महिला हॉकी संघ पराभूत झाल्याने वंदना कटारियाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ, घराबाहेर फोडले फटाके

भारतीय पुरष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक पटकावलं आहे. आता सर्वांचे लक्ष महिला हॉकी संघाकडे लागले आहे. उपांत्य फेरीत महिला संघाचा पराभव जरी झाला असला तरी संपूर्ण भारत देश त्यांच्या आतापर्यंत खेळाचं कौतुक करत आहे. या सर्वादरम्यान, भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये, संपूर्ण देश उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असताना, संघाच्या पराभवानंतर हरिद्वारमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. रोशनबादमध्ये हरिद्वारच्या वंदना कटारियाच्या घराबाहेर काही लोकांनी फटाके फोडल्याचा आणि वंदनाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप केला आहे. खूप मागासवर्गीय खेळाडू असल्यामुळे संघ हरला असेही त्यांनी म्हटल्याचे वंदनाच्या कुटुंबाने टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.

वंदनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की काही तरुणांनी त्यांच्या घराबाहेर फटाके फोडले. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. वंदनाच्या कुटुंबीयांनी युवकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला नाही तर आम्ही आत्महत्या करु असे कुटुंबियांनी म्हटले आहे.

रोशनबाद गावात राहणारी वंदना कटारिया भारतीय महिला हॉकी संघात खेळत आहे. वंदनाने फक्त उपांत्यपूर्व सामन्यात हॅटट्रिक मारून भारतीय संघाला केवळ उपांत्य फेरीत नेले नाही, तर ती ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक करणारी पहिला खेळाडू ठरली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेंटिना संघाला पूर्ण ताकदीने लढत दिली. खडतर सामन्यात भारतीय संघ २-१ ने पराभूत झाला.

वंदनाचे भाऊ सौरभ कटारिया आणि पंकज कटारिया यांनी सांगितले की, काही तरुणांनी भारतीय संघ पराभूत होताच त्यांच्या घराबाहेर फटाके फोडण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून ते बाहेर आले आणि त्यांनी तरुणांना फटाके न फोडण्याची विनंती केली. त्यावेळी तरुणांनी शिवीगाळ सुरू केली.

या गलिच्छ प्रकरणासोबतच आश्‍चर्यकारक बाब म्हणजे गुगलवर भारतीयांनी महिला हॉकी संघ तसेच भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या विविध खेळाडूंची जात शोधण्यासाठी सर्वात जास्त सर्च केल्याचे उघडकीस आल्यानंतर जगभरातून भारतीयांच्या वैचारिक दिवाळखोरीवर सडकून टिका केली जात आहे.