विज्ञानाचा वापर करून विज्ञानाचाच अपप्रचार

आज आपल्या देशातील परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानाच्याच विरोधात सुरु आहे. मोबाईल, टी.व्ही., कम्प्युटर म्हणजेच विज्ञानाचाच वापर करून विज्ञान कसं वाईट आहे, विज्ञानामुळे मानवजातीचे किती नुकसान होतं आहे, जुनं तेच सोनं होत अशा पद्धतीने विज्ञानाची पद्धतशीरपणे बदनामी सुरु आहे. म्हणजे उपभोग घ्यायचा विज्ञानाचा आणि वरून त्यालाच नावे ठेवायची. विज्ञान कसे चूक आहे हे सांगायचं असे प्रकार सुरू आहेत. न्यायालयांनी तरी असले प्रकार थांबवून प्रत्येकाला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत चिकित्सक बनण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज असतांना देशाच्या मा.उच्च न्यायालयाने अशा अपप्रचारात भरच घातली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी नुकतीच एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अशी टिप्पणी केली की, गाय हा ऒक्सिजन घेणारा आणि सोडणारा एकमेव पशु आहे. यासोबतच त्यांनी भारतात यज्ञादरम्यान आहुती देतांना गायीच्या तुपाचा उपयोग करण्याची परंपरा आहे. कारण यामुळे सूर्यकिरणांना विशेष ऊर्जा मिळते, ज्यामुळे शेवटी पाऊस पडतो. असेही म्हटले आहे. या गोष्टीचा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमे यांच्या मार्फत जोरात प्रचार सुरु आहे. अनेक चांगले शिकलेले लोक गोंधळून गेलेत की खरंच गाय ऒक्सिजन घेते आणि ऒक्सिजनच सोडत असेल काय? आणि होम-हवन करताना गायीचं तूप होमात टाकल्याने पाऊस पडत असेल काय? कारण ह्या गोष्टी देशाच्या उच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत. परंतु ऒक्सिजन सोडण्याची क्षमता फक्त आणि फक्त वनस्पतींमध्येच आहे. कुठलाही सजीव प्राणी हा ऒक्सिजन सोडू शकत नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. यज्ञात गायीचं तूप टाकल्याने सूर्यकिरणांना विशेष ऊर्जा कशीकाय मिळू शकते? त्याने पाऊस कसाकाय पडू शकतो? असं असत तर गेल्या हजारो वर्षांपासून राजस्थानसारख्या कोरड्या दुष्काळग्रस्त भागात लोकांनी यज्ञ करून त्यात गायीचं तूप टाकून पाऊस पाडला नसता काय? कुठलाही वैज्ञानिक आधार नसताना उच्च न्यायालयाने अशी टीप्पणी करणे हे अत्यंत क्लेशदायक आहे.

गायीबद्दल हाच दावा 2017 मध्ये राजस्थानचे शिक्षण आणि पंचायत राजमंत्री वासुदेव देवनानी यांनीसुद्धा केला होता. 2018 मध्ये आगरतळामध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्रिपुरा भाजपचे विप्लव देव यांनी  महाभारत काळापासून इंटरनेट अस्तित्वात होतं असा दावा केला होता. निवृत्त पायलट आणि पायलट प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कॅप्टन आनंद बोडस यांनीही दावा केला होता की प्राचीन भारतातल्या अंतराळ विमानांमध्ये आजच्या यंत्रणेपेक्षा जास्त आधुनिक रडार यंत्रणा होत्या. देशाचे मनुष्यबळ विकास राज्य मंत्री सत्यपाल सिंह यांनी 19 जानेवारीला 2021 ला औरंगाबाद येथील ‘अखिल भारतीय वैदिक संमेलनात’ वक्तव्य केलं होतं की  डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे, त्यामुळे तो शाळेच्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकला पाहिजे, पुढे ते म्हणतात की ‘कोणत्याही प्राचीन ग्रंथात माकडाचा माणूस होताना कोणाला दिसला नाही.’ अहो, ग्रंथ मनुष्याने माकड रूपात असताना लिहिलेत का? मग कुण्या माणसाला माकडापासून मनुष्य तयार होताना कसा दिसेल? ती काय तासाभराची प्रक्रिया आहे काय? एकपेशीय जिवाणूपासून मनुष्यप्राणी तयार होण्याच्या प्रक्रियेला करोडो वर्ष लागलेत.      

केरळमध्ये मोठा पूर आल्यानंतर 17 ऒगस्ट 2018 ला सध्या रिझर्व्ह बँक ऒफ इंडियाच्या मंडळावर काम करणारे एस. गुरुमूर्ती यांनी  शबरीमला मंदिरात सर्वांना प्रवेशाची मागणी केरळच्या पुराला जबाबदार आहे का? या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी विचार करायला हवा, असे वक्तव्य केले होते. म्हणजे त्यांना सबरीमला मंदिरात सर्वांना प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे केरळात पूर आला असं म्हणायचं होत. अनेकांनी गायीचं शेण, गोमूत्र,  तूप वापरण्याने कोरोना होत नाही असे दावे करून शेवटी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. राजकीय नेते हेतुपुरस्सर असे करतात तेसुद्धा चुकीचं आहे परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीच असे वक्तव्य करणे म्हणजे भारतीय राज्यघटनेत दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याला हरताळ फासणे नव्हे काय? अशी अवैज्ञानिक वक्तव्ये विज्ञानाच्याच माध्यमातून देशभरात पसरविली जातात आणि ती देशाच्या सर्वांगीण विकासाला मारक ठरतात.

आज हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शीख असा कोणत्याही धर्माचा माणूस असो तो विज्ञानापेक्षा आपल्या धर्माला जास्त महत्व देतो. आजचा सोशल मीडियाच बघा. व्हाट्सअप, फेसबुक वर असंख्य अशा पोस्ट तुम्हाला दिसतील ज्या विज्ञानविरोधी आहेत. त्या पसरवल्या जात आहेत कशा मार्फत? तर विज्ञानामार्फत. ह्या अवैज्ञानिक गोष्टी वाचणारे सुद्धा विचार करत नाहीत की ही पोस्ट किंवा ही माहिती आपल्याजवळ विज्ञानामार्फतच पोचली आहे. ख्रिश्‍चन धर्मात तर बायबलमधील सृष्टीनिर्मितीच्या कथेनुसार प्रभूने पहिल्या दिवशी प्रकाश निर्माण केला. दुसर्‍या दिवशी आकाश. तिसर्‍या दिवशी जमीन, समुद्र आणि वनस्पती निर्माण केल्या. सूर्य, चंद्र, तारे यांची निर्मिती चौथ्या दिवशी केली.पाचव्या दिवशी जलचर प्राणी आणि पक्षी निर्माण केले, तर सहाव्या दिवशी भूचर प्राणी, पुरुष आणि स्त्री यांची निर्मिती केली. सातव्या दिवशी रविवारी विश्रांती घेतली यावर तुम्ही आज विश्‍वास ठेवाल काय? तरी धर्मापुढे विज्ञानाची गिणती आपण ठेवत नाही. 

अकबराचे संपूर्ण भारतावर राज्य होते. ह्या हिंदुस्थानाच्या बादशहाला जेव्हा गरमी होई त्यावेळी त्याच्या बाजूला दोन-तीन सेवक उभे राहून पंख्याने रात्रभर अखंड हवा घालत असत. त्याकाळी त्या बादशहाला किती ह्या सोयी-सुविधा. आज विज्ञानाने हीच बादशहाची सुविधा एका झोपडीत राहणार्‍या गरीब आजीला सुद्धा फॅनच्या मार्फत करून दिलेली आहे. हे विज्ञानाचे उपकारच म्हणावे लागतील. आता काही लोक हीराशीमा-नागासाकीचे उदाहरण देवून विज्ञान कसे घातक आहे हे सांगतील परंतू त्याकरिता माणसाची मानसिकता, जग जिंकण्याची महत्वाकांक्षा जबाबदार होती हे मान्य करणार नाहीत. विज्ञान कसे वापरायचे हे शेवटी मानवाच्या हातात आहे हेसुद्धा आपल्याला स्वीकारावं लागेल.

टीव्ही हासुद्धा विज्ञानाचाच आविष्कार. टीव्ही च्या माध्यमातून वैज्ञानिक गोष्टींचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करण्याऐवजी विज्ञान ज्या गोष्टींना ठाम विरोध करत त्या भूत-प्रेत, चमत्कार, जादू अशा गोष्टींचा प्रचार केला जातो. लहान मुलांसाठीच्या कार्टून मालिका असोत की मोठ्यांसाठीच्या विविध सिरियल्स. त्यातून सतत अवैज्ञानिक गोष्टींचा मारा मानवी मेंदूवर केला जातोय. विविध यंत्र, नजर लागू नये-अपघात होऊ नये म्हणून रक्षा कवच अशा अंधश्रद्धा फैलावल्या जाताहेत. अहो 500 रुपयांच्या रक्षा कवचाने अपघात टाळता आले असते तर लोकांनी लाखो-करोडो किंमतीच्या एअरबॅग असणार्‍या गाड्या कशाला खरेदी केल्या असत्या? मुलांच्या वयाच्या 1 ते 5 वर्षांपर्यंत त्यांच्या मेंदूमध्ये जे काही साठवल्या जातं ते आयुष्यभर निघत नाही. म्हणजे लहानपणी जर त्याच्या आईने त्याला म्हटले की, बेटा अंधारात जाऊ नको तिकडे भूत असते. त्याने भूत कधीच पाहिलेलं नसते पण ती गोष्ट त्याच्या मनात इतकी घट्ट बसते की तो लहान मुलगा 80 वर्षाचा म्हातारा झाला तरी अंधाराला घाबरतो. कारण त्याच्या आईने त्याला सांगितलेलं असत की अंधारात भूत असते. इतकी साधी-छोटी गोष्ट इतका गंभीर आणि दीर्घ परिणाम करू शकते तर आज ज्या काही कार्टून मालिका टीव्हीवर दाखविल्या जातात त्यात सतत चमत्कार, सुपर पॊवर, सुपर हिरो, काला जादू, शैतान, भूतप्रेत हेच सर्व दाखविल्या जाते. त्यामुळे ही पिढी पुढे चालून प्रयत्नवादी बनेल की दैववादी (नशिबावर विश्‍वास ठेवणारी) बनेल याच उत्तर एखादा लहान मुलगासुद्धा देऊ शकेल.  

संशोधक हे कायम मानवी जगणे अधिक सहज आणि सुलभ व्हावे याकरिता प्रयत्न करीत असतात.  पु. ल. देशपांडे आपल्या  ‘एक शून्य मी’ या पुस्तकात म्हणतात की ‘अनेस्थिशियाचा (भूलशास्त्राचा) शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही साधुसंतापेक्षा अधिक मोठा वाटतो. आता ऎनेस्थिशियाचा शोध लागण्यापूर्वी ज्या काही शस्त्रक्रिया केल्या जात असत त्यांचा विचार करा. साधी एखाद्या माणसाची मांडी कापायची म्हटलं तर त्याच्या दोन्ही हातावर-दोन्ही पायावर दोन मानस आणि डोकं दाबून धरायला एक माणूस लागायचा. 5-7 लोक मिळून माणसाला घट्ट दाबून धरायचे आणि शस्त्रक्रियेदरम्यान तो वेदनेने जनावरासारखा ओरडायचा. पण आज? आपल्या डोळ्यात बारीक कचरा गेला तरी वेदनेने अस्वस्थ होणारे आपण आज आपला सर्वत नाजूक अवयव डोळा कापून डोळ्यांवर शस्त्रक्रिया होऊन जाते तरी माहित पडत नाही. अगोदर भारतात माणसाचे सरासरी जीवनमान अगदीच कमी होते. परंतु वैद्यकशास्त्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हे जीवनमान प्रचंड वाढवले. प्लेग, कॊलरा, देवी, मलेरीया, टीबीने पटापट माणसे मरत होती. मोठमोठे राजे सुध्दा प्रचंड संपत्ती असून रोगांवर इलाज नसल्याने मरत असत. लोकांनी पूजा-होम-हवन सर्व उपाय करून बघितले पण फायदा झाला नाही. पण विज्ञानाने यावर लस-औषधे शोधुन मानवजातीवर अनंत उपकार करुन ठेवलेत. कोरोनावरही विज्ञानानेच लस शोधली आहे. तरीसुद्धा आपण विज्ञानाचा अपप्रचार करत असू तर ते चुकीचेच आहे.

मोबाईल म्हणजे विज्ञानाचीच देणगी. याचा योग्य वापर करण्याऐवजी आपण हा मॅसेज 11 लोकांना पाठवा चमत्कार होईल. तुमची अडकलेली कामे होतील. अशा अंधश्रद्धा पसरविणारे मॅसेज यावर पाठवतो. काला जादू आणि भूतप्रेत ह्या ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यावरचे एडिट केलेले खोटे व्हिडीओ बनवून पसरवितो. आपण आपल्या धर्मातील सर्वोत्तम गोष्टी जगासमोर मांडून, धर्मातील वाईट आणि खोट्या गोष्टींना तिलांजली दिली पाहिजे नाहीतर जगभर आपलं हस होऊ शकत. आज आपल्या देशाच्या जबाबदार व्यक्ती आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वीच शस्त्रक्रिया व्हायच्या म्हणतात. राफेल सारख्या अत्याधुनिक फुल्ली आटोमॅटिक विमानांना कुणाची नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधतात.  आपल्या देशाची रक्षा करण्यासाठी 1600 कोटी च राफेल आणलं आणि त्या राफेलच रक्षण 2 रुपयांची लिंबू-मिरची करणार काय? असे वागून हे लोक देशातील नागरिकांच्या मनात अंधश्रद्धा भरतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. धर्मप्रेम-धर्माभिमान जागृत करायचा असेल तर इतर अनेक गोष्टी आहेत. धर्मातील चांगल्या गोष्टींना समोर आणून त्याचा पुरस्कार करायला पाहिजे. इथे धर्मातल्या वाईट गोष्टी समोर आणून जगासमोर स्वतः च हस तर करून घेतोच पण देशवासीयांमध्ये सुद्धा आपण सरळ सरळ अंधश्रद्धा पेरतो. आपल्यापेक्षा आपल्या मागच्या पिढीला, आपल्या पूर्वजांना खूप जास्त ज्ञान आणि माहिती होती हा गोड गैरसमज प्रत्येक भारतीयाने मनातून कायमचा काढून टाकला पाहिजे. जर खरंच तसं असत तर आजपासून हजारो वर्षांपूर्वीच विमान, टीव्ही, मोबाईल, विविध दुर्धर रोगांवरील औषधांचा शोध लागला असता.

हजारो वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनीच हे सर्व शोध लावले होते असे म्हणून म्हणून स्वतःच्याच मनाला दिलासा देण्याच्या या मानसिकतेमुळेच एका साध्या सुईचा देखिल शोध आपण लावू शकलेलो नाही आणि विदेशातील लोकांनी लावलेल्या लाखो शोधांचे आपण केवळ भोगवटदार म्हणून उरलो आहोत. तेव्हा भूतकाळात रमून नवीन शोध लागणार नाहीत. त्याकरिता आपण वर्तमानात जगून प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याकरिता विज्ञानाव्दारे निर्मित विविध दृक्श्राव्य माध्यमातून चिकित्सक, विज्ञानवादी व नवीन शोध लावणारी पिढी कशी घडेल हा दृष्टिकोन ठेवून तशाच गोष्टींचा प्रचार-प्रसार करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे.