चिपरी येथे मासिक ग्रामसभेत 
मागासवर्गीय सदस्याला शिवीगाळ

मागासवर्गीय संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

चिपरी/प्रतिनिधी :

चिपरी (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीची दि.31 ऒगस्ट 2021 रोजी मासिक ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत मागील मिटिंगमधील झालेले विषय वाचण्याच्या कारणावरून मागासवर्गीय सदस्याला शिवीगाळ करण्यात आली. 

मिळालेली अधिक माहिती अशी, आज चिपरी येथे ग्रामपंचायतची मासिक ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मिटिंगमध्ये ठरावांचे वाचन सुरू असताना मागील मिटिंगमध्ये झालेले विषय वाचण्यात यावेत यासाठी एका सवर्ण सदस्याने मागणी केली. यावेळी सर्व सदस्यांना मागील विषय माहिती असल्यामुळे पुढील विषय घेण्यात यावेत, असे सूचित मागासवर्गीय सदस्याने केले असता सवर्ण सदस्याकडून ‘त्या’ मागासवर्गीय सदस्यास शिवीगाळ करण्यात आली. यामुळे सभागृहामध्ये बराच गोंधळ उडाला. यावेळी ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच व 16 सदस्य या ग्रामसभेस उपस्थित होते.

घडलेला गंभीर प्रकार लक्षात घेऊन ग्रामसभा अध्यक्षांनी आदेशाद्वारे ’त्या‘ सवर्ण सदस्यास मागासवर्गीय सदस्याची माफी मागण्यास सांगितले. यानंतर त्याची सभागृहातून हकालपट्टी करण्यात आली. सभागृह सोडताना त्याने मागासवर्गीय सदस्याची माफी मागावी मगच सभागृह सोडावे अशा आदेशानंतर ‘त्या’ सवर्ण सदस्याने माफी मागून सभागृह सोडले. यानंतर ग्रामसभा पुर्ववत करण्यात आली. 

मात्र ग्रामसभेत मागासवर्गीय सदस्याला शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे काही तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात नवीन नाही. मागासवर्गीय समाजाला अजूनही लाचारीचे जगणे जगावे अशी अपेक्षा अशा सवर्ण समाजातील काही समाजकंटकांची असल्याचे यावरून दिसून येते. 

मागासवर्गीय सदस्य हा अनुसूचित जातीचा असून खुल्या प्रवर्गातून निवडून आल्यामुळे त्याच्यावर रोष ठेवून कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडवणूक करून त्याची नामुष्की करून अपमानित करण्यात येत असल्याचे कळते. असा प्रकार या आधीही झाला असून लवकरच मागासवर्गीय संघटना याप्रकरणी आंदोलन करणार आहेत. अशा समाजकंटकांच्यावर ऎट्रॊसिटी दाखल करून गुन्हा दाखल करावा याकरिता आक्रमक होऊन आंदोलन करणार असल्याचे कळते.