भीमयान इम्फॅक्ट : उंदरवाडी येथील दवंडी देणाऱ्या मंगल कांबळे यांना मदत
भीमयान इम्फॅक्ट : उंदरवाडी येथील दवंडी देणाऱ्या मंगल कांबळे यांना मदत
कागल/ अशोक कांबळे-
मागासवर्गीयांनीच दवंडी देणे...एक जातीयवादी परंपरा..? या मथळ्याखाली साप्ताहिक भीमयान मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन तळाशी येथील जेष्ट नेते मारुतराव जाधव यांनी मंगल कांबळे यांच्या घरी जाऊन रु.पाच हजारांचा मदतनिधी दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन बांधकाम सभापती वंदना जाधव यांच्या हस्ते मदत निधीचे वितरण करण्यात आले.
यावेळी राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष- अरुणराव जाधव, सौरभ पाटील, रणजीत पाटील आदी उपस्थित होते.
मंगल कांबळे यांचे पती पूर्वीपासून परंपरेने गावात दवंडी देण्याचे काम करत आहेत, मात्र ते आजारी असल्याने गावाचा रोष नको म्हणून स्वतः मंगल कांबळे यांनी उतारवय असूनही गावांतील गल्लीबोळात जाऊन दवंडी देण्याचा निर्णय घेतला होता.
यासंदर्भात साप्ताहिक भीमयान मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मंगल कांबळे यांची व्यथा वेगाने सर्वत्र व्हायरल झाली. अनेक लोकानी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी हात पुढे केला आहे.
समाजातील काही चुकीच्या परंपरा थांबवण्यासाठी ' साप्ताहिक भीमयान ' बरोबर कंबर कसून सहयोग देण्याचा निर्णय, सामाजिक चळवलीतील कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचे, 'भीमयान' शी संपर्क साधून स्पष्ट केले .
Read Article ---
मागासवर्गीयांनीच दवंडी देणे एक जातीयवादी परंपरा..?
उद्या गावात खडाबंद पाळक आहे ....! आज वरच्या आळीच्या नळाला पाणी येणार नाही ...! परवा रेशन धान्य वाटप करण्यात येणार आहे...! हा- जी- बाबा- हा-~!
पूर्वापार गावांगावात आणि वाड्यावस्त्यावर चालत आलेली ही दवंडी देण्याची किंवा सादवण्याची पद्धत. केवळ मागासवर्गीय समाजातीलच व्यक्तीनेच दवंडी द्यायची...? ही जातीयवादी परंपरा आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल माध्यमाच्या जमान्यात कितपत योग्य आहे..? याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. गावात घडलेल्या, घडत असणार्या किंवा भविष्यातील घडणार्या, घटनांची माहिती घराघरात पोहचवली पाहिजे, या युद्धेशाने ‘आरोळी देणे’ ‘दवंडी देणे’ किंवा ‘मोठ्याने सादवणे’ च्या पारंपरिक प्रथा चालत आलेल्या आहेत.
गावात सादवण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक पूर्वीपासून झालेली आहे, ती व्यक्ती सर्वसाधारण पणे महार, मांग अशा मागासवर्गीय समाजातीलच असते. जी व्यक्ती गावात दवंडी देते किंवा सादवते तिला तराळ असे म्हटले जाते. ‘तराळकी’ करणे म्हणजे गावातील सरकारी अधिकारी, सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल, रेशन धान्य दुकानदार किंवा इतर पुढारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करून गावात दवंडी देणे, असा विनामोबदला सेवा करून घेण्याचा हा प्रकार क्लेशकारक आहे. यासाठी धान्याच्या स्वरूपात तुटपुंजे मानधन दिले जाते, इतकेच समाधान..! मात्र या धंद्यात ना प्रतिष्ठा, ना आर्थिक फायदा, केवळ गावांची सेवा करणे एवढाच संकुचित उद्देश. उन्हाळा असो, पावसाळा असो अथवा भरदुपार, रात्रीं अपरात्री, उन्हातान्हात अनवाणी पायाने दवंडी देण्याची मागासवर्गीय व्यक्तीने इमानेइतबारे सेवा करायची. आणि गावकर्यांना निरोप पोहचता करायचा... एवढेच ध्येय बाळगून, घसा ताणून दवंडी द्यायची. मात्र थोडीशी जरी चूक झाली...तर आईबहिणीचा उद्धार...? आणि जातीयवादी शिव्या...? असा सर्वसाधारण मोबदला देण्याची पद्धत गावागावात रूढ आहे, हे गोपनीय गुपीत आहे, याला वाचा फोडायला कोणीही व्यक्ती भीतीने तयार होत नाही, कारण विरोध करावा तर आर्थिक परिस्थिती आडवी..? नाहीतर गावाचा बहिष्कार, आणि भावकीचा ठपका..? अशा विचित्र अडचणीत या समाजातील गावकी करणारे लोक सापडले आहेत. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून एका क्षणात संदेशाची देवाणघेवाण होऊ शकते, मात्र पारंपारिक रूढी आणि रीतीरिवाज यांना चिकटून बसलेल्या प्रतिगामी लोकांच्या चुकीच्या विचारसरणीमुळे, मागासवर्गीय समाज भरडला जात आहे. याची खंत ना राजकीय नेत्यांना..! ना समाजातील सुशिक्षित लोकांना..! कागल तालुक्यातील हे एक उदाहरण आहे उंदरवाडी येथील. या गावातील दवंडी देणारी व्यक्ती आजारी पडली. त्यामुळे गावात दवंडी कोणी दयावी..? असा गंभीर आणि प्रतिष्ठेचा प्रश्न गावकर्यांना पडला. समाजातील इतर लोकांनी दवंडी देण्यास नकार दिल्याने शेवटी नाईलाजाने त्या व्यक्तीची पत्नी मंगल कांबळे यांनीच गावाचा रोष नको म्हणून दवंडी देण्याचा निर्णय घेतला. या कामाचे वर्षाला केवळ दोन पोती भात, मंगल कांबळे यांच्या कुटुंबाला गावकरी देतात. त्याच्यावरती आठजणांचे कुटुंब अवलंबून आहे. त्यावरती उदरनिर्वाह कसा करणार..? असा प्रश्न गावकर्यांना न पडता दवंडी देण्याचा प्रश्न मिटला यात जर समाधान वाटत असेल. तर हे मोठे आश्चर्यकारक आहे.
गावकर्यांनी ठरवले असते तर एखादी बातमी लाऊडस्पीकर, व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून गावभर काही क्षणातच पोहचवता आली असती. त्यासाठी गल्ली बोळातून एका वृद्ध महिलेला दवंडी देण्यासाठी बाहेर पडायला लागले नसते. मात्र दवंडी देणे हे मागासवर्गीय समाजातील व्यक्तीचेच काम आहे, असा व्होरा सवर्ण समजल्या जाणार्या लोकांचा असल्याने गावकर्यांच्या समाधानासाठी उतरत्या वयातही मंगल कांबळे दवंडी देण्याचे कार्य इमानेइतबारे पार पाडत आहेत, हे जरी गावकर्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद असले...तरी शिव-शाहू-फुले- आंबेडकराच्या पुरोगामीत्व पांगरलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने लांछणास्पद आहे हे नक्की..!
- अशोक कांबळे, हसूर खुर्द . मो. 9923638244
1 Comments
छान
ReplyDelete