25 डिसेंबर: समाजक्रांती दिन

महामानव डॊ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाड येथे दिनांक 25 डिसेंबर, 1927 रोजी मानवी समतेच्या विरुद्ध असलेल्या व  विषमतेचे बीज रोवणार्‍या मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. ही क्रांतीकारक घटना इतिहासात कायमची कोरली गेली आहे. 

महाड सत्याग्रह परिषदेत एकूण चार ठराव मांडण्यात आले होते. यापैकी थोडक्यात पहिला ठराव सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानि, राजकीय अवनति आणि आर्थिक गुलामगिरीमुळे राष्ट्र अधोगतीस जाते याविषयीचा होता. दुसरा ठराव शूद्र जातीचा उपमर्द करणार्‍या विषमतावादी मनुस्मृतीचे दहन करण्याबाबतचा, तिसरा ठराव सर्व हिंदूधर्मीय लोक एकवर्णीय समजण्यात यावे याविषयीचा तर चौथा ठराव हा धर्माधिकारी ही संस्था लोकमतानुवर्ती व लोकनियुक्त करण्यात यावी यासंबंधातील होता. 

 शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबल नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदूमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहिरनाम्यात गोवलेल्या तत्वांशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोगविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणार्‍या धर्मग्रंथाचा ती दहनविधि करीत आहे. वरील चार ठरावांपैकी ठराव क्रमांक 2 नुसार असलेल्या मनुस्मृती दहनाच्या ठरावातील अतिशय क्रांतीकारक असे हे वरील उद्धरण आहे. 

हा ठराव रा. गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मांडला होता, त्यास रा. राजभोज यांनी अनुमोदन दिले होते व रा. थोरात यांनी त्यास पुष्टी दिली होती. तसेच, यानुषंगाने अत्यंत मार्मिक व मनोवेधक भाषणे झाल्यानंतर मनुस्मृतीचा दहनविधि सभेस जमलेल्या अस्पृश्य वर्गाच्या साधूसंतांच्या हातून करण्यात आला. 

मनुस्मृतीची होळी का करण्यात आली, याविषयी स्वतः ’ बहिष्कृत भारत’कार म्हणजेच डॊ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात:-

 आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रत भरलेली आहेत. त्यांत धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे आणि समतेचा मागमूस नसून असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली. 

एकूणच वर्षानुवर्षांपासून विषम समाजरचनेचा ’कायदा’ म्हणून जुलुमाने लादण्यात आलेल्या तथाकथित वर्णवर्चस्ववादी अशा ’मनुस्मृति’ला डॊ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रकांड पंडित व कायद्याच्या जाणकार अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली या दिवशी ’विधीपूर्वक’ अग्नी दिला गेला! 

हाच नेता पुढे आपल्या अद्वितीय अशा बुद्धिवैभवाच्या जोरावर संपूर्ण भारत भूमीच्या मानवतावादी अशा भारतीय संविधानाचा ’शिल्पकार’ ठरावा, हा विषमतावादी समाजरचनेवर काळाने उगवलेला मोठा सूडच म्हणावा लागेल!

याच अनुषंगाने डॊ. भदंत आनंद कौसल्यायनजी त्यांच्या ’मनुस्मृति जलाई गई क्यो?’ असे प्रश्‍नार्थक शीर्षक असलेल्या पुस्तकात देखील मार्मिक प्रश्‍न उपस्थित करतात:- जिस महापुरूष ने अपने ग्रंथों को ही रखने के लिए ’राजगृह’ जैसा विशाल भवन बनवाया था, उसी ने एक दिन एक पुस्तक जला दी थी।  आखिर क्यों? जिस महापुरुष का पुस्तक प्रेम संसार के अनेक विद्वानों के लिए ही नहीं, अनेक पुस्तक-प्रकाशकों और पुस्तक-विक्रेताओं तक के लिए आश्‍चर्य का विषय था, उसीने एक दिन एक पुस्तक जला दी थी।  आखिर क्यों? उस पुस्तक का नाम क्या था। उसका नाम था मनुस्मृति  ।  पुढे ते असेही स्पष्ट करतात,  अकेली ’मनुस्मृति’ ही नही, कुछ अन्य स्मृतियाँ ही नहीं बल्कि ऐसे अन्य ग्रंथों की भी कमी नहीं, जिनमे शूद्रों तथा स्त्रियों को हेय दृष्टि से ही नहीं, संपूर्ण  ताडन के अधिकारी  दृष्टि से देखा गया है। 

आज भी भारत के  सभी राज्यो में ऐसी घटनाएं घट रही है कि जिनकी प्रत्येक सुशिक्षित आदमी निंदा करेगा। क्यों कि साहित्य न केवल समाज का दर्पण होता है, बल्कि उसका मार्गदर्शक भी, तो ऐसी दुर्घटनाओं की जिम्मेदारी यदि मनुस्मृति सदृश्य ग्रंथों पर नहीं डाली जायेगी, तो अन्य किस साहित्य- परंपरा पर डाली जायेगी?

 1969 मे भारतीय सरकार ने देश मे ’अछूतपन’ के बारे में सही सही जानकारी प्राप्त करने के लिए श्री.पेरूमल की अध्यक्षता में जो कमिटी स्थापित की थी, उसने भारत के सभी राज्यों का दौरा कर जिन तत्वों को सामने रखा है, वह किसी की भी आँख खोल देने के लिए पर्याप्त है।  

थोडक्यात दिनांक 25 डिसेंबर हा ’मनुस्मृती दहन दिवस’ तर आहेच परंतु या दिवसाची खरी ओळख महामानवाने म्हणजेच डॊ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील परिषदेतील भाषणात करून दिली आहे ती म्हणजे हा दिवस  समाजक्रांती दिवस असल्याची होय !

या परिषदेत बाबासाहेब म्हणतात, हे कार्य खरी समाजक्रांती घडवून आणण्यासाठी आरंभिले आहे. केवळ गोड शब्दांच्या मधुर स्वराने मोहून गेलेल्या मनाची समजूत करण्यासाठी मांडलेला हा खेळ आहे, अशी कोणीही आपली भूल करून घेऊन नये. या कार्याला भावनेचा ठाव आहे व ती भावना या कार्याला चालना देणारी शक्ती असल्यामुळे या कार्याची गती थांबणे किंवा थांबविणे आता कोणालाच शक्य नाही.   

आपल्या कार्याप्रती असलेला दुर्दम्य आशावाद व त्याची प्रचिती स्वतःच अखंडितपणे यासाठी राबून स्वहयातीतच ते पूर्णत्वास नेणे हे अकल्पित, आश्‍चर्यकारक असे प्रथमदर्शनी कुणालाही वाटल्यास नवल वाटू नये!  परंतु ती खरी व सर्वांचेच डोळे दिपविणारी अशी क्रांतीकारक घटना होती. हे असे कार्य केवळ महामानवच करू शकतात.

या घटनेचा यथार्थ अर्थबोध घेऊन सर्वच शोषित व पिडीतांनी सातत्याने जागृत राहून विषमतेचे ’विष’ पेरणार्‍या तथाकथित वर्णवर्चस्ववादी प्रवृतींविरूद्ध एकजुटीने लढण्याची नितांत गरज आहे. अन्यथा या ’विषमतावादी’ शक्ति हरेक प्रकारे बुद्धिभेद करून व  काही स्वार्थी प्रवृत्तींना प्रत्यक्ष अथवा परोक्षपणे हाताशी धरून विविध अंधश्रद्धांच्या गर्तेत कायमचे बुडवून जुलमी राजवटीखाली चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्‍चित!    

डॊ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने सुरू केलेल्या खर्‍या समाजक्रांतीचे वाहक बनून जे ते प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत आहेत व करतील तेच बाबासाहेबांच्या समाज पुनर्रचनेचे महत्व यथायोग्यरित्या समजू शकतात व तेच पूर्णत्वास नेऊ शकतात, अन्य कोणीही नाही..!   संदर्भ:- 1) ’डॊ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक’,  महाराष्ट्र शासन, मुंबई, प्रथमावृत्ती 1990. 2) डॊ. भदंत आनंद कौसल्यायन, ’मनुस्मृति जलाई गई क्यो?’, बुद्धभूमि प्रकाशन, नागपूर, नववा संस्करण 2014. 

- अशोक भरणे, मुंबई.