अस्पृश्यांसाठी शैक्षणिक चळवळ चालवणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले
अस्पृश्यांसाठी शैक्षणिक चळवळ चालवणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले
भारतात व पर्यायाने महाराष्ट्रात 19 व्या शतकाच्या प्रारंभी समाजात वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण काटेकोरपणे पाळले जात होते. या शिवाय समाजात जाती संस्थेचे मोठे स्तोम माजलेले होते. जातीजातीमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात होते. सामाजिक व्यवस्थेत तर प्रत्येक जातीचे स्वतंत्र वैशिष्टे होते. जातिव्यवस्थेची बंधने कडक होती. जातीसाठी माती खावी, अशी समाजात धारणा होती. त्यामुळे जात बदलणे अवघड होते. जातीचे उल्लंघन करणार्यास समाजातून बहिस्कृत केलेे जात असे. अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील लोकांना फार वाईट जीवन जगावे लागत असे. महार, मांग, ढोर, चांभार, यासारख्या अनेक जातींचा समावेश अस्पृश्य जाती म्हणून केला गेला होता. त्यांच्यावर मनुस्मृतीप्रमाणे अनेक कडक निर्बंध लावण्यात आले होते. अशा परिस्थितीत शिक्षणासारख्या गोष्टी मिळणे अशक्य होते. 19 व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात इंग्रजांची राजवट सुरु झाली. शासनाचा अनुभव असलेल्या या ब्रिटीश शासनाधिकार्यांनी महाराष्ट्रात राज्याची घडी सुव्यवस्थित बसवण्यासाठी मुस्तद्दीपणाचे धोरण आखले. फार प्राचीन काळी भारतात व महाराष्ट्रात काही ठिकाणी तात्या पंतोजी शाळा अस्तित्वात होत्या. आजकाल शाळा म्हणून असलेली कल्पना पूर्वी अस्तित्वात नव्हती. पुढे समाजातील श्रीमंत व शिक्षणप्रेमी मंडळींनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन उदार हस्ते देणग्या देऊन काही पाठशाळा सुरु केल्या, परंतु अशा पाठशाळांची संख्या नगण्य होती. अशा पाठशाळेत शिकणारी मुले विशेषतः ब्राम्हण वर्गातीलाच होती. समाजातील खालच्या वर्गातील मुलांना शिक्षणाची दारे बंद होती. बहुजन समाज शिक्षणापासुन दूर होता. 19 व्या शतकात महाराष्ट्रात अनेक युरोपियन लोक आले. त्यांच्या प्रेरणेमुळे व सहकार्यामुळे महाराष्ट्रात अनेक शाळा, महाविद्यालये मोठ्या मोठ्या शहरात सुरु झाली. परंतू शैक्षणिक क्षेत्रात सामान्यासाठी शिक्षण चळवळ महात्मा फुले यांनी मोठ्या प्रमाणात सुरुवातीस महाराष्ट्रात सुरु केली.
महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी ज्या अनेक महापुरुषांनी आपले जीवन व्यतीत केले, त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले क्रांतिकारक महापुरुष होत. फुल्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. त्या विचारांना अंमलात आणण्यासाठीची पावले उचलून सर्वप्रथम मुलींसाठी इ.स.1848 मध्ये पुणे येथे पहिली शाळा सुरु केली. समाजातील अस्पृश्यांची स्थिती हलाखीची होती अस्पृश्यांना निर्दयतेने वागविले जात होते. अस्पृश्यांत शिक्षणाचा प्रसार केल्याने सार्वत्रिक क्रांती होईल या उद्देशाने महात्मा फुले यांनी इ.स.1851मध्ये अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरु केली. शेकडो वर्षे अज्ञान, अंधकारात कुजत पडलेल्या समाजाला ज्ञानाचे दरवाजे उघडून देणारे महात्मा फुले हे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक होय. सामाजिक समतेचा या पुजार्याने शिक्षणाशिवाय अस्पृश्यांची सुधारणा होणे शक्य नाही हे ओळखून लोकक्षोभ पत्करून अस्पृश्य निवारणाचे कार्य हाती घेतले.
अस्पृश्यतेच्या नावाखाली या समाजाला हजारो वर्षे जे हक्क डावलले आहेत ते परत मिळवून दिल्याशिवाय या अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही हे महात्मा फुले यांनी ओळखले होते. यासाठी अस्पृश्यांचे अज्ञान दुर केले पाहिजे व ते दुर करण्यासाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे हे त्यांच्या लक्षात आले. महार, मांग, ढोर, चांभार इत्यादी अस्पृश्य वर्गाला शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करणे यासारखे महत्वाचे दुसरे कार्य नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अनेक शाळा सुरु केल्या. इ. स.1851-नाना पेठ (पुणे) ही शाळा काही कारणामुळे बंद पडली. इ. स 1852- वेताळ पेठ (पुणे), इ.स.1853- गोवंडे वाडा (पुणे), इ. स. 1858 मध्ये तिसरी शाळा सुरू केली. अनेक फंडातून या शाळांना मदत मिळू लागली. अशा प्रकारे अस्पृश्यांचा शिक्षणाचा खरा कैवारी महात्मा फुले हे होय. महात्मा फुले यांची शैक्षणिक चळवळ पुढे शाहू महाराज, डॊ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेटाने सुरू ठेवली. म्हणूनच महाराष्ट्र हा आज शैक्षणिक क्षेत्रात इतर राज्यांपेक्षा आघाडीवर आहे व महाराष्ट्राचे भूषण ठरला आहे.
- निलेश वाघमारे, नांदेड 8080869782
0 Comments