जातीयवादी गटविकास अधिकारी कवितके याला निलंबित करून ऎट्रॊसिटी दाखल करा : बौध्द समाजाची मागणी

चिंचवाड/प्रतिनिधी :

गेली दोन वर्षे माळभाग, चिंचवाड येथे बौध्द समाजमंदिर बांधकामाचे काम सुरू करण्यात आले होते. याबाबत ग्रामपंचायतीने सर्व परवानगी देऊन ठराव ही दिला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यापासून गटविकास अधिकारी कवितके याने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. काहीतरी कारणे दाखवून मुद्दाम बौध्द समाजमंदिर बांधकामास स्थगिती गटविकास अधिकारी कवितके देत आहे त्यामुळे त्याचे निलंबन करून त्याच्यावर ऎट्रॊसिटी दाखल करण्याची मागणी चिंचवाड येथील बौध्द समाजातील बांधवांनी केली आहे.

बौध्द बांधवांकडून मिळालेली माहितीनुसार, सदर जागा ही बौध्द समाजाने खाजगी मालकीतून खरेदी करून ग्रामपंचायतीकडे वर्ग केली आहे. बौध्द बांधवांनी ग्रामपंचायतीमार्फेत ठराव करून समाजमंदिर मंजूर करून घेतले. समाजमंदिराचे फौंडेशनचे कामही पूर्ण झाले. मात्र या बांधकामाबाबत काही जातीयवादी मनुवाद्यांकडून संभ्रम निर्माण करून गटविकास अधिकारी याला अर्ज करून या कामास स्थगिती आणली आहे. सदर समाजमंदिर बांधकामासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी संमतीपत्रे दिली असून बौध्द समाजाने आवश्यक ती सर्व कागदपत्रे गटविकास अधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यालयास जमा करूनही काम सुरू होत नसल्याने बौध्द समाजाने या प्रकरणी दोनवेळा आंदोलनदेखील केली आहेत. मात्र या जातीयवादी मनुवाद्यांनी हे समाजमंदिराचे काम सुरू करण्यासाठी अजूनही आदेश दिलेला नाही. कागदपत्रे पाहणीसाठी हे सर्व चालू आहे की अर्थपूर्ण वाटाघाटीसाठी चालू आहे असा प्रश्‍न आता बौध्द बांधवांतून विचारला जात आहे. प्रत्येक वेळी गटविकास अधिकारी कवितके याने उडवा-उडवीची उत्तर देऊन या प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. आंदोलनाचे हत्यार वापरून ब्लॅकमेल करणारा शिरोळ येथील जातीयवादी इसमही यामध्ये आहे, असे बौध्द समाजातील नागरिकांनी सांगितले. 

या समाजमंदिरास जिल्हा परिषदेकडून परवानगीही मिळालेली असून सर्व कागदपत्राची पुर्तता यापूर्वीच झालेली आहे. जर हे चुकीचे असेल तर फौंडेशनपर्यंत काम पूर्ण परवानगी कशी काय दिली? असा सवालही यापुढे उपस्थित होत आहे. समाजमंदिर जेथे बांधण्यात येणार आहे तेथील सर्व जागेची सर्व शासकीय उतारे निघत असून मुद्दाम अडवणूक करून जातीयवादी मानसिकतेतून बौध्द समाजमंदिर उभा करू न देणे हाच एकमेव उद्देश या जातीयवादींचा असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. आता समाजमंदिर नको पण जातीयवादी गटविकास अधिकारी कवितके याला निलंबित करून त्यांच्यावर ऎट्रॊसिटी दाखल करा, अशी मागणी चिंचवाड येथील बौध्द समाजाने केली आहे. लवकरच या प्रकरणात शिरोळ तालुक्यातील बौध्द समाजाला एकत्र करून मोठे आंदोलन उभारणार असल्याचे बौध्द समाजाने सांगितले. 


जातीयवादी मानसिकता दिसून येते : 
विश्‍वजित कांबळे, राज्य सदस्य, वंचित बहुजन युवा आघाडी 

21 व्या शतकात बौध्द समाजमंदिर बांधकाम करण्यास परवानगी न देणे म्हणजे किती मोठी जातीयवादी मानसिकता आहे यावरून लक्षात येते. छ. शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये असे घडत असेल तर वंचित बहुजन आघाडी कदापी सहन करणार नाही. प्रत्येकाला संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. संविधानिक अधिकाराचे हनन होत असेल तर गटविकास अधिकारी कवितके याचे निलंबन झालेच पाहिजे. वंचित बहुजन आघाडी चिंचवाड येथील बौध्द समाजाच्या सदैव पाठीशी आहे.


दोन वेळा आंदोलन करूनही समाजमंदिर बांधकामास परवानगी नाही : 
महेश कांबळे, बीएसपी जिल्हाध्यक्ष

या प्रकरणात दोन वेळा मी स्वत: आंदोलन करूनही गटविकास अधिकारी कवितके यांनी समाजमंदिर बांधकामास परवानगी दिली नाही. ही रितसर मागणी असून बौध्द समाजाकडे सर्व कागदपत्रे आहेत. दुसर्‍या ज्या समाजाने या कामाला स्थगिती आणली आहे त्याला ग्रामपंचायत दुसरी जागा देण्यास तयार असून देखील मुद्दाम या जागेवर जेथे बौध्दसमाजमंदिर उभा होणार आहे त्याला अडथळा आणला जात आहे. बौध्द समाजमंदिर उभा राहण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही संघर्ष करणार आहोत.