राजगृहाचा आदेश, लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर येणार : अमोल वेटम
महापरीनिर्वाण दिनानिमित्त सरकारच्या तालिबानी फतव्यांचा निषेध : रिपब्लिकन स्टुडंट युनियन
राजगृहाचा आदेश, लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर येणार : अमोल वेटम
सांगली दि.०१ :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ०६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. कोविडमुळे मागील वर्षी अभिवादन घरातून करण्यात आले. परंतु यावेळी गृह विभागतर्फे तालिबानी फतवा काढत अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी दोन डोस लसची सक्ती लादण्यात आलेली आहे, असे सुचनांचे मार्गदर्शक पत्र इतर कोणताही कार्यक्रमासाठी सरकारने काढलेले नाही. केवळ आंबेडकर जयंती, अशोका विजयादशमी, बुद्ध जयंती,आदीबाबत सरकारचे असे तुघलकी परिपत्रक निघतात याचा आम्ही निषेध करतो. ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचनांचा दि.३० नोव्हेंबर रोजी काढलेले अन्यायकारक, भेदभाव करणारे परिपत्रक तात्काळ रद्द करा अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी गृहविभागाचे उपसचिव यांना निवेदनाद्वारे केली आहे.
एकीकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे हे परळी जिल्हा बीड येथे दिवाळी स्नेहसंमेलन बाबत सपना चौधरी यांच्या नाच-गाण्याचा कार्यक्रम आयोजित करतात यावेळी विनामास्क, फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन झाले. पण यावर कारवाई नाही. औरंगाबाद येथील एका शासकीय कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक मंत्री व त्यांचे कार्यकर्ते विनामास्क होते. याकरिता सदर मंत्री महोदय यांना ५०० रुपये दंड का नाही केला ? आळंदी (जिल्हा पुणे) येथील कार्तिकी यात्रा सोहळा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ या काळात संपन्न होणार आहे सदर यात्रेस कोणतेही विशेष निर्बंध शासना कडून लादलेले नाहीत. या सोहळ्यास लाखो लोक जमलेले आहेत, यांनी दोन डोस घेतले आहेत का ?
नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन हे ३ ते ५ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे, याचे स्वागतअध्यक्ष स्वतः या राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आहेत. या कार्यक्रमाला परवानगी कशी काय मिळते ? राज्यातील मंदिर, शाळा एकीकडे सरकार उघडत आहे याचे स्वागत, मग महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालिबानी फतवे व निर्बंध कशासाठी ? असा प्रश्न अमोल वेटम यांनी उपस्थित केला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ०६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत येणारच असल्याचे जाहीर केले आहे.
0 Comments