बुद्ध आणि बोधिसत्व...

बुद्ध हे कुणीही व्यक्तीचे नाव नसुन ते मानवी मनाच्या स्थिती किंवा अवस्थेचे नाव आहे. बुद्ध म्हणजे ज्या व्यक्तीस सम्यक संबोधि प्राप्त झाली आहे अशी परिपूर्ण व अमर्याद ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती. अशा व्यक्तीस पाली भाषेत सब्बञ्ञु’ म्हणतात. भगवान बुद्ध यांच्या काळामध्ये बुद्ध नाव प्रचलित नव्हते. कारण बुद्ध हे नाव संस्कृत असून ही भाषा जरी प्राचीन असली तरी तिचा उदय 12 व्या शतकात झाला. बुद्ध काळात पाली भाषा सर्वसामान्य व प्रचलित होती. पाली भाषेत बुद्ध नावाचा अर्थ बुध असा होतो. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी जेव्हा लुंबिनी येथे भेट दिली. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी भव्य असा स्तंभ उभारला व त्यावर शिलालेख पाली भाषेत लिहिला की, राज्याभिषेक पुर्ती दिनाच्या निमित्त मी स्वतः लुंबिनी येथे येउन पुजा व वंदन केले. कारण येथे भगवान बुद्धाचा जन्म झाला होता. या शिलालेखामधे आपणास लक्षात येते की हिदबुधजाते असा उल्लेख आहे. म्हणजेच त्या काळातील प्रचलित भाषा पालीमध्ये बुद्धांना उद्देशून बुध शब्द या शब्दाचा वापर केला जात होता.

बुद्ध व बोधिसत्व हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत. भगवान बुद्धाच्या काळात बुद्ध, बोधिसत्व व बौद्ध या तिनही संस्कृत शब्दांचे अस्तित्वच नव्हते. कारण या तीनही शब्द पाली भाषेमध्ये आढळत नाही. भगवान बुद्धांनी आपल्या अनेक उपदेशात धम्म म्हणजे संप्रदाय, मजहब किंवा स्त्रझघह्रघधथ आहे असे कधीही सांगितले नाही. बुद्ध धम्माला मानणारे व भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार जीवन जगणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली, त्यामुळे बुद्धांना मानणार्‍या लोकांना बौद्ध म्हटले जाऊ लागले. जसा जसा वेळ जात गेला तसा तसा लिपी व भाषेत बदल होत गेला. काळाच्या ओघात अनेक लिपी व भाषा लोप पावल्या तसेच उदयासही आल्यात. झालेल्या बदला नुसार शब्द व शब्दांचे अर्थ विकसित झाले. भगवान बुद्धाच्या काळात भगवान बुद्धांना मानणार्‍या लोकांना बौद्ध म्हटले गेल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळत नाही व त्यावेळी धम्म हा केवळ धम्म होता, धर्म नाही. कालांतराने बुद्ध धम्माचा विस्तार होत गेला. यामुळे बुद्ध धम्माशी संबंधित साहित्य, विनयाचे नियम व पंथ यामध्ये अनेक बदल होत गेले. विनयचे नियम शिथील करण्याच्या विवादित कारणास्तव व धम्माचे शुद्ध स्वरूप जतन करण्यासाठी अनेक वेळा धम्म संगितीचे (परिषद) आयोजन करण्यात आले.

प्रथम धम्म संगिती ही भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या तीन महिन्यानंतर सप्तकर्णी गुहेमध्ये राजगीर येथे भंते महाकाश्यप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दुसरी धम्म संगिती भदंत सब्बकामी यांच्या अध्यक्षतेखाली वैशाली मध्ये झाली. तिसरी धम्म संगिती ही प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या कार्यकाळात पटना येथे मोगलीपुत्त तिस्स यांच्या काळात झाली. या परिषदेत वरीलपैकी शब्दांचा उल्लेख झाल्याचे कुठेही आढळत नाही. नंतर बुद्ध धम्माच्या अनेक पंथ व शाखा निर्माण झाल्या, यांनी बुद्ध धम्म व बोधिसत्व यांसंदर्भात वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या. थेरवादी परंपरेने विमुक्तीज्ञानदर्शनाच्या तीन अवस्था सांगितल्या. 

1) सम्यक संबुद्ध - ही अवस्था प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे.  यामध्ये दहा परिमीता, उपपरिमीता, लक्ष व कल्प यापेक्षा अधिक वेळा संसारात दान शिल नैश्कम्य व प्रज्ञा पूर्णत्वास गेल्यावरच सम्यक संबद्धत्व प्राप्त होते. पण बुद्धवंस ग्रंथानुसार बोधिसत्वांनी महासागराच्या पाण्याईतके रक्तदान व पृथ्वीच्या मातीईतके शरीरदान व आकाशातील  तार्‍यांइतके नेत्रदान केले आहे. यासंबंधीत दानपरिमीताचा उल्लेख बुद्धवंस कथा व जातक कथा यामध्ये आढळतो. 2) प्रत्येक बुद्ध - प्रत्येक बुद्ध हे अशा कालखंडात उत्पन्न होतात जेव्हा सम्यक संबद्ध उत्पन्न होत नाहीत. प्रत्येक बुद्ध हे सम्यक संबुद्ध यांप्रमाणेच स्वयंप्रेरणेने व प्रयत्नाने विमुक्तीत्ज्ञानदर्शनाचा लाभ घेतात. 3)अरहंत - अरहंत हे सम्यक संबद्ध यांच्या भिक्षुसंघासातील संबोधि प्राप्त भिक्षु असतात. ते तथागताच्या उपदेशाचे पालन करून बुद्धत्व प्राप्त करतात. बोधिसत्व -  अलीकडील महायानी पंथातील परंपरेमधे बोधिसत्वाला बुद्धांप्रमाणेच असाधारण महत्व दिले जाते. महायानी पंथातील मान्यतेनुसार बोधिसत्वाची काया ही लोकोत्तर असुन पुजा व वंदनेसाठी पात्र आहेत, तर थेरवादी परंपरानुसार बोधिसत्व हे सर्वसामान्य मानव असुन एक ना दिवस ते सम्यक संबद्ध होतील असे माणले जाते. महायानी पंथातील मान्यतेनुसार बोधिसत्व हे बुद्धत्व प्रवासाच्या मार्गात इतके पुढे गेले आहेत की ते कधीही सम्यक संबद्ध होउ शकतात, पण त्यांनी सम्यक संकल्प केला आहे की जोपर्यंत समस्त संसारातील दुःखी सत्वांना दुःखातुन मुक्त करत नाही तोपर्यंत ते बुद्धच होणार नाही. बोधी म्हणजे महान ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी. बोधिसत्व म्हणजे जो कधी ना कधी निश्‍चित पणे बुद्ध बनेल, अशा बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रयत्नशील माणूस. अशा या बुद्धत्वासाठी प्रयत्नशील व्यक्तीला एकूण दहा अवस्थे पर्यंत बोधिसत्व रहावे लागते.

पहिल्या अवस्थेत बोधिसत्व मुदिता प्राप्त करून आपल्या चित्ताची मलीनता दुर करतो व प्रमादरहित झाल्यावर त्याच्या मनात सर्व प्राण्यांच्या कल्याणाची भावना उत्पन्न होते. यानंतर बोधिसत्व विमला भुमी अवस्थेला प्राप्त होऊन कामचेतनेपासुन मुक्त होउन सर्वांप्रती कारुणीक होतो. तिसरी अवस्था प्रभाकारी भुमी प्राप्त झाल्यावर बोधिसत्वाची प्रज्ञा दर्पणासारखी स्वच्छ होते. तो अनात्म व अनित्यतेच्या सिद्धांताला पुर्णपणे समजुन घेतो व उच्च प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी तो मोठ्यात मोठा त्याग करण्यासाठी सिद्ध होतो. चौथ्या अवस्थेत बोधिसत्व  हा आर्चिमती भुमीला प्राप्त करतो, यावेळी त्याचे लक्ष आर्य आष्टांगीक मार्गावर केंद्रीत  असते. पाचव्या अवस्थेत बोधिसत्व सदुर्जया भुमी अवस्थेला प्राप्त करून सापेक्ष व निरपेक्षमधील अंतर आत्मसात करतो. सहाव्या अवस्थेत बोधिसत्व अभिमुखि भुमी अवस्थेला प्राप्त करून बारा निदाने आत्मसात करतो. अभिमुखि विद्येमुळे बोधिसत्वाच्या मनात अविद्याग्रस्त प्राण्यांप्रती असीम करुणा निर्माण होते. सातव्या अवस्थेत बोधिसत्व हा दुरगमा भुमी अवस्थेला प्राप्त करतो. तो तृष्णा रहित होऊन दानशील, क्षमाशिल, कुशल, विर्यवान, बुद्धीमान व प्रज्ञावंत होतो. आठव्या अवस्थेत बोधिसत्व हा अचल होतो व त्याकडुन अनायासपणे कुशल कर्म घडतात व तो प्रत्येक कामात सफल होतो. नवव्या अवस्थेत बोधिसत्व हा साधुमती भुमीला प्राप्त करतो व सर्व धम्म पद्धती, दिशा व काळाच्या सीमांना जिंकून पार करतो. दहाव्या अवस्थेत बोधिसत्व धम्ममेध बनतो व त्याला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते.

बुद्धत्व प्राप्तीसाठी बोधिसत्व दहा पारमीता सुद्धा परिपूर्ण करतो. 1)शील- शील म्हणजे नैतिकता. अकुशलापासुन अलिप्त रहाणे व कुशल कर्म करण्यासाठी सिद्ध रहाणे. पापकर्म न करणे. 2)दान- दुसर्‍याच्या कल्याणासाठी आपली संपत्ती, शरीर अवयव व एवढेच नव्हे तर वेळ आल्यावर प्राणाचीही आहुती देण्यासाठी बोधिसत्व तत्पर असतो. 3)उपेक्षा- उपेक्षा म्हणजे अनासक्ति, फळाची विशेष अपेक्षा न करता निरपेक्ष भावाने साधना करण्यात बोधिसत्व मग्न असतो. 4)नैष्कर्म- बोधिसत्व संसारीक कामभोगांचा परिपूर्ण त्याग करतो. 5)वीर्य- बोधिसत्व नेहमी असाध्य गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो व ती गोष्ट परिपूर्ण होईपर्यंत थांबत नाही. 6) क्षांती- बोधिसत्व हा नेहमीच क्षमाशिल असतो. कुणी कितीही वाईट कृत्य केले तरी बोधिसत्व मनात घृणा न ठेवता त्यास क्षमा करतो. 7)सत्य- बोधिसत्व कधीही असत्य वाणी बोलत नाही तर तो नेहमीच सत्य व सकारात्मक बोलत असतो. 8)अधिष्ठान - अधिष्ठान म्हणजे बोधिसत्व आपल्या उद्देशापर्यंत पोहचण्याचा दृढ निश्‍चय करतो. 9)करुणा - बोधिसत्व हा सर्व मनुष्य व प्राणी याप्रती प्रेमपुर्वक दयाभाव  ठेवतो. 10)मंगलमैत्री - बोधिसत्व सर्व प्राणीमात्रांसंबंधी मंगल कामना करतो. शत्रू असो वा मित्र सर्वांचे कल्याण होवो अशीच मंगल भावना करतो. याप्रमाणे जीवण व्यतीत करणारा प्रत्येक व्यक्ती बोधिसत्व आहे असे समजावे.

- राहुल खरे, नाशिक .मो .9960999363