म.फुले आणि डॊ.आंबेडकरांमधील 

वैचारिक दुवा म्हणजे छ. शाहू महाराज.!

सामाजिक परिवर्तनाची मशाल संपूर्ण महाराष्ट्रभर पेटत असताना क्रांतीबा ज्योतिबा फुले यांचे 28 नोव्हेंबर 1890 साली निधन झाले आणि चार वर्षानंतर कोल्हापूर संस्थानचे राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांचा उदय 1894 साली कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून झाला. जोतिबा फुलेंचे मानवतावादी विचार जनमाणसांत पोहोचवण्याची जबाबदारी शाहूंनी तोपर्यंत उचलली जोपर्यंत डॊ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय राजकारणात पदार्पण झाले नव्हते. ज्या समाजसुधारकांनी मानवतावादी आंदोलन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना वेळोवेळी शाहू महाराजांनी नैतिक आणि आर्थिक मदत केली होती. शाहू महाराज भारतातील मानवतावादी विचारांचा तो पाया आहेत ज्याच्या शिवाय या आंदोलनाची कल्पना देखील करणे मुश्किल आहे. शाहू महाराजांचा उदय अशा कालखंडात झाला होता जेव्हा स्वदेशी आंदोलनाचे बाळ गंगाधर टिळकांसारखे रूढीवादी नेते जातीवाद विचारधारा आणि परंपरेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करीत होते. टिळकांनी वंचित जातीतील शासनामध्ये प्रतिनिधीत्वाबद्दलच्या मागणीला ‘तेली-तांबोळी-कुणबी विधानसभेमध्ये जाऊन काय करणार?’ असे म्हणून संपूर्ण भारतात बोंब मारली होती. अशा कठिण प्रसंगी देखील शाहू महाराजांनी मानवतावादी विचारांचे आंदोलन जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. शाहू महाराजांच्या सांगण्यावरूनच बाबासाहेबांनी लॊर्ड मांटेग्यू समोर अस्पृश्यांसाठी संवैधानिक अधिकारांची मागणी केली होती. या मुलाखतीचा उल्लेख 25 नोव्हेंबर 1920 साली बाबासाहेबांनी शाहू महाराजांना लिहिलेल्या पत्रात केला आहे, ‘माँटेग्यू यांनी खूप चांगल्याप्रकारे माझ्याशी चर्चा केली, आम्ही तासभर ब्राम्हण आणि गैर ब्राम्हणांमधील समस्या व विवादांवर चर्चा केली. महाराज! गैर-ब्राम्हणांच्या आंदोलनाबद्दल त्यांना काही लोकांनी चुकीची माहिती दिली होती.’ 

प्रथम विश्‍व युध्दावेळी टिळकांनंतर देशाच्या आंदोलनाची कमान गांधीजीच्या हाती जावे म्हणून संपूर्ण देशात त्यांच्या यात्रेचे आयोजन केले जात होते आणि त्याला खूप मिडीया कव्हरेजही मिळत होती. मात्र दुसरीकडे या सामाजिक आंदोलनाची कमान अशा कुशल व्यक्तीच्या हातात जावी जो उच्च जातीचा नसून लोकतांत्रिक मुल्यांमध्ये विश्‍वास ठेवणारा असावा अशा प्रयत्नात शाहू महाराज तन-मन-धनाने होते. नाशिकच्या सभेत शाहू महाराजांनी ‘नेता हा दूरदृष्टा असावा, त्याच्याकडे भविष्याचे व्हिजन असावे, जातीयवाद संपुष्टात आला पाहिजे, जातीचे जीवंत राहणे पाप आहे. जात ही आपल्या प्रगती आड येणारी बाधा असल्याने तिला संपुष्टात आणणे आपले कर्तव्य असावे’ असा विचार मांडला होता. या अनुषंगानेच 1920 साली माणगांवच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना आपल्या लोकांचा पुढारी म्हणून घोषित केले होते. 

महत्वपूर्ण बाब म्हणजे शाहू महाराज हे स्वत: कोल्हापूर संस्थानचे राजे असूनसुध्दा आपल्या विचारातून लोकशाहीचे समर्थन करीत होते. त्यांच्या मते लोकशाही ही केवळ शासन प्रणालीपर्यंत मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असली पाहिजे. जातीयता आणि अस्पृश्यता संपवून नव्याने सामाजिक संरचना स्थापन करण्याचा शाहू महाराज फक्त विचारच न मांडता त्यासाठी ते काम ही करीत होते. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 26 जुलै 1902 साली आदेश काढून कोल्हापूर संस्थानात 50% आरक्षण मागासवर्गीय जातीस जाहीर केले. शासकीय नोकर्‍या आणि शिक्षणाची दारे ही खुली करून दिली. तसेच शाहू महाराजांनी वेळोवेळी आदेश काढून अस्पृश्यता संपवण्यासाठी युध्द पुकारले होते. 15 जानेवारी 1919 साली आदेश काढून कोल्हापूर संस्थानातून जातीयता हद्दपार करून समाजातील शोषित, पिडीत, वंचित घटकाला समानतेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी अद्वितीय कार्य केले. अशा महान लोकराजा, ऋषीतुल्य राजा छ.शाहू महाराजांस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!