राज्यात जवळपास 13000 हजार हून अधिक प्राध्यापक, सहा. प्राध्यापकांचे पदे रिक्त

प्राध्यापक भरतीसाठी पुणे,  नागपूर येथे 19 जुलै रोजी आंदोलन 

50 हून अधिक संघटनांचा सहभाग

हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनचे राज्यसमन्वयक 

डॊ. किशोर खिलारे यांचे आवाहन

रिपब्लिकन स्टुडंट युनियनचा पाठींबा


सांगली/प्रतिनिधी-

राज्यात 13000 हून अधिक प्राध्यापक, सहा. प्राध्यापक यांची पदे रिक्त आहेत. उच्च शिक्षण मंत्री केवळ तोंडी आश्‍वासन देतात पण निर्णय मात्र जाहीर करत नाहीत. यामुळे उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होत आहे. महाराष्ट्रात एकूण 68 विद्यापीठ, 4 हजार 414 महाविद्यालय आणि 2 हजार 393 स्वतंत्र संस्था आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुसंवर्धन, विधी, कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र आदी विविध कोर्सेसमध्ये जवळपास 34 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालयातील रखडलेली प्राध्यापक, सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा व इतर अनुषंगिक मागण्यासाठी पुणे येथील संचालक उच्च शिक्षण विभाग पुणे, नागपूर येथील संविधान चौक येथे 19 जुलै रोजी बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार आहे. जवळपास 50 हून अधिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील प्राध्यापक, सहा.प्राध्यापक, लेक्चरर बाबतची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, प्राध्यापक भरतीसाठी प्रचलित विषय व विभाग निहाय आरक्षण धोरण कायम ठेवण्यात यावे, अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील शिक्षकीय संवर्गातील राखीव जागांचा अनुशेष प्रचलित 100 बिंदुनामावली नुसार तात्काळ भरण्यात यावा, तासिका तत्वावरील अर्थात सीएचबी तसेच कंत्राटी धोरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, तासिका तत्त्वावरील कामाचा अनुभव कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ग्राह्य धरण्यात यावा, राज्यातील सर्व विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्वरीत अनुदान देण्यात यावे. एमपीएससी मधून अभियांत्रिकी लेक्चरर पदांची भरती तत्काळ करा, आदी मागण्याबाबत आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे माहिती रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी दिली. या आंदोलनात राज्यातील सेट-नेट व पीएच.डी. पात्रताधारकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनचे राज्यसमन्वयक डॊ. किशोर खिलारे, संजय साबळे, डॊ. प्रकाश नाईक, चंद्रकात गजभरे, डॊ. सुदर्शन माने, डॊ. संतोष भोसले, नितीन गायकवाड, डॊ. लक्ष्मण शिंदे, सौरभ पाटणकर, कपिल पाटील, गौतम पाटील, डॊ. तृप्ती थोरात, डॊ. निलेशकुमार नाईक, ज्ञानेश्‍वर बनसोडे, डॊ. लखन इंगळे, भीमाशंकर गायकवाड, अमोल महापुरे, डॊ. चंद्रशेखर कापशीकर इत्यादींनी केले आहे.