कायद्याची शक्तीच देईल गुलामीतून मुक्ती
कायद्याची शक्तीच देईल गुलामीतून मुक्ती
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, संरक्षण व आरोग्य या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी प्रत्येक राज्याचे शासन कायदे बनवित असते. आपल्या भारतातही लोकशाही पध्दतीने लोकांच्या विविध गरजा त्यांना पूर्ण करता याव्यात यासाठी योजना तयार करुन त्यासाठीचे कायदे बनविले जातात. भारतातील शेतकरी, गरीब मोलमजूरी करणारे, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, जातीवादामुळे पीडीत आणि रसातळाला जावून आजपर्यंत कधीही वर न आलेले, शिक्षणापासून वंचित असलेले, नोकरी नसलेले, कोणतेही काम न मिळणारे, प्रगतीपासून वंचित राहिलेले, विकासापासून मागे राहिलेले असे लोकसंख्येच्या 80 टक्के लोक आहेत. म्हणजे इतक्या लोकांच्या प्राथमिक आणि दुय्यम गरजा भागवण्यासाठीचे कायदे या देशात बनविले गेले नसावेत आणि म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने अजून गरीबी तशीच राहिली आहे असे म्हणणे चुकीचे ठरु नये.
इतक्या मोठ्या संख्येने गरीबीचे जीणे जगणार्या या लोकांना रोजीरोटीचे साधन उपलब्ध करुन देणे हे सरकारचे जसे काम आहे तसे आपल्यासाठी कायदे बनविणार्या आणि आपल्या कल्याणाचा अजेंडा असणारे सरकार निवडून देणे हे आपले काम आहे. आपल्या मतानेच आणि मदतीनेच हे लोककल्याणासाठीचे कायदे बनविण्याचे काम होवू शकते. सगळ्या भौतिक सुविधांचे माहेरघर हे कायदाच आहे.
या महत्वाच्या कायदा बनविण्याच्या बाबीकडे आपले लक्ष जावू नये म्हणून तर आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे याची जाणिव भारतीयांनी करुन घ्यायला पाहिजे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याचा कायदा झाला. पण त्याचबरोबर परीक्षा घ्यायची नाही असा कायदा झाला. नापास करायचे नाही आणि मारायचे नाही. फक्त शिकवायचे, मुले शिकली तर शिकली नाहीतर राहू देत. मग आता ही पिढी आठवीपर्यंत नापास न होता पोहचली. त्यांना साधे लिहायला आणि वाचायला येत नाही. काय वाचतो ते समजत नाही. विचार करण्याची आणि तर्क लावण्याची क्षमताच जर त्यांच्यात नसेल तर मग आता कायदा करण्याची शक्ती आपल्याजवळ येण्यासाठीचा विचार त्यांच्या मनात कसा काय येईल?
अडाणी राहीला की
तो आपोआपच अंधश्रध्देकडे वळतो. देवा माझे कल्याण कर अशी प्रार्थना करीत नवस, सायास करीत रहातो. मजूरी करुन मिळणारा पैसा देवधर्मात नवस फेडण्यासाठी खर्च करतो. या कर्मकांडात तो अडकून भिकारीच रहातो. म्हणून आपण डोळसपणे कर्मकांडांच्या मागे न लागता आपल्या कल्याणासाठीचे कायदे बनविण्याची शक्ती प्राप्त केली पाहिजे. तरच आपल्याला या गुलामीतून व गरीबीतून मुक्ती मिळणार आहे. कोणीतरी येईल आणि आपल्याला या गुलामीतून व गरीबीतून मुक्त करील असे वाटून घेणे म्हणजे मूर्खपणाचे ठरले आहे. गेल्या 66 वर्षात या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या कल्याणाचा विचार झाला नसेल तर आपणच आपल्या कल्याणाचा विचार करावा लागेल. शेकडो वर्षाची ही सर्व प्रकारची गुलामगिरी अजूनही टिकून असेल तर ती कायदा बनविण्याची शक्ती प्राप्त करुनच नष्ट होवून गुलामीतून मुक्ती मिळवून देवू शकते.
यासाठी तशा विचारांचे संगठन बनवायला पाहिजे. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचा मार्ग बनवून माहिती अधिकाराचा कायदा तत्कालिन सरकारला करायला लावला. अण्णा हजारे यांनी हा कायदा लोकांचे कल्याण करण्याचा विचार करुनच करायला लावला. त्यामुळे कायदा होवून लोकांना आपल्याला हवी ती माहिती तरी उपलब्ध होवू लागली आहे. नाहीतर त्यापूर्वी कचेरीत काय चालले आणि आपल्या कामाचे काय झाले हे लोकांना कळतच नव्हते. हे आधुनिक युगातील आंदोलन आणि त्याचे यश आपण लक्षात घ्यायला हवे. आणि आपल्या संरक्षणासाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी आणि पर्यायाने गुलामीतून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या हिताचे कायदे बनविणारे सरकार आणण्यासाठी तशा विचारांचे संगठन बांधायला पाहिजे.
या ठिकाणी संगठन असा शब्दप्रयोग केला आहे. संघटन असा शब्दप्रयोग नाही. या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. डॊ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षित बनो, संघर्ष करो, संगठीत रहो असा संदेश दिला होता. ना की शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. असा शब्दांचा घोळ आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण संघटीत होवून संघर्ष आपल्याच भावंडांबरोबर करीत आहोत. म्हणून विचार करायला लावणारे शिक्षण शिकायचे आहे आणि संघर्ष करुन आपण संगठीत व्हायचे आहे. असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता. संगठन म्हणजे एकत्र बरोबर गाठवणे, विचारांचा धागा आणि गाठ मारुन माणसांचे संगठन करायचे आहे. असे केल्यास विघटन होवू शकत नाही. तसे संगठन या शब्दाला विरुध्द क्रियाच नाही. बाबासाहेबांनी हा शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरला आहे.
केवळ बहुजन असे मोठे नांव धारण करण्यासाठी संगठीत होवून चालणार नाही तर जागरुकतेने आणि शिस्तीने आपल्याला सफलता प्राप्त करुन घ्यावी लागणार आहे. सफलता मिळाल्यावर ती अबाधित ठेवावी लागणार आहे. स्वाभिमानाचे जगणे असेल तरच ही सफलता अबाधित रहाणार आहे. सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली ही राजकीय सत्तेत आहे. ज्यांनी आपली पार्टी बनवली आहे ते जर सत्तेत गेले तर त्यांच्यासाठी हिताचे कायदे बनवतात हा अनुभव लक्षात घेवून आपणही आपल्या हितासाठीचे कायदे बनविण्याचा अजेंडा घेवून आपली पार्टी बनवायला पाहिजे किंवा आपल्या हिताचा अजेंडा असलेल्या पार्टीला पाठींबा द्यायला पाहिजे. या देशात काँग्रेस किंवा भाजपा यापैकी एकाही पक्षाने बहुजनांचा विचार करुन त्यांच्या हिताचे कायदे आजपर्यंत कधीही केलेले नाहीत. ठराविक वर्गाच्या हिताचा विचार कायदे बनविताना केला जातो. हे लक्षात घेता या दोन्ही पक्षांना एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणावे लागते. एकमेकांवर जातीवादी आणि धर्मनिरपेक्ष असे आरोप करीत जनतेला एकमेकांच्या विरोधात ठेवत हे लोक आजवर भारतीयांवर राज्य करीत आहेत. जर तिसरी पार्टी तयार झाली किंवा तयार झाली असेल तर गुलामीतून आपण मुक्त होवू शकतो.
लोकशाही नष्ट झाली तर काय होईल याचा विचार आपण करायला पाहिजे. आपण शासक बनू तर लोकशाहीचे रक्षण करु शकू. प्रामाणिकपणे समता, बंधुत्वाचे तत्व राबवू शकू. पण आपण शासक नसू तर हे होणे शक्य नाही याची जाणिव करुन घेवून या लोकशाही राज्यात कायदा बनविण्याची शक्तीच प्राप्त केली पाहिजे तरच मुक्ती मिळणार आहे.
- शरदकुमार वाघवेकर, जयसिंगपूर.
0 Comments