‘संविधान दिनीच संविधानाचे हनन’
‘संविधान दिनीच संविधानाचे हनन’
दि. 27/11/2021
कोल्हापूरात विधानपरिषदेसाठी सतेज पाटील बिनविरोध ही बातमी वाचली आणि मन कासावीस झालं. आजपर्यंत ‘सो कॉल्ड’ पुरोगामी समजल्या जाणार्या काँग्रेस, राष्ट्रवादीनं असं काय केलं? की भाजपला ‘महाडिक’ गटाला माघार घ्यावी लागली. दोन्ही पार्ट्यांकडे प्रचंड पैसा मग कोणत्या कारणासाठी या दोघांमध्ये समझोता झाला असेल, असं वावटळं काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असतील.
इकडं बंटी तर तिकडं धनंजय अशी इर्ष्या असताना कार्यकर्त्यांमध्ये अनेक राडे झाल्याचं अनेक वर्षे कोल्हापूरनं पाहिलं, भोगलं. पण अचानक या एकोप्यानं त्यांनाही आता कोणामागं फिरायचं काय कळना झालंय.
असं राजकीय चित्र असलं तरी याची चालं खोल कुठतरी दडली आहे. हे राजकीय अचानक घडलेलं नाही. हे एका दिवसाचं, एका रात्रीचं काम नाही. मुळातच संविधान दिनी बिनविरोध निवडणूक हे कसं काय होऊ शकतं? संविधानानं सर्वांना समान हक्क, समान मताधिक्कार दिलायं. आणि त्या मताचा वापर न करू देणंच म्हणजे संविधानाचं हनन. असंच घडलय आणि घडवलंय या कोल्हापुरात. ते पण राजर्षि शाहू महाराजांच्या कोल्हापुरात..! तेही मुद्दाम. ते पण संविधान दिनीच.
राजकीय काहीही असो..! मात्र या एकोप्यानं मात्र हे सिध्द झालं की भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते एकाचं विचाराचं काम करतात. त्यांना जनतेच्या सुख- दु:खाचं काही नाही. गरीब, वंचित, दु:खी समाज जसा जगत आहे तसा जगत रहावा असंच काम हे लोक करत आहेत. फक्त सत्ता असली की झालं. मग ती कोणत्याही पक्षाची का असेना? त्यांना विचाराचं, प्रामाणिकपणाचं काहीही देणं घेणं नाही. कार्यकर्ता मात्र इकडं मरतो, बोंबलतोय, मी बंटी, मी सतेज, मी धनंजय, मी मुश्रीफ...!
कोल्हापूर हे एक उदाहरण महाराष्ट्रात कितीतरी विधान परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती बिनविरोध केल्या जात आहे. कारण काय? जनतेला मत देण्याचा अधिकार नाकारणे या व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण असू शकत नाही. त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित केले की झालं. मग ते भविष्यात तो अधिकार आपणाला आहे हे पण विसरून जातील आणि त्यांचे ध्येय साध्य होईल.
गेल्या 70 वर्षात राजकीय प्रामाणिकपणा या भारतीय जनतेने पाहिला नाही त्यांना प्रामाणिकपणा म्हणजेच नेमकं काय हे ही माहित नाही. नुसतं घोटाळे, बोगस प्रकरणे झालं. राष्ट्रवादीतील अजित पवार सकाळी उठून भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करतात. लगेच संध्याकाळपर्यंत सरकार कोसळतं. कुठे आहे प्रामाणिकपणा, शब्दाला किंमत, विचाराला किंमत? कोणत्याही पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला नाही की असा का केलं? सगळे सरकार कोसळले या बातमीत मग्न. मेन स्ट्रिम मिडिया इतरा बातमीला मोठं करण्यात मग्न. पण मूळ प्रश्नाला बगल द्यायचं ते काम करतात.
हे आता पक्क आणि सिध्द झालंय की, आता आंबेडकरी विचाराशिवाय गत्यंतर नाही. आंबेडकरी विचाराची कास धरल्याशिवाय या देशाचं नाही तर या राजकीय परिस्थितीचं काहीही होणार नाही. नाहीतर असंच प्रत्येक संविधान दिनीच आणि प्रत्येक दिवशी संविधानाचे हनन होत राहणार आणि आम्ही बघत, बातम्या वाचत राहणार...! ओबीसी, मुस्लिम, वंचित, अनुसूचित जाती-जमाती यांनी ही लवकरच चाल ओळखावी...! अन्यथा मरण अटळं..!
- अमित वाघवेकर,
उपसंपादक, साप्ताहिक भीमयान
27/10/2021
0 Comments