेच कवठेमहांकाळ तलाठी कार्यालय कडून बोगस नोंदी, कर्त्यव्यात कसूर कामी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यावर कारवाईची मागणी पिडीत कुटुंब यांच्यासह रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेना सांगली जिल्हा अध्यक्ष भूपेंद्र कांबळे, युवा आघाडी अध्यक्ष स्वप्नील खांडेकर, महासचिव विकी वाघमारे, जत तालुका अध्यक्ष अमर कांबळे, उपाध्यक्ष गिरीश सर्जे आदींनी पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करून केले आहे. 

 मागण्या: 

१) प्रथम दर्शनी गुन्हा झाल्याचे दिसून येते यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.  अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन १२ दिवस झाले तरी आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही, त्यांना तत्काळ अटक करण्यात यावे. या कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत अटक करून कोर्टात हजर करणे बंधनकारक आहे परंतु तपासी पोलीस अधिकारी यांनी हे केलेले नाही, उलट पोलीस हे फिर्यादी यांना आरोपी हा सापडत नसल्याचे तोंडी सांगत आहेत. याचा निषेध आम्ही करतो.

२) सदर प्रकरणात विजय माळी सह इतर लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात मंगल कांबळे यांच्या सातबारा उताऱ्याच्या नोंदीमध्ये बोगस नोंदी केल्या असल्याची प्राथमिक शंका कांबळे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. महसूल विभागाकडून पोलिसांनी या अँगलने तपास केल्यास या विभागातील काही लोकांचे कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित महसुली कागदपत्रात हेराफेरी, बोगस नोंदी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वर देखील ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सदर आरोपीला तात्काळ अटक करावी.

३) अँट्रॉसिटी कायद्यातील कलम ४ प्रमाणे कर्त्यव्यात कसूर कामी व आरोपींना उघडपणे पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याने पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक करा.

४) मुळातच दि. ०८ ऑगस्ट ते ३१ पर्यंत याबाबत पिडीत कुटुंबांनी वेळोवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी यांना लेखी दाद मागितली आहे, परंतु याबाबत त्यांची फिर्याद नोंदवत असताना मात्र याबाबत या २२ दिवसांच्या विलंबाची कारणे कवठेमहांकाळ पोलिसांनी फिर्याद नोंदवता वेळी नमूद केलेली नाहीत , ज्यामुळे भविष्यात याचा आरोपींना फायदा होईल. 

५) आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने पिडीत कुटुंबियांचे घर उद्वस्त केले आहे, याबाबत जेसीबी आजही जप्त केलेला नाही.

६) सदर घटनेचा पंचनामा करते वेळी पिडीत कुटुंबातील पंच म्हणून कोणीही नव्हते, तसेच ते पंच पिडीत व्यक्तींच्या ओळखीचे नाहीत असे पिडीत कुटुंब सांगत आहेत, त्यामुळे पंच म्हणून सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी घेऊन पंचनामा करण्यात यावा जेणेकरून भविष्यात ते फितूर होणार नाहीत.

७) अँट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी प्रमाणे व शासनाने वेळोवेळी निर्गत केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सदर अँट्रॉसिटीचा तपास, पंचनामा तसेच गुन्हा नोंदकरतेवेळी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांचे जाब-जबाब  व इतर तपास विडीओ रेकोर्डिंग करणे कायद्याने बंधनकारक आहे. तसे आपण केलेले नाही.

८) Chapter IV-A (15 A Rights of Victims and Witnesses) यामधील कलम १ आणि ११ (b), (c), (d) ,(h), (k) नुसार  पीडित कुटुंबाचे राहते घर आरोपींनी उध्वस्त केल्याने त्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे, पिडीताना तात्काळ आर्थिक मदत मंजूर करा, पिडीत कुटुंब व साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्या, भविष्यात पिडीत कुटुंबियांवर व त्यांना मदत करणाऱ्या संघटनेतील पदाधिकारी यांच्यावर आरोपीं व पोलिसांमार्फत खोटे गुन्हे दाखल होण्याची संभावना आहे यातून दबाव आणण्याची शक्यात आहे, याकरिता पोलिसांनी योग्य ती दक्षता घ्यावी, 

९) Section 18 of SC ST POA Act 1989, Amended Act 2016 नुसार आरोपींना जामीन मिळू नये याकरिता जिल्हा सरकारी वकील, तपासी पोलीस अधिकारी व प्रशासनाने लक्ष द्यावे

१०) Chapter IV-A (15 A Rights of Victims and Witnesses) यामधील कलम ३, ४, ५ प्रमाणे आरोपींनी अटक पूर्व जामीन अथवा जामीनसाठी अर्ज केल्यानंतर तत्काळ मूळ फिर्यादी मंगल नामदेव कांबळे यांना लेखी कळविण्यात यावे.

११) जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती मार्फत या घटनेचा तत्काळ आढावा घेण्यात यावा.

१२) सीआरपीसी १६४ प्रमाणे फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाब नोंदविणे कामी में.कोर्टाकडे पाठविण्याचे तजवीज व्हावी.

अशी मागणी देखील पिडीत कुटुंबातील मंगल कांबळे, वर्षा कांबळे यांच्यासह रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेना सांगली जिल्हा अध्यक्ष भूपेंद्र कांबळे, युवा आघाडी अध्यक्ष स्वप्नील खांडेकर, महासचिव विकी वाघमारे, जत तालुका अध्यक्ष अमर कांबळे, उपाध्यक्ष गिरीश सर्जे आदींनी पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, अनुसूचित जाती आयोग, नागरी हक्क संरक्षण समिती यांना निवेदन सादर करून केले आहे.