समता सैनिक दलाचे सैनिक व्हा !
गेल्या काही वर्षामध्ये दिवसेंदिवस शोषित, पिडीत, वंचित, मुस्लिम समाजावर जातीय हल्ले वाढत चालले आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्याचे शस्त्र म्हणजे आंदोलन करणे, गांव, शहर, जिल्हा, महाराष्ट्र बंद करणे हाच पर्याय असल्याचा समज आज या समाजामध्ये झाल्याचा दिसून येत आहे.
डॊ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1926-27 च्या समारास समता सैनिक दलाची स्थापना महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने केली. त्यावेळी महाडच्या सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी अशा संघटित दलाची फारच आवश्यकता होती. स्थापन केलेल्या या समता सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व एकंदर परिस्थितीचा विचार करता दलाची स्थापना भारतात जे अनेक धर्मीय समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्यांचा समावेश होत असल्यामुळे आणि या हिंदू समाजातील स्पृश्य लोकांकडून अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवांवर होणार्या अन्याय, जोर - जुलूम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि घातुक प्रकारांना आळा बसविण्याकरीता या समता सैनिक दलाची प्रामुख्याने स्थापना करण्यात आली. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही, नैसर्गिक हक्कांचा जिथे समतेने उपभोग घेता येत नाही, ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे तो धर्म झुगारून देऊन खरी माणूसकी जाणणारा धर्म निर्माण करण्यासाठी जे कार्य करावे लागेल त्या पवित्र आणि उज्वल कार्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली होती. या कार्याची मुहूर्तमेढ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करून सत्याग्रहाचा लढा विजयी केलेला होता. अशाच तर्हेने ज्या ज्या ठिकाणी सार्वत्रिक विहीरी, तळी, नळ आहेत तसेच मंदिरे सर्व स्थरातील जनतेला खुली करण्याकरीता असेच समान हक्काचे लढे लढवून आपले कार्य करावयाचे आहे हा माणस ठेऊनच या समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली होती.
बाबासाहेबांच्या हयातीत या समता सैनिक दलामध्ये स्वखुशीने, स्वखर्चाने व समाजाच्या रक्षणासाठी एक लढवय्या सैनिक म्हणून काम करण्याची इच्छा प्रत्येक तरूणामध्ये होती. मात्र सध्या सुरू असलेल्या या शोषित, पिडीत, वंचित, मुस्लिम समाजावर सबंध भारतभर होत असलेल्या अन्यायाविरोधात समता सैनिक दलाच्या गावोगावी शाखा न उघडता त्यातून स्वरक्षणाचे, मर्दानी खेळाचे, कराटे सारखी शिबीरे भरवून अन्यायाविरूध्द लढा उभारण्याची ताकद निर्माण न करता हा समाज आंदोलन करणे, गांव बंद वगैरे सारखे पर्याय स्विकारून स्वत: किती पळपुटा आहे व आपल्या भावी पिढीलाही या सारख्या आंदोलनातून भितीच्या वातावरणात ढकलण्याचेच काम करीत आहे याची साधी जाणीवसुध्दा होताना दिसत नाही. आपल्या माताभगिनींवर बलात्कार करून आब्रुच्या चिंध्या केल्या जातात, विहीरीमध्ये पोहल्यास, पाणी प्यायल्यास नग्न करून धिंड काढली जाते, मारहाण केली जाते, खून केला जातो मात्र आपण आंदोलन करणे, गांव बंद करणे या सारख्या प्रक्रियेच्या पुढे जाऊन काही विचारच करू शकत नाही. या सर्व समाजावर वेळोवेळी झालेल्या आणि भविष्यात होणार्या अन्याय - अत्याचाराविरोधात लढा उभारण्यासाठी बाबासाहेबांनी याच समता सैनिक दलाची स्थापना केली होती. आपल्या समाजावर होणार्या अत्याचाराला उलथवून लावून समाजाचे रक्षण करण्याची धमक समता सैनिक दलाच्या सैनिकामध्ये निर्माण केली होती. लढवय्या योद्ध्याची पार्श्वभूमी आपणांस आहे याचा ऐतिहासिक पुरावा देखील बाबासाहेबांनी दिला परंतू आपण षंड होऊन अन्याय अत्याचार बघत बसण्याखेरीज काहीच करू शकत नाही. जर का या अत्याचाराचा कायमचा नायनाट करायचा असल्यास स्वत:ची ताकद निर्माण करायची असल्यास आज प्रत्येक गावा-गावात समता सैनिक दलाची स्थापना करून समाज रक्षणासाठी लढवय्ये सैनिक निर्माण करण्याची तसेच लढवय्या जमातीचे वंशज आहोत हे सिध्द करण्याची गरज आहे.
0 Comments