माझ्या भिमरायावाणी सांगा पुढारी होईल काय ?

ही घटना साधारण 1940/41 सालची असेल. वर्ध्याचा बाजीराव पाटील हा एक बडं प्रस्थ होता. त्याची शेती गावाच्या महारवाड्याला लागूनच होती. त्यामुळे आपल्या शेताला लागून असलेल्या महार, मांग  लोकांनी कुंपनाच्या काट्या काढल्या, शेतात काट्या काढुन रस्ता पाडला, शेतात शौचाला बसले  किंवा शेतातील खाण्यालायक असलेलं पीक आणलं म्हणून नेहमीच बाजीराव पाटील हा महार वाड्यात येवून लोकांना अद्वतद्वा भाषेत बोलत असे, शिवीगाळ करत असे. त्याला कोणीही मांग महार उलटुन बोलत नसे उलट पाया पोटी लागून माफी मागून सगळे शांत बसत असत.

असच एकदा दौलत महार याच्या सुनेने कुंपणाची काटी का काढली? म्हणून बाजीराव पाटील हा महार वाड्यात दौलत महाराच्या घरासमोर आला व जोरजोरात शिवीगाळ करु लागला. पाटलाचा आवाज  ऐकून दौलत महार, त्याची बायको व सुन घराबाहेर आली. तर त्यांना पाहुन पाटलाला अजून जोर चढला व पाटील मनात येईल त्या भाषेत महारवाड्याचा उद्धार करु लागला. दौलत महार पाटलाच्या पायापोटी लागून गयावया करु लागला. माफी मागु लागला पण पाटील काही शांत होईना. उलट पाटलाने दौलत महाराला बेताने मारले. शेवटी दौलत महाराची बायको व सुन या आडव्या आल्या. पण पाटलाने त्यांनाही बेताने मारले. पाटील एवढ्यावरच थांबला नाही तर दौलत महाराच्या गर्भवती सुनेला सुद्धा बेताने मारुन लाल केले व नंतर पाटील रागारागाने निघुन गेला.

दुसर्‍या दिवशी दौलत महाराचा मुलगा कामावरुन घरी आला व त्याला हा प्रकार समजला. त्याला हे लाचारीचं जीवन जगण्याचा राग आला. त्याने विचार केला की आपल्या आई वडील व पत्नी यांना मारणार्‍या व शिवीगाळ करणार्‍या पाटलाला धडा शिकवायचाच. ऐके दिवशी त्याने एक कुर्‍हाड विकत आणली व ती लोहाराजवळुन तिला चांगली धार लावून घेतली व तो बाजीराव पाटलाला योग्य ठिकाणी येण्याची संधी शोधु लागला. बाजीराव पाटील हा नेहमीच संध्याकाळच्या वेळी महारवाड्याला लागुन असलेल्या शेतात रोज चक्कर मारायला येत असे. त्याच्या हाती सुद्धा परशु कुर्‍हाड नेहमीच असे. बाजाराच दिवस होता बाजीराव पाटील शेतातून परतला व शाळेच्या मैदानातून घराकडे निघाला. समोर बाजार भरला होता.दौलत महाराचा मुलगा शाळेच्या मैदानातच हातात कुर्‍हाड घेऊन बसला होता. जसा पाटील समोर आला तसा दौलत महाराच्या मुलाने पाटलाला सावध केले व पाटलावर तुटुन पडला. घावा मागून घाव घातले व पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडला व जाग्यावरच गतप्राण झाला.

ही बातमी हा हा म्हणता सार्‍या शहरात पसरली. सगळं शहर चिडीचुप झालं. पोलिस आले पंचनामे झाले. आरोपीला पकडलं. पुरावे घेतले शस्त्र जप्त केले. सगळे कायदेशीर सोपास्कार पार पाडले व केस वर्ध्याच्या सेशन कोर्टात चालवली. कोर्टाने सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली दौलत महाराच्या पोराला आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  दौलत महार, त्याची बायको व सुन आपल्या कर्त्या मुलाच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर टाहो फोडुन नुसते रडत राहिले.

देशात सफाई कामगारांनी संप पुकारला होता. डॊ.बाबासाहेब आंबेडकर तेव्हा मजुर मंत्री होते. त्यांच्या पक्षाने सफाई कामगारांच्या संपाला जाहिर पाठींबा दिला होता. इकडे वर्ध्यातही सफाई कामगारांनी संप पुकारला असल्याने महात्मा गांधी यांनी संप हाणुन पाडण्याच्या द्रुष्टीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वत: सफाई करण्याचे आव्हान केले. गांधीजी तेव्हा वर्ध्याजवळील सेवाग्राम आश्रमात राहत होते. तेव्हा मुंबईहुन डॊ.बाबासाहेब आंबेडकर नागपुरला जात होते व ते काही काळ गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्राम आश्रमात जाणार होते. त्यावेळी वर्ध्यातील  ‘स्वतंत्र मजुर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डॊ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागताची वर्धा रेल्वे स्टेशनवर जय्यत तयारी सुरु केली व तिथं सगळे कार्यकर्ते, महिला पुरुष, लहान मुलं बाबासाहेबांचा जयजयकार करण्यासाठी हातात हार तुरे घेऊन हजर होते. जो तो बाबासाहेबांना पाहण्यासाठी रेल्वे स्टेशन बाहेर मंडपात गर्दी करुन वाट पाहत होता.तसेच दौलत महार त्याची बायको व त्याची सुन बाबासाहेबांना भेटण्यासाठी मंडपात आले होते. काही वेळाने डॊ.बाबासाहेब आंबेडकर येणार ती रेल्वे आली. बाबासाहेब व्हाईसराय कार्यकारिणीत मंत्री असल्याने त्यांचा स्पेशल विशेष डबा मागे होता. नंतर बाबासाहेब आपल्या डब्यातून उतरले. त्यावेळी लोकांनी जोरजोराने जयजयकार करण्यास सुरवात केली. गगनभेदी जयजयकार सुरु झाला.नंतर बाबासाहेब स्टेजवर आले. त्यांनी कडक भाषण केले व ते गाधीजींना भेटायला जायला निघाले. तेव्हा वर्ध्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दौलत महार व त्याची बायको, सुन यांची बाबासाहेबांशी भेट घालून दिली. झालेला सगळा प्रकार बाबासाहेबांच्या कानावर घातला. हा प्रकार ऐकून बाबासाहेबांचा चेहरा लालबुंद झाला. ते त्वेषाने कडाडले, शंभर वर्षे शेळीसारखं गुलामीचं आयुष्य जगण्यापेक्षा वाघासारखं स्वाभिमानचं एकच दिवस जगा.’ नंतर बाबासाहेबांनी दौलत महाराला धीर दिला. त्याला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुचना दिल्या की, या पिडीत कुटुंबाला मदत करुन सगळी केसची कागदपत्र व पिडीत कुटुंबाला घेऊन मुंबईला राजग्रुहावर या. नंतर बाबासाहेबांनी सर्व केसचा अभ्यास करुन मुंबई हायकोर्टात अपील दाखल केली. त्यात आरोपी मुलाची पार्श्‍वभूमी, त्याचं तरुण वय, आईवडील, म्रुतकाची अरेरावी, दंडेलशाही, अन्याय करण्याची व्रुती, आरोपीच्या आई वडील व गर्भवती पत्नीस केलेली अमानुष मारहाण या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या व युक्तीवाद करुन आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कमी करुन फक्त साध्या सहा वर्षाच्या शिक्षेत रुपांतर केलं. पुढे 1947 साली देश स्वतंत्र झाला. देशातले सगळे कैदी सुटले. त्यावेळी  दौलत महाराच्या मुलाचीही तुरुंगातून सुटका झाली. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने  डॊ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचं दर्शन घेतलं, असे होतो आमचे बाबासाहेब !

आपला समाज आज कोणत्या अवस्थेत आहे. कोणत्या संकटांना तोंड देत आहे. गावोगावी शुल्लक कारणावरुन आपली तरुण पोरं मारली जात आहेत. वर्षोनुवर्षे न्यायावाचून सगळे खटले  प्रलंबित पडलेले आहेत. आरोपीं मोकाट फिरत आहेत. अशावेळी या भयभित समाजाला हिम्मत आधार देण्यासाठी एका भक्कम अशा नेत्याची गरज असते. तो नेता फोटो काढण्या पुरता नसावा, पत्रकारपरिषद घेण्यापुरता नसावा तर तो संकटकाळात न्याय देण्यासाठी प्रसंगी काळा कोट घालून कार्टात उभा राहणारा ही असावा. दिसतो तुम्हाला कोणी असा नेता माझ्या बाबासाहेबावाणी..?

सौजन्य : सोशल मिडिया (सदरील घटना ही, ‘मी पाहिलेले बोधीसत्व’ लेखक भिख्खु सुमेध यांच्या पुस्तकातील आहे. फक्त पोष्टमध्ये  काल्पनिक नावं टाकली आहेत.)