आम्ही अंधश्रद्धाळु...?

अमावस्या आली.....? गाडीला लिंबू, मिरची, बिब्बा बांधा. कारण गाडीला अपघात होत नाहीत...! नवीन घराची, विहिरींची, दुकानांची, दवाखाण्याची, वास्तू शांती व प्रवेश करायचा आहे ...? सत्यनारायण पूजा करा...! नोकरी, लग्न, मूलबाळ न होणे, व्यवसायात अपयश येते? तर मग बोकड, कोंबडे, कापा... यात्रा करा.. मरीआई, म्हसोबा, देवस्कीची जत्रा करा...! अशिक्षित, अज्ञानी, आणि गांजलेली लोकच ही असली कर्मकांड करतात का..? तर त्याचे उत्तर नाही असे असेल. डॊक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनिअर, सरकारी कर्मचारी, शिक्षक, व्यापारी, असो नाहींतर मंत्री असो, स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत, आणि सुजान समजणारी, पांढरपेशी जमातच कर्मकांड आणि जुन्या रूढींना, मुंगळ्याप्रमाणे चिकटून बसले आहेत. त्यामुळेच विवेकवाद, वैचारिक प्रगल्भता, वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्याचा समाजात बोजवारा उडाल्याचे चित्र दिसते आहे. 

शिक्षणाने मनुष्य सुजान, सुसंस्कृत आणि सुशिक्षित होतो, असे म्हणतात. मात्र सुशिक्षित झाला म्हणजे सामाजिक शहाणपण येतेच असे मात्र मुळीच म्हणता येत नाही. श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील भेद समाजाने जाणून घेऊच नये, म्हणून विशिष्ट विचारधारा असणार्‍या काही पक्ष, संघटनाच या सुशिक्षित वर्गाचा बुद्धिभेद करत आहेत. त्यामुळे आज सुशिक्षित समजला जाणारा समाजच अंधश्रद्धा आणि वाईट चालीरिती, रूढी परंपरा, यामध्ये स्वत:ला गुरफटून घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच पुन्हा अशिक्षित आणि अज्ञानी लोक बकर्‍याच्या कळपाप्रमाणे त्यांचे अनुकरण करत असतील..? तर मग दोष द्यायचा कोणाला असा प्रश्‍न निर्माण होतो. तिरुपती बालाजी, साईबाबा व अशा अनेक मंदिरातील दानपेटीत लोक पावतीशिवाय कोट्यावधी रुपये आणून टाकतात. व्यापारी लोकांच्या विशेषतः या देणग्या असतात. ते धंद्यात पाच पार्टनर आहेत, असे मानतात. आणि पाचवा पार्टनर देवाला बनवतात. म्हणजेच लोकांना गंडवून झालेल्या नफ्या पैकीं पाचवा हिस्सा देवाला अर्पण केला की, मनातील अपराधी पणाची भावना कमी होते. असे सुशिक्षित आणि समाजाचे काही तरी देने लागतो असे म्हणणार्‍या व्यापारी वर्गाचे मत आहे. 

काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसारमाध्यमात मोठी गाजली होती. पाचवी शिकलेला आणि कोणतीही  वैद्यकीय पदवी न घेतलेला,  अस्लम बाबा स्वतःच्या बोटांनी शरीर फाडून शस्त्रक्रिया करीत असे. हृदय, किडणी, यकृत अशा अवघड शस्त्रक्रिया करून लोकांना तो बरे करतो असा समज असल्याने रोज हजारो लोक त्यांच्याकडे गर्दी करत होते आणि त्यामध्ये सुशिक्षित लोक आघाडीवर होते हे अधिक सांगण्याची गरज नाही. शास्त्रीय ज्ञान, त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान आज इतके प्रगत झाले आहे की, निसर्गात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीला कार्येकारण भाव असतो हे मान्यच करावे लागते. तरी ही काही वर्षांपूर्वी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीच चक्क गणपतीची मूर्ती दूध पिते....! हे जाहीररीत्या मान्य केल्याने त्यावेळी मोठा वैचारिक गोधळ निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीपासून विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ही मतदानाच्या आदल्या रात्री गावातील, चौकात एक अदभुत आणि रोमांचकारी दृष्य बघायला मिळते. ते म्हणजे काळ्या दोर्‍यात ओवलेले आणि हळद कुंकु लावलेले. लिंबू, बिब्बा, काळ्या कापडाची शिवलेली बाहुली, हे वशीकरण आणि दुसर्‍याला पराभुत करण्यासाठी योजलेले उपाय पाहून पुरोगामी महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय हेच मुळी लक्षात येईनासे झाले आहे...! 

नव्या गतिमान समाज जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मृत्यूची एक सनातन भीती बसलेली असते. त्यामुळे गळ्यात ताईत बांध, महामृत्युंजय जप कर, हातात, गळ्यात गंडा, दोरा बांध, देवरुषी सांगतील ते अघोरी उपाय करत अशाप्रकारे ही अदृष्टाची भीती व्यक्तीला सतत पोखरत असते. त्यामुळेच डॊक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस निरीक्षक सारखे अधिकारी ही समाजातील अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा पाहून ही, काहीच न करता मूग गिळून गप्प बसतात. याचा अर्थ आम्ही सगळेच अंधश्रद्धाळु आहोत असा होतो असा होत नाही काय..?

कर्नाटकातील सौंदती सारख्या ठिकाणी आजही मुलींना देवीला सोडन्याची प्रथा बंद झालेली नाही, हे वास्तव आहे. तेथील समाजसेवक उघड्या डोळ्यांनी पाहतील. पण कारवाई करण्यासाठी धजत नाहींत हे आश्‍चर्यकारक आहे. चंद्रपूरच्या वनीखुर्द गावात भानामतीच्या नावाखाली महिलांना भर चौकात बांधून गंभीर मारहाण करण्यात आली हाती. तर यवतमाळच्या तेजनी गावात आजारी महिलेवर सासरच्यांनी जादूटोणा केला अशा संशयाने माहेरकडील मंडळींना माराहाण करण्यात आली होती. कोकणी गावात एक अंगणवाडी सेविका जादूटोणा करते असा संशय घेऊन चक्क तिचा खून करण्यात आला. स्वतःला मूल व्हावे म्हणून देवरूषाच्या सांगण्यावरून कागल तालुक्यातील सोनाळी या गावातील वरद पाटील या बालकाचा एका माथेफिरून बळी दिला. आजरा तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतीत तर चक्क संविधानाची अवहेलना करत सत्यनारायण पूजा करण्यात आली. जमिनीतून गुप्त धन शोधून काढण्याचे खटपट करताना अघोरी पूजा करणे, बळी देणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. तर भुदरगड तालुक्यातील टिकेवाडी येथील गावकरी रोगराई पासून मुक्तता मिळावी यासाठी दरवर्षी संपूर्ण गावच खाली करतात व शेतशिवारात राहायला जातात. या सर्व घटना श्रद्धेतून घडल्या की अंधश्रद्धेतून घडल्या याचे आत्मचिंतन प्रत्येकाने करावे. आणी या सर्व श्रध्दा की अंधश्रद्धा हे ज्याचे त्याने ठरवावे. 

20 डिसेंबर 2013 रोजी जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. तेव्हापासून आजवर हजारो गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाले असतील. जादूटोना विरोधी विधेयक करणारा सामाजिक न्याय विभाग आणि या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेला गृह विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याने अशा अनेक दुर्दैवाने घटना घडत आहेत. मात्र त्याची नोंद कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये होत नाही, हे प्रशासनाचे यश म्हणावे की अपयश..? हाच जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात यावा म्हणून डॊ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे अशा दिग्गजांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागावी..?  पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने या घटना लाजिरवान्या व लांच्छनास्पद आहेत. यासाठी आता सुशिक्षितांनी अंधश्रद्धा विरोधात प्रबोधनाची चळवळ जोमाने आणि नेटाने राबवायला हवी आहे.

शाळा न शिकलेले संत गाडगेबाबा, बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक घटनांच्या चिकित्सा केल्या. शिक्षणाचा आणि बुद्धिप्रामाण्यवादी असण्याचा काही संबंध नाही हे या उदाहरणावरून सांगता येईल. पुढची पिढी शास्त्रज्ञ, संशोधक नाही झाली तरी चालेल मात्र गाडगेबाबा, बहिणाबाई चौधरी यांच्या सारखी विवेकी व्हावी इतकी तरी अपेक्षा बाळगुया..!

- अशोक कांबळे (हसूर खुर्द) 9923638244