सांस्कृतिक दिवाळखोरी

स्वतःच्या संस्कृतीमध्ये जेव्हा कुठलेही महानायक/नायिका नसतात तेव्हा इतरांच्या संस्कृतीमधील व्यक्तिमत्वांची चोरी करून, अनेक काल्पनिक प्रसंग उभे करून, जनसामन्यात ते पेरणे, हे सांस्कृतिक दिवाळखोरीचे प्रमुख लक्षण होय!

भारताचा खरा इतिहास आपल्याला बुद्धकाळापासून दिसतो. पालि त्रिपिटक हे भारतातील सर्वात प्राचीन लिखित साहित्य ज्यातून संपूर्ण भारताची ओळख मिळते. बुद्धांच्या शिकवणीने त्याकाळातील सर्वच राजे आणि राज्ये प्रभावित झाली होती.

पालि त्रिपिटकातील प्रत्येक सुत्त भ.बुद्धांनी कधी, कुठे, केव्हा, कशासाठी, कोणासाठी, कुठल्या राजाच्या काळात म्हटले याचा संपूर्ण उल्लेख मिळतो. त्यामुळे हा ग्रंथ आपल्याला प्राचीन भारताची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक तसेच धार्मिक आणि आर्थिक स्थिती दाखवतो. यातील सर्वच व्यक्तिमत्वे ही जिवंत होऊन गेलेली माणसे आहेत. ही सर्व सुत्ते मानवीय मनाचे प्रतिबिंब आहेत आणि म्हणूनच पालि साहित्य हे नवरसपूर्ण आहे! यातील जातक कथांनी (ज्या खर्‍या अर्थाने रूपक कथा आहेत) तर अनेक तत्कालीन आणि वर्तमान साहित्यिकांना भुरळ घातली आहे. 

बौद्ध संस्कृतीने जसे सर्वोत्तम असे आचार्य दिले तसेच सर्वोत्कृष्ट साहित्यिक देखील दिले. भारतात काव्य प्रकार सुरू करणार्‍या आचार्य अश्‍वघोष यांचे साहित्य अतिशय उच्च प्रतीचे, मात्र त्यांचे काव्य डावलून, त्यांच्या साहित्याची चोरी करणार्‍याला महाकवीपद देऊन, त्या साहित्याला पंचमहाकाव्यात स्थान देणें हा सांस्कृतिक द्वेष आहे!

म्हणून तर ज्या संस्कृतीत स्वतःचे काही नव्हते त्यांनी बौद्ध संस्कृतीतून आपली पात्रे निवडली व ती विकसित केली (उदा. दशरथ जातक किंवा श्रावणाची कथा). पुढे सम्राट अशोकांनी बौद्ध संस्कृती केवळ जतनच नाही केली तर ती लेणीं, शिल्पकला, स्थापत्य आणि शिलालेखांच्या माध्यमातून अजरामर केली! आज भारतात दिसत असलेल्या सर्व पुरातत्त्वीय खजिना ही बौद्ध संस्कृतीची देन आहे! भारतात इतर कुठल्याही संस्कृतीचे असे प्राचीन अवशेष दिसत नाहीत!

सम्राटांच्या काळात भारताचा र्े्रु्रं 33% होता! गेल्या पन्नास वर्षात अमेरिकेचा सरासरी र्े्रु्रं आहे 21.34% तर चीनचा आहे 11.21%. म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळात भारताचा र्े्रु्रं हा आजच्या अमेरिका आणि चीन मिळून होता! म्हणून तर त्याकाळात सर्व जगावर भारताचा दबदबा होता! भारतात त्याकाळी सोनेरी धूर निघत होता अशी म्हण जगात कायम झाली! एवढा सर्वश्रेष्ठ राजा भारताच्या संपूर्ण इतिहासात सापडणार नाही. सम्राटाच्या या बौद्ध संस्कृतीच्या काळात, भारत अखंड होता! 

सम्राटचे हे जागतिक गुणगान यांना एवढे खुपते की त्यांचे विविध अंगाने खच्चीकरण अथवा विद्रुपीकरण चालू असते. सम्राट अशोकांना जग विसरू शकणार नाही हेच त्यांचे सर्वात मोठं दुःख आहे!! 

अशोक सारखा सम्राट आपल्या संस्कृतीत नाही याचे शल्य असल्याने त्यांच्या सारखा पुरुषोत्तम तयार करण्याची धडपड करण्यात आली! म्हणून तर स्वतःची अशी काल्पनिक संस्कृती ओढून ताणून रंगविण्याचे न्यूनगंडत्व मनात असल्याचे पुरावे सहा सोनेरी पानेमध्ये पानोपानी दिसते!

सम्राट अशोकांना दूषणं देऊन, पद्मश्री मिळवणार्‍यांना देखील अशोकचक्र आणि अशोक राजमुद्रा चिन्ह असलेल्या मानपत्राशिवाय किंमत नाही यातच सर्व काही आले!

सम्राट अशोकांनी बुद्धविचार संपूर्ण जगात पोहचविले आणि जगाला खर्‍या गुरुची ओळख झाली! बौद्ध संस्कृतीने जगाला सर्वात पहिले विश्‍वविद्यापीठ दिले आणि भारत शिक्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या बौद्ध संस्कृतीच्या काळात भारत विश्‍वगुरु होता! इतर कुठल्याच संस्कृतीचा काळात भारताला हे भूषण प्राप्त झाले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.

अशा या पूर्णपणे विकसित झालेल्या संस्कृतीला शह देण्यासाठी आणखीन एक संस्कृती असायला हवी ना! पण भारतात बौद्ध संस्कृती शिवाय अशी कोणतीच संस्कृती निर्माण झाली नाही जी मनुष्याला पूर्ण आदर्शवत ठरू शकेल, आणि म्हणूनच मग काल्पनिक व्यक्तिमत्त्वे निर्माण करून, काल्पनिक संस्कृती निर्माण करण्याचे प्रयत्न 10 -11 शतकापासून करण्यात आले. आजही ते प्रयत्न चालू आहेत!

बुद्धांना नष्ट करू शकले नाही म्हणून मग त्यांना अवतारपुरुष करण्यात आले. अनेक बुध्दविचार चोरून, त्यात फेरबदल करत स्वतःचे म्हणून खपवले. लेणीं घडवू शकले नाही म्हणून मग तेथे अतिक्रमण केले. बुद्ध लेणींचे नामकरण करण्यात आले. बौद्ध शिल्पांची मोडतोड अथवा विपर्यास केला गेला. महामायेचे शिल्प गजलक्ष्मी म्हणून भासविण्यात आले तर आणखीन एक शिल्प शाल्भंजिका म्हणून गिरवण्यात आले.  भारताची मातृभाषा असलेल्या पालि भाषेचा आधार घेत एक संकरित भाषा तयार करण्यात आली आणि तिचा उदोउदो करण्यात आला! जी धम्मलिपि भारताच्या सर्व लिपींची जननी आहे तिचे नामकरण करण्यात आले! सकस बौद्ध साहित्याची सर्रास चोरी करण्यात आली.

आजही भारताला भ.बुद्धांचा देश संबोधण्यात येते हे शल्य मनात असल्याने, काल्पनिक संस्कृती किती प्राचीन आहे हे दर्शविण्यासाठी खोटे पुरातत्त्वीय अवशेष दाखविण्याचा केविलवाणे प्रयत्न दिसतात! 

ही काल्पनिक संस्कृती अनेक अंगाने पुढे येत आहे. त्यातील महत्वाचे म्हणजे साहित्य आणि इतर कलाकृती. उगाच कुठल्या काल्पनिक कथा रचण्यापेक्षा बौद्ध साहित्यातील, त्यातील त्रिपिटकतील साहित्य वाचले तरी आम्हांला नायक अथवा नायिका दिसतील आणि जर त्यांच्यावर साहित्यनिर्मिती केली तर ती एक अजोड कलाकृती ठरू शकेल. याच नायकांवर, त्यांच्या विचारांवर नाट्य, चित्रपट काढले तर ती एक सरस कलाकृती ठरू शकेल!

बौद्ध संस्कृती ही सर्वच अंगाने व्यापक आणि सकस आहे. अध्यात्मिक अंगाने जशी ती श्रेष्ठ आहे. तशीच वैज्ञानिक अंगाने ती परिपूर्ण आहे. शील आणि नैतिकता जसे ती सांगते तसेच अन्यायाला प्रतिरोध करण्याचे, त्यासाठी संघर्ष करण्याचे तंत्रही ती सांगते. तिला काल्पनिक व्यक्तिमत्वांची अथवा प्रसंगाची गरज नाही. आजच्या प्रश्‍नांनाही समर्पकपणे उत्तरे ती देऊ शकते.... गरज आहे ते फक्त तिला जाणून घेण्याची!!!