व्यक्तीपूजेमुळे लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीमध्ये..!

भारत देशात हजारो वर्षापासून चालत आलेल्या जाचक रूढी-परंपरा, जातीभेद, धर्मभेद, स्पृश्य-अस्पृश्यता, असमानता, आर्थिक विषमता नष्ट करून स्वतंत्र भारतातील नागरिकाला सुखी व समृध्दीचे, समानतेचे व स्वातंत्र्याचे आयुष्य जगता यावे व या आधुनिकतेच्या युगामध्ये भारताचा विकास योग्य दिशेने व्हावा यासाठी डॊ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. यामुळेच संपूर्ण जगभरात ‘जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश’ म्हणून भारताची ओळख निर्माण झाली. ही लोकशाही भारतात टिकवण्यासाठी, रूजवण्यासाठी भविष्यात होणार्‍या फायद्यांचा तसेच येणार्‍या संकटांचा उल्लेख बाबासाहेबांनी संविधान सभेत केला होता. त्यातीलच एक राजकारणात व्यक्तीपूजेचा देखील होता. बाबासाहेबांनी सांगितलेल्या या संकटांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने भारताच्या लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत असल्याची जागतिक आकडेवारी काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली आहे.

गेल्या 7 वर्षात मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आल्यापासून लोकशाही मुल्यांचे हनन सुरू आहे. तसेच जातीभेद आणि धर्मभेदाच्या घटना दररोज घडत आहेत. विशेष म्हणजे सन 2014 च्या निवडणूकीच्या प्रचारामध्ये मोदींनी आपल्या पक्षाचा प्रचार भ्रष्टाचार, काळा पैसा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाढत असलेली तफावत या मुद्यांवर आपली निवडणूक लढवली आणि जिंकलीही. मात्र मतदारांना भुरळ पाडणार्‍या या सर्व मुद्यांना बगल देत मोदींची मातृसंस्था असलेल्या आरएसएसच्या हिंदुत्ववादी विचारांना बळकट करण्यासाठी नवनवीन कायदे तर आणलेच शिवाय एकहाती सत्तेचा वापर करत आरएसएसचे प्रलंबित असलेले राममंदिरासारखे प्रश्‍न मार्गी लावण्यास रात्रंदिवस काम केले आहे. गेल्या 7 वर्षात भारताने विकासामध्ये कासवाची गती तर पकडली नाहीच पण गरीबी, जातीय अत्याचार, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराची परिसिमा गाठल्याचे वास्तव आज संपूर्ण देशामध्ये पहावयास मिळत आहे. सरकारने कोणताही विचार विनिमय न करता घेतलेल्या वेगवेगळ्या कायद्यांमुळे देशामध्ये आराजक्तेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व जगभरात पसरत होता त्यावेळी जगभरातील देश आपआपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी विदेशी नागरिकांचे विलगीकरण करीत होते. तर दुसरीकडे मोदी मात्र ट्रम्प यांच्या निवडणूकीचा भाग असलेल्या एका इव्हेंटचे आयोजन लाखो लोकांना हाताशी धरून पार पाडत होते. या सर्व उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सध्या देशातील कोरोडो लोकांच्या हातचे काम गेले आहे. तर काही लोकांवर उपासमारीची वेळही आली आहे.

हा सर्व सुरू असलेला गलथान कारभार लपवण्यासाठी आरोप प्रत्यारोपाच्या घटना सुरू करून मागील सरकारने केलेल्या कामालाच दोष देऊन तसेच देशाचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सध्याच्या सरकारने बँकांचे विलीनीकरण सुरू केले आहे. लोकांना स्वत:चेच पैसे काढण्यासाठी बँकेच्या चकरा मराव्या लागत आहेत. अशा अनेक चुकीच्या धोरणांमुळे व निवडणूकीवेळी मोदींनी केलेल्या भ्रष्टाचार मुक्त, गरीबीमुक्त, विकसनशील भारत या खोट्या दाव्यांविरोधात नागरिकांनी प्रश्‍न उपस्थित करायला सुरूवात करताच आता नवीन व्यक्तींना मोदींच्या तुलनेत उभे करण्यास सुरूवात झाली आहे. काही वर्षापासून व्यक्ती केंद्रीत राजकारणाचा जाणून बुजून डाव सुरू झाल्याने हिंदुत्व व कट्टरतावादी संघटनांचा मार्ग सोयीस्कर झाला आहे. एकाच व्यक्ती भोवती राजकारण केंद्रीत करून आपली सत्ता अबाधीत ठेवण्याचा कुटील डाव सुरू आहे. नागरिकांनी हा डाव वेळीच ओळखून आपल्या देशाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यक्ती केंद्रीत न होता जो पक्ष भारतीय संविधानाची मुल्ये जपून त्यानुसार देशाची जडण-घडण करेल त्याच्याच हाती सत्तेच्या चाव्या देणे आपल्यासाठी व येणार्‍या पिढीसाठी सोयीस्कर ठरणार आहे.