घटोत्कच लेणी व धम्मचक्र प्रवर्तन

एक रुग्ण आहे, अगदी अंथरुणावर खिळून पडलेला. ज्याचा नित्य मृत्युसोबत संघर्ष चालू आहे. अनेकांना वाटत आहे की तो जगाला पाहिजे. काहीं लोकांनी त्याला मृत्यूशैय्येवर मर म्हणूक सोडुन दिलं आहे. काहींना तर तो जगतो किंवा मरतो यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. अशीच काहीशी दयनीय अवस्था झाली आहे या घटोत्कच लेणीची. अनेक लोकांना लेणीचे संवर्धन व्हावे असे वाटते तसे काही त्यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहेत. तर काही लोकांना या लेणीवर अतिक्रमण होऊन सांस्कृतिक वारसा नष्ट व्हावा असेही वाटत आहे. काही लोकांना ही लेणी जगते की नष्ट होते याच्याशी काहीही घेणे देणे नाही. घटोत्कच ही लेणी अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व विकृत लोकांच्या दुषित मानसिकतेशी संघर्ष करत आहे, जगण्यासाठी व आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, इतरांपर्यंत भगवान बुद्ध व त्यांचा इतिहास पोचवण्यासाठी...

औरंगाबादमधील अजिंठा लेणी रस्त्यापासून काही किमी अंतरावर सिल्लोड तालुक्यापासून पुढे गोळेगाव येथुन अंबाई गावातुन जिंजाळे गावामधील ग्रामीण भागातील एक महायान पंथातील लेणी आहे घटोत्कच लेणी. या गावातील जनता अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाची आहे.

भगवान बुद्धांच्या काही ऐतिहासिक घटनांची पुराव्यानिशी माहिती देणारी, येणार्‍या पर्यटकांना विनम्रतेने आव्हान करणारी, तुम्ही काहीही करा व कितीही करा मी कालही होते व आजही आहे अशी साद घालणारी, असलेली व कदाचित असुनसुद्धा नसलेली असुरक्षित लेणी आहे घटोत्कच लेणी. ही लेणी अतिशय निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या उतारावर कोरलेली आहे. येथे येण्यासाठी पुरातत्व खात्याने दगडी पायर्‍या बनविलेल्या आहेत, जर रस्ता पण बनवून दिला असता तर दुधात साखर पडावी अशी परिस्थिती झाली असती. लेणीच्या सुरुवातीलाच नागवंशीय राजा मुचिलिंद यांचे शिल्प आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही महिला सुगंधित जलकुंभ घेऊन जणू आत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर सुगंधित जलाचा वर्षाव करत आहे. जे अनागत बुद्ध आहेत व जे भविष्यात बुद्ध होणार आहे त्या दोघांच्या मधे शाक्यमुनी बुद्ध आहेत. हे सर्वच आशिर्वाद देत आहे. हा आशिर्वाद कोणासाठी आहे? लेणी संवर्धन करणार्‍यांसाठी आहे की लेणी दुषित करणार्‍यांसाठी अर्थातच चांगले व वाईट सर्वांसाठीच.

धम्मचक्र प्रवर्तन शिल्प व त्याचे ऐतिहासिक महत्त्व - या लेणीमध्ये प्रवेश केल्यावर भगवान बुद्धांचे धम्मचक्र प्रवर्तन शिल्प पाहून असे वाटते की जणू भगवान बुद्ध वाराणसीमधील आपल्या अनुयायांना धम्माचा प्रथम उपदेश देऊन धम्मचक्र प्रवर्तनच करत आहे. भगवान बुद्ध वाराणसीच्या ऋृषिपतन मधील मृगदाय वनामध्ये विहार करत आहेत. तिथे भगवान बुद्ध भिक्षुंना संबोधित करत आहेत, हे भिक्षुंनो, सन्यस्त जीवन जगत असताना दोन टोकाच्या गोष्टी आहेत ज्यांना करणे टाळले पाहिजे. कोणत्या दोन? जे हीन, अयोग्य, अनार्य व अनार्थाने भरलेले कामभोगांचे जीवन व दूसरे दुखमय, अनार्य व अनर्थ युक्त आत्मपीडा व देहदंडन तप करणे. 

भिक्षुंनो, या दोन्ही टोकाच्या गोष्टीकडे न जाता, तथागतास मध्यम मार्गाचा साक्षात्कार झाला आहे. जो दृष्टी उत्पन्न करणारा आहे, ज्ञान देणारा आहे, शांतीसाठी पुर्ण ज्ञान व निर्वाण प्राप्तीसाठी परिपूर्ण आहे. तो कोणता मध्यम मार्ग आहे, ज्याचा तथागतास साक्षात्कार झाला आहे, जो दृष्टी उत्पन्न करणारा आहे, ज्ञान व निर्वाण प्राप्तीसाठी परिपूर्ण आहे... तो मध्यम मार्ग आर्य आष्टांगीक मार्ग र्(ींधश्‍चझस्त्र ्रूघह्रखमह्लधझस्र् ्रश्मख) आहे, जो आहे.

सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी. भिक्षुनो हाच आहे मध्यम मार्ग जो दृष्टी व ज्ञान उत्पन्न करणारा आहे.

भिक्षुनो, हे दुःख आर्यसत्य आहे, जन्म, म्हातारपण, आजार दुःख आहे, मरण सुद्धा दुःख आहे, प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे, अप्रिय व्यक्तीची भेट दुःख आहे, जे ईच्छित आहे ते न मिळने दुःख आहे, पाच उपादान स्कंध दुःख आहे. भिक्षुनो, हा दुःख समुदाय आर्यसत्य आहे. ही काम तृष्णा, भविष्य तृष्णा व विभव तृष्णा दुःख समुदाय आहे. भिक्षुनो, हे दुःख निरोध आर्यसत्य आहे. तृष्णेचा सर्वथा नाश करुन  निर्वाणाचा लाभ होऊ शकतो, हे हेच दुःख निरोध आर्यसत्य आहे.

भिक्षुनो, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा हे दुःखचा नाश करुन निर्वाणाचा लाभ करुन देणारे आर्यसत्य आहे, हाच आर्य आष्टांगीक मार्ग आहे. भिक्षुनो, हे दुःख आर्य सत्य आहे. हे पुर्वी न ऐकलेल्या अज्ञात गोष्टींमधे मला दिव्यदृष्टी उत्पन्न झाली आहे. ज्ञान, प्रज्ञा, व विद्या उत्पन्न झाली आहे. हे आर्यसत्य जाणुन घेण्यायोग्य आहे. जे दुःख समुदाय आर्य सत्य व दुःख निरोध आर्य सत्य आहे. हे पुर्वी न ऐकलेल्या अज्ञात गोष्टींमध्ये मला दिव्यदृष्टी उत्पन्न झाली आहे. भिक्षुनो दुःख निरोध आर्यसत्याची भावना केली पाहिजे. दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्याची भावना केली पाहिजे. 

जोपर्यंत या चारही आर्यसत्याची बारा प्रकारे भावना करुन मला यथार्थ विशुद्ध ज्ञान दर्शन झाले नाही, तोपर्यंत मी दावा नाही केला की, देव, मार, मनुष्यांमधे, श्रमनांमधे अनुत्पन्न सम्यक संबोधिला मी प्राप्त केले आहे. मला चारही आर्य सत्याचे यथार्थ ज्ञान दर्शन जेव्हा झाले तेव्हाच मी दावा केला की देव, मार, मनुष्य व श्रमण यामध्ये प्राप्त करण्यास कठीण अशा सम्यक संबोधिला मी प्राप्त केले आहे. माझ्यामध्ये ज्ञान दर्शन उत्पन्न झाले आहे. माझी विमुक्ती अचल आहे, माझा हा जन्म अंतिम आहे. भिक्षु संतुष्ट होऊन तथागताच्या उपदेशाचे अभिनंदन करत आहेत. तथागताचा उपदेश ऐकून आयुष्यामान कौंडिण्य यांना न ऐकलेल्या धम्मामध्ये दृष्टी उत्पन्न झाली व ते बघून भगवान बुद्धांनी उदान वाक्य म्हटले, ओहो कौंडिण्यला समजले, ओहो कौंडिण्यला समजले. असे ऐतिहासिक महत्त्व या लेणीस प्राप्त आहे. या धम्मचक्र प्रवर्तनास भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये असाधारण महत्त्व आहे. मग प्रश्‍न असा निर्माण होतो की, असे जागतिक पातळीवर असाधारण महत्त्व प्राप्त असणारी ही लेणी दुर्लक्षित, शासकीय सेवा सुविधांपासून वंचित व लेणी प्रेमी व संवर्धक यांपासून उपेक्षित का आहे?

ही लेणी दुर्लक्षित, उपेक्षित व  वंचित का व्हावी व काय कारणे असावीत. 1) गोळेगाव ते जिंजाळे येथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही आहे. 2) जिंजाळे गावात घटोत्कच लेणी ला जाण्यासाठी हायवे जवळ कुठल्याही स्वरूपाचा शासकीय फलक लावण्यात आला नाही आहे. त्यामुळे नवीन येणार्‍या पर्यटकांची दिशाभूल होते. 3) जिंजाळे गावात आल्यानंतर घटोत्कच लेणीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही आहे. येथे जाण्यासाठी अनेक शेतांमधुन कष्टदायक मार्गाचा अवलंब करावा लागतो. 4) या लेणीमधील गर्भगृहास मोठा तडा गेलेला असुन त्यामध्ये विकसित वटवाघूळ यांचे साम्राज्य आहे. त्यास कधीही नूकसान पोहचुन मोठा अपघात घडु शकतो. 5) याठिकाणी शासनाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही आहे. 6) या ठिकाणी पर्यटकांना शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही आहे. 7) याठिकाणी शासनाकडून सुरक्षा रक्षक नेमले नसल्याने काही विकृत मनस्थितीचे लोक येथील भिंतीवर नावे लिहून ऐतिहासिक वारसा खराब करण्याचा प्रयत्न करतात. 8) याठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने कदाचित पर्यटकांना येथे येण्यासाठी असुरक्षित वाटत असावे. 9) येथे पर्यटकांना अन्न पुरवठा करणारी कॅन्टीन असायला हवी होती. 10) घटोत्कच लेणी येथे आल्यावर लेणी संदर्भात परिपूर्ण माहिती देणारे फलक लावण्यात यायला हवे. 11) घटोत्कच लेणी याठिकाणी वटवाघूळ यांची विष्टाचे थरावर थर अतिप्रमाणात साचले असुन याची नियमीत साफसफाई केली जात नाही.

याच लेणीच्या गर्भगृहातील छतास मोठा तडा गेला आहे. यावर काही उपाययोजना न केल्यास ही लेणी कधी ही कालवश होऊ शकते. या लेणीमधील सातवाहन कालीन शिलालेख जवळ जवळ नष्टच झाला आहे. नागवंशीय राजे यांचे शिल्प खराब झाले असून लेणी मधील अनेक शिल्पांना नुकसान व ईजा पोचली आहे. या लेणीचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक व अभ्यासक येथे येत असतात. अनेक वर्षांपासून प्रकृती व मानवी विकृती या दोघांशी ही लेणी स्वतच संघर्ष करत आहे. 

शायर वसीम बरेलवी यांची गझल आठवते,

आंधियों के इरादे तो अच्छे न थे,

ये दिया कैसे जलता हुआ रह गया । या शायर वसीम बरेलवी यांच्या गझली प्रमाणे - मारणारांचे विचार तर वाईटच होते पण तुझ्यातच हिंमत होती जगण्याची, टिकून राहण्याची व तुझ्यातला बुद्ध जगाला देण्याची - असे घटोत्कच लेणीबद्दल वाटते. 

बौध्द बांधवांनी लेणी संवर्धनासाठी विचार करावा नाहीतर एक दिवस असा येईल तुमच्या पुढील पिढ्या तुम्हाला प्रश्‍न विचारतील, इथेच घटोत्कच लेणी होती. ती आता कुठे आहे? ही लेणी संवर्धन करण्यासाठी अनेक कार्यशाळा व आंदोलने झाली त्यावेळी तुम्ही कुठे होता? हे ऐकून तुमची मान शरमेने खाली जाईल व तुम्ही लेणी संवर्धन करण्यासाठी सहभागी नाही झालात याचीही तुम्हाला लाज वाटेल व दु:खही होईल की, तुम्ही चळवळीला वेळ न दिल्याने अनेक बुद्ध लेण्यांवर अतिक्रमणे झालीत व ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा नष्ट झाला. 

तरी अजूनही वेळ गेलेली नाही तरी लेणी संवर्धनासाठी बौध्द बांधवांसह लेणी संवर्धकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृतीतील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी तत्पर असले पाहिजे.