महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यावर प्रकाशझोत; ई-बुक्सचा जगभर मोफत प्रसार
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यावर प्रकाशझोत; ई-बुक्सचा जगभर मोफत प्रसार
औरंगाबाद येथील महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम
औरंगाबाद/प्रतिनिधी :
राष्ट्र उभारणीत विशेष योगदान असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा ‘सयाजी ज्ञानमाला’ उपक्रम चर्चेत आहे. या माध्यमातून राज्यभर सयाजीरावांवरील ई-बुकचा मोफत प्रसार करण्यात येत आहे. लवकरच या प्रकल्पाची दोन खंड प्रकाशित केले जाणार आहेत.
बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘सयाजी ज्ञानमाला’ उपक्रम महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद यांनी हाती घेतला आहे. या ज्ञानमालेत संपादक दिनेश पाटील आणि संस्थेचे सचिव ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके आकारास आली आहेत. या सयाजीराव यांच्या कार्याच्यावैविध्यपूर्ण संशोधनात धर्म विचार (बाबा भांड), कृतीशील सत्यशोधक (दिनेश पाटील), दानशूर महाराजा सयाजीराव (डॉ. राजेंद्र मगर), राजा रवी वर्मा ( धारा भांड मालुंजकर), प्राच्यविद्या (सौरभ गायकवाड), पुरोहित कायदा (देवदत्त कदम), शिवसृष्टीचे निर्माते (सागर मोहिते), विठ्ठल रामजी शिंदे (पवन साठे ), स्वतंत्र धर्मखाते (सुरक्षा धोंगडे), बडोद्यातील वेदोक्त (राजश्री कदम), स्त्रीविषयक कार्य (शिवानी धोंगडे), धर्मानंद कोसंबी ( निलोफर मुजावर), सत्यशोधक धामणस्कर (सत्यनारायण आरडे), भारताचा स्वातंत्र्य लढा (राहूल वनवे) अशी विविध विषयांवरील ई-बुक्स वितरीत करण्यात आली आहेत.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याबाबत महाराष्ट्रात पुरेशी माहिती नाही. या अनुषंगाने सयाजीरावांच्या कार्याचे वेगळ्या पैलूतून संशोधन करण्यात आले. सयाजीराव आधुनिक भारतातील प्रागतीक राजे होते. धर्म, जात, तत्वज्ञान, शिक्षण, संशोधन, शेती, उद्योग, आरोग्य, क्रिडा, साहित्य, संस्कृती, ललितकला, प्राच्यविद्या, पुरातत्व, आंतरराष्ट्रीय संबंध, स्वातंत्र्यलढा अशा विविध क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेले मानदंड आदर्श आहेत. महापुरुषांचे चिंतन इतिहासाचा पोकळ अभिमान बाळगण्यासाठी नसते. समकालीन समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी आणि जीवनसंघर्ष सकारात्मक करण्यासाठी महापुरूषांच्या कार्याचे पुर्नवाचन आवश्यक ठरते. या विचारातून ई-बुक ज्ञानमाला प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक आणि जातीय संघर्षावर, शेती-उद्योगातील संकटांवर मात करण्यासाठी आणि सुसंवाद वाढवण्यासाठी ज्ञानमाला उपयुक्त ठरेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यात 60 ई-बुक्सची निर्मिती करण्यात आली आहे. तर 50 ई-बुक्सचे काम सुरू आहे. या मालेत एकूण 110 ई-बुक्सचे तयार होत असून लवकरच छापील स्वरूपातही उपलब्ध होतील, अशी माहिती सचिव बाबा भांड यांनी दिली. आठ जुलैपासून एक दिवसआड ई-बुक्स फेसबुक, व्हॉट्सअप, ईमेल याद्वारे मोफत स्वरूपात सात्यताने जगभर पोहचवली जात आहेत. वाचक, इतिहास अभ्यासक आणि मान्यवरांचा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
0 Comments