शाहू छत्रपतींनी ब्राम्हणांचा किल्ला ढासळला
शाहू छत्रपतींनी ब्राम्हणांचा किल्ला ढासळला
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 1939 च्या सभेतील मनोगत)
कोल्हापूरबद्दल अस्पृश्यांना व मला नेहमीच आदर आणि अभिमान वाटतं आला आहे, कारण छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातच लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. कोल्हापूर संस्थानात दलित प्रजापरिषदेतील, ‘30 डिसेंबर 1939’ रोजी अध्यक्ष स्थानावरून बोलतांनाचे हे उदगार आहेत भारतरत्न डॊ.बाबासाहेब आंबेडकर यांचे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर नगरीला भेट देण्याचा योग बाबासाहेबांना आला. त्यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मण समाजाने दिलेल्या त्रासाबद्दल निर्भीडपणे आपले मत मांडले होते. त्यावेळी ते म्हणाले, गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी आपण साजरी करतो. शिवछत्रपतींना ब्राह्मणे नष्ट करता आले नाही, आपल्या राज्याभिषेकासाठी सोने देऊन काशीहून गागाभट्टला त्यांना आणावे लागले. ब्राह्मणांची नांगी तोडण्याबाबत शाहू छत्रपती शिवराया पेक्षा श्रेष्ठ होत. शाहू राज्यांना वेदोक्त अधिकार नाही असे सांगणार्या ब्राह्मणांना, पुण्याच्या लोकमान्य टिळकांचा..? व तेथील भट शाळेचा आधार असतानाही त्यांना शाहू छत्रपतीने ठोकरीने उडविले. हे विसरता येणार नाही.
शाहू महाराजांनी समतेचा नारा दिला, मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले, यामुळे प्रतिगामी लोक त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत होते, या टीकेला उत्तर देताना भारतरत्न बाबासाहेब म्हणतात, शाहू महाराजांच्या अंगी दोष असतील..? मी असे विचारतो की कोणत्या राजाकडे दोष नाहीत..? निव्वळ दोषाकडे पाहण्यात अर्थ नाही. ब्राह्मण्य नष्ट झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणे नाही. त्यांनी ब्राह्मण नष्ट करण्याचा धडाडीने प्रयत्न केला, यातच त्यांची थोरवी आहे...!
छत्रपती शाहूंनी समाजातील विषमता नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ब्राह्मणांचा बालेकिल्ला ढासळून टाकला. ही काय लहान कामगिरी नाही.
माझ्या सार्वजनिक आयुष्याचा श्रीगणेशा छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगावच्या परिषदेतच मी गिरवला होता. ही गोष्ट इथे नमूद करणे आवश्यक आहे. मूकनायक वृत्तपत्र सुरू रहावे यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत दिली होती याची आठवण करून देताना बाबासाहेब म्हणतात, त्यांना व मला प्रिय असलेल्या समतेच्या प्रचारासाठी रुपये 2500 देऊन त्यांनी मला सदैव ऋणी केले. कोल्हापूर संस्थानातील पड जमीन, शेरी जमीन आज बहूजन समाजाकडे कसण्यासाठी आहेत हे आपण पहातो. मात्र ही जमीन अस्पृश्य समाजाला कसण्यासाठी द्यावी अशी मागणी त्यांनी या सभेत केल्याचे दिसून येते. यावरून बाबासाहेब किती दुरगामी हिताचा विचार करत होते हे दिसून येते. ते भाषणात म्हणतात, कोल्हापूर संस्थानाची शेत जमीन 22 लाख एकर असून त्यापैकी वहीवाटली जाणारी जमीन 13 लाख 13 हजार एकर आहे. ही पड जमीन तीन लाख 71 हजार 423 एकर असून महाराजांची खाजगी ‘शेरी जमीन’ 46 हजार 359 एकर आहे. ही पड व शेरी जमीन अस्पृश्यांना देऊन त्यांची सुद्धा स्थिती सुधारणे शक्य आहे.
कोल्हापूर संस्थानातील सत्ता आणि नोकरभरती यामध्ये अस्पृश्य समाजाला योग्य तो न्याय दिला जात नाही असे निर्भीडपणे भाष्य करताना बाबासाहेब म्हणतात, कोल्हापुरातील इलाखा पंचायत व मुनिसिपालिटी या संस्थात अस्पृश्यांचे प्रतिनिधी नाहीतच. एकूण येथे 28 सभासद असून मुनिसिपालिटी मध्ये अस्पृश्यांचे फक्त 2 प्रतिनिधी घेण्यात आले आहेत. छत्रपतींच्या राज्यात आम्हा अस्पृश्यांच्या हिताची अव्याहतपणे वाढ व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. शेवटी महाराजांना दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर त्यांनी स्वतःच्या हातात सूत्र घेऊन कारभार पहावा. नाहीतर प्रजेला अधिकार देऊन लोकशाही तरी स्थापन करावी. प्रजेला नोकरशाहीच्या ताब्यात मुळीच ठेवू नये. लोकशाही मध्ये हमेशा कल्याण होतेच असे नाही.
कोल्हापूर येथील संस्थानांतील ढोंगी अधिकारी व कर्मचार्यांचा निषेध करताना बाबासाहेब परखडपणे म्हणतात, कोल्हापुरात मला एक विशेष गोष्ट आढळून आली आहे. अनुयाया पेक्षा पुढार्यांची संख्या येथे फार माजली आहे. या राज्याची पद्धत अशी आहे की येथील कोणत्याही फाटक्या तुटक्या माणसास अधिकार्यांच्या कानाशी लागता येते. मी आजच्या सभेला अध्यक्ष नको असा आर्जही दिवाना कडे गेल्याचे माझ्या कानी आले आहे. अशा परिस्थितीत दलित प्रजामंडल चिरकाल टिकेल अशी व्यवस्था करण्याचे काम तुमचे आहे. ‘ एक ना धड भाराभर चिंध्या ‘ असा प्रकार इथं परत तुम्ही करू नका.
बाबासाहेबाना छत्रपती शाहूं महाराजांचा मानपत्र देऊन गौरव करण्याचा मानस होता. मात्र ते शक्य झाले नाही. याबाबत दिलगिरी व्यक्त करून ते म्हणाले होते, आजच्या परिषदेस महाराजांना मानपत्र देण्याचा आपला मानस होता. ती गोष्ट शक्य झाली नाही. म्हणून आपण दिलगीर आहोत. महाराजांनी आजच्या परिषदेचा मेळा पाहिला, एवढेच आपण कृतार्थ झालो आहोत. आपण महाराजाशी एकनिष्ठ राहावे. महाराजांनी पड जमिनी, देवस्थानच्या जमिनी, शेरी जमिनी अस्पृश्यांना कसण्यास देऊन त्यांना उद्योगधंद्यात लावावे, असे मला वाटते. अस्पृश्य आणि शिक्षण याबाबत विचार मांडताना बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्यांच्या शिक्षणा- प्रित्यर्थ ज्यादा पैसा पुरवणे हे संस्थानांची कर्तव्य आहेत. अस्पृश्य मुलींच्या वस्तीगृहासाठी ही सढळ हाताने पैसा खर्च केल्यास त्याने अस्पृश्य समाजाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी दलित प्रजा मंडळ यांची संघटना मजबूत करा. असे माझे तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे.
भारतरत्न डॊ.बाबासाहेब यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात येऊन दलित प्रजा परिषदेत 30 डिसेंबर 1939 रोजी निर्भीड पणे आपले विचार मांडले होते. इंग्रज सरकार असो अथवा राष्ट्रीय काँग्रेस किंवा एखादे संस्थान असो.... जेथे जाईल तेथे बाबासाहेब अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी, परखडपणे, निर्भीड पणे आपले सत्य विचार मांडत होते. व आयुष्यभर अस्पृश्य समाजासाठी संघर्ष करत होते. हे या भाषणावरून स्पष्ट होते.
- अशोक कांबळे (हसूर खुद्र) मो. 9923638244
0 Comments