बोधिसत्व शब्दाबद्दल नवीन वाद..!
बोधिसत्व शब्दाबद्दल नवीन वाद..!
काही महान बौद्ध विद्वान बोधिसत्व या शब्दाला महायानी शब्द आहे असे संबोधन करून एक वाद पुन्हा निर्माण करीत आहे.
काही वर्षांपासून स्वतःला बौद्ध विद्वान समजणार्या या महान पंडितांनी बोधिसत्व हा शब्द महायान बौद्ध संप्रदायचे आहे असे म्हणून एक नवीन वाद निर्माण केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पूर्वजांना बौद्ध धर्मदीक्षा दिली व त्यामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या. बौद्ध धर्मात ही एक नवीन पहाट 14 ऒक्टोबर 1956 ला सुरू झालेली आहे. 22 प्रतिज्ञा या बौद्ध धर्मात प्रथमच भारतीय बौद्ध धर्मात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ज्यातून बौद्ध धर्म हा आणखी समृद्ध व सुदृढ झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी व माईसाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धर्मदीक्षा घेताना व बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पूर्वजांना बौद्धधर्म दीक्षा देतांना बौद्ध होण्याची दीक्षा दिली आहे. हीनयान व महायानची दीक्षा दिलेली नाही. हे उमगणे भारतीय बौद्धांना गरजेचे आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी ’द बुद्ध अँड हिज धम्म’ या धम्मग्रंथात बुद्धांच्या धम्मा संदर्भात जे महत्वाचे तत्व व सिद्धांत आहेत. ते या धम्मग्रंथात दिलेले आहेत. ते धम्मतत्व महायान व हीनयान असे नमूद केलेले नाही. तर ते तत्व बौद्धधम्म तत्व म्हणून या धम्मग्रंथात लिहिलेले आहे. जे बौद्ध धर्माचे अभ्यासक व विद्वान आहेत त्यांना माहीत आहे की, ’द बुद्ध अँड हिज धम्म’ या धम्मग्रंथात असलेले अनेक तत्व हे महायान मध्ये प्रमुख तत्व म्हणून ओळखले जातात. तसेच हीनयान बद्दल आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महायान व हीनयान या दोन्हींची सांगड घालून ’द बुद्ध अँड हिज धम्म’ हा धम्मग्रंथ जागतिक बौद्धांना अर्पण केलेला आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी बोधिसत्व या शब्दाबद्दल बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मराज ग्रंथात जे लिहिले आहे ते अवलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे.
बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, भाग चवथा, चार. याचे शीर्षक आहे. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर ’बुद्ध’ होतात! यात बाबासाहेब कोठेही लिहीत नाहीत की बोधिसत्व हा शब्द महायानचा शब्द आहे. यात बाबासाहेब स्पष्टपणे लिहितात की, बोधिसत्व गौतम हे बुद्ध होतात. याचाच अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना माहीत आहे की बोधिसत्व शब्दाचे बौद्धधर्मात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. बुद्ध होण्यासाठी जे ही प्रयत्नशील आहेत त्यांना बाबासाहेबांनी ’द बुद्ध अँड हिज धम्म’ या धम्मग्रंथात बोधिसत्व असे म्हटले आहे. या धम्मराज ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ; ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व! या ग्रंथातील या वाक्यातच सर्व अर्थ आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व या शब्दाचा अर्थ पुढे होणारा बुद्ध असे करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी ’द बुद्ध अँड हिज धम्म’ या धम्मग्रंथात बोधिसत्व या शब्दाला कोठीही महायान व हीनयान या संप्रदायात विभागलेले नाही. तर बाबासाहेबांनी बोधिसत्व या शब्दाला बुद्धांनी सांगितलेल्या धम्मात समाविष्ट केलेले आहे.
भदंत आनंद कौसल्यायन यांचे प्रमुख शिष्य भदंत मेघनकर यांनी लिहिलेले पालि साहित्य में ’बोधिसत्व’ सिद्धांत हा पीएचडीचा रिसर्च पुस्तक प्रकाशित आहे. व भारतात या पुस्तकाला महत्वाचे पाली साहित्याचे पुस्तक मानले जाते. या पुस्तकात बोधिसत्व शब्द पाली साहित्यात शेकडो वेळा वापरण्यात आलेला आहे. हे सप्रमाण सांगितलेले आहे. पाली साहित्य याला हीनयान साहित्य म्हणून जगात ओळखले जाते. त्यामुळे बोधिसत्व शब्द महायान व हीनयान या दोन्ही संप्रदायात वापरला जातो. त्यामुळे बोधिसत्व शब्दाला संकुचित करणे हे योग्य नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मग्रंथाचे नावच बुद्ध आणि त्यांचा धम्म ठेवला आहे म्हणजेच बुद्धांनी सांगितलेला धम्म. या ग्रंथात बोधिसत्व हा शब्द वापरलेला आहे. तोच बुद्ध होण्यासाठी प्रयत्नशील असणारा मनुष्य म्हणून. त्यामुळे आमच्यासाठी तर बाबासाहेब आंंबेडकर यांनी सांगितलेले शब्द हेेच प्रमाण व अंतिम आहेत. त्यामुळे बोधिसत्व हा शब्द बुद्धयान म्हणजेेेच बुद्धांनी सांगितलेला धम्म यातील अनिवार्य अंग आहे असे आम्ही बौद्धांनी समजले पाहिजे.
बोधिसत्व हा शब्द महायान चा म्हणवणारे हे थोर बौद्ध पंडित बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे विरोधक आहेत काय? हे ही बौद्धांनी तपासणे गरजेचे आहे. जर हे बौद्ध विद्वान असे करीत असतील तर ते बाबासाहेब यांचा अपमान करीत आहेत असे आम्ही समजतो. बोधिसत्व शब्दबद्दल जेही महान पंडित आंबेडकरी बौद्ध जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत व पुन्हा एक नवीन वाद उकरुन काढत आहेत. त्यांच्यापासून आंबेडकरी बौद्धांनी सावध राहावे.
- उमेश गजभिये, नागपूर.
0 Comments