जेम्स प्रिन्सेप : भिंती वाचणारा माणूस


धम्मलिपी ही सर्वात प्राचीन भारतीय लिपी आहे, ज्याच्यामुळे भारताच्या भूतकाळाचा अभ्यास करणार्‍या इतिहासकारांचा आणि संशोधकांचा दीर्घकाळ गोंधळ उडाला होता, या लिपीचा उलगडा जर लागला नसता तर भारतीयांना त्यांचा मुळ इतिहास कधीच समजला नसता. 18 व्या आणि 19 व्या शतकाच्या सुरुवातीला, इस्लामी राजवटीपूर्वी भारताच्या भूतकाळाबद्दल फारच कमी लोकांना माहिती होती.

1757 मध्ये प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिश साम्राज्याचा संपूर्ण भारतात विस्तार होऊ लागला, तेव्हा भारताचा प्राचीन भूतकाळ पुन्हा शोधण्यासाठी जगातील अनेक लेखक, प्रवासी, विद्वान, व्यापारी आणि अधिकार्‍यांनी अथक परिश्रम करत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खजुराहो, एलोरा आणि मदुराई येथील प्राचीन अवशेषांचे अध्ययन होण्यासाठी आणि त्यांचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी अभ्यासक वर्ग नव्याने जिंकलेल्या ब्रिटिश प्रदेशांचा प्रवास करत होता.

यापैकी एक इंग्रज तरुण होता. ज्याने कलकत्ता मिंट येथे कनिष्ठ कर्मचारी म्हणून भारत देशात आपले अध्यापन सुरू केलेे आणि आपल्या अतुलनीय कार्याच्या प्रतापाने भारतीय इतिहासावर छाप सोडली. त्यांचे नाव जेम्स प्रिंसेप होते. या उल्लेखनीय माणसाचा जन्म 20 ऒगस्ट 1799 रोजी एका श्रीमंत इंग्रजी कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांनी भारतामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करुन मोठी संपत्ती कमावली होती. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रिन्सेपने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. कलकत्ता मिंटमध्ये काम करण्यासाठी ते वयाच्या 20 व्या वर्षी 1819 मध्ये भारतात आले होते. कलकत्ता मिंट मध्ये गुणवत्ता नियंत्रण सुनिश्‍चित करणे हे त्याचे काम होते. सर्व काही सुरळीत चालू होते पण त्यांचे आयुष्य मात्र दुसरीकडे वळण घेत होते. कलकत्ता मिंटमध्ये प्रिन्सेपचे वरिष्ठ अधिकारी होते होरेस हेमन विल्सन (1786-1860), जे त्या काळातील सर्वात प्रख्यात प्राच्यशास्त्र विशारद होते.

विल्सनच्या संगतीत राहून जेम्स प्रिंसेपला भारतीय इतिहास आणि संस्कृतीमध्ये मोठी रुची निर्माण झाली आणि ही आवड मात्र तेंव्हा अधिक वाढली जेव्हा प्रिंसेपची 1820 मध्ये बनारस मिंटमध्ये बदली झाली. जिथे तो पुढे 10 वर्षे काम करत राहिला. भारतीय बौद्ध इतिहासातील प्राचीन व महत्त्वाचे शहर बनारसमध्ये, प्रिन्सेपने भारतीय मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचा अभ्यास केला आणि 1830 ते 1834 दरम्यान लंडनमध्ये बनारस इलस्ट्रेटेड, इन ए सिरीज ऒफ ड्रॊइंग्ज या नावाने प्रकाशित झालेल्या जल रंगांची मालिका बनवली. त्यांनी बनारसमध्ये नवीन मिंट बिल्डिंग, एक चर्च आणि बंगालमधील कालव्यांची मालिका देखील डिझाइन केली. असे करत असताना, त्याला नाण्यांच्या अभ्यासात देखील मोठी आवड निर्माण झाली.

1830 मध्ये प्रिन्सेपची परत कलकत्ता मिंटमध्ये बदली झाली. जिथे त्याचा बॊस विल्सन राजस्थान आणि पंजाबमध्ये सापडलेल्या वेगवेगळ्या नाण्यांवर अध्ययन करत होता. प्रिन्सेपने ही नाणी मिळवून अभ्यासली. ज्यामुळे त्यावर सापडलेल्या अकल्पनीय शिलालेखांमध्ये त्यांची प्रचंड आवड निर्माण झाली. त्याच वर्षी, प्रिन्सेप एशियाटिक सोसायटी ऒफ बंगालने प्रकाशित केलेल्या द जर्नल ऒफ एशियाटिक सोसायटीचे संस्थापक संपादकही झाले.

1833 च्या सुमारास, दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे सापडलेल्या स्तंभाचे काही अवशेष अलाहाबाद किल्ल्यात सापडले. जर्नलचे संपादक म्हणून प्रिन्सेपला संपूर्ण भारतातील नाणी, शिलालेख, अहवाल संदर्भात खाती मिळाली, ज्याचा अभ्यास आणि उलगडा केला जायला हवा होता अशा ‘अशोक कालीन धम्मलिपीला  अनेक लोक (भारतभरातील असंख्य अशोक कालीन आदेशांमध्ये आढळलेले आदेश किंवा संदेश) अजूनही डीकोड होण्याची वाट पाहत होते. पण प्रिन्सेप मात्र कुठलीही घाई न करता हळूहळू तिथे पोहोचत होता.

नेपाळच्या न्यायालयात ब्रिटीश रहिवासी (राजदूत) ब्रायन हॊजसन यांनी जेम्स प्रिन्सेप यांना उत्तर बिहारमधील बेतिया येथे तत्सम स्तंभावर सापडलेल्या शिलालेखाची प्रत पाठवली. प्रिन्सेपने ते दिल्ली व अलाहाबाद शिलालेखांच्या सोबत अधिक माहिती आणि सुगावा लागण्यासाठी साठी त्याचा तपशीलवार अभ्यास केला. पुढील चार वर्षे, प्रिन्सेपने त्याच प्रकल्पावर परिश्रमपूर्वक काम केले. त्याने आपले दिवस व रात्री नाणी आणि शिलालेखांच्या संगतीत घालवले.

प्रिन्सेपच्या सूचनेनुसार अलाहाबादचे लष्करी अभियंता कॅप्टन एडवर्ड स्मिथ यांनी भोपाळ राज्यातील ‘सांची’ नावाच्या गावात पुरातत्व अवशेषांचा अभ्यास केला होता. येथील मुख्य शिलालेखांसह, कॅप्टन स्मिथने प्रिन्सेपला मुख्य स्तूपाभोवती असलेल्या दगडी रेलिंगवर आढळलेल्या लेखनाचे क्षुल्लक तुकडे देखील पाठवले होते.

1838 मध्ये प्रिन्सेपने आपले निष्कर्ष एशियाटिक सोसायटीसमोर सादर केले व त्यामुळे हे ज्ञात झाले की ‘देवनापिय पियदस्सी’ नावाच्या राजाच्या आदेशानुसार हे फलक लिहिले गेले होते, ज्याने आपला हिंदू धर्म बदलून बुद्ध धम्मामध्ये प्रवेश केला होता. जेम्स प्रिन्सेप यांनी प्राचीन शिलालेख वाचन करून असा निष्कर्ष काढला की देवतांना प्रिय असणारा प्रियदर्शि राजा हा सम्राट अशोकच आहे. सिलोन(श्रीलंका) मधुन बौद्ध इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार जॊर्ज टर्नूर यांनीही जेम्स प्रिन्सेप यांना पत्र लिहून दुजोरा दिला की, श्रीलंकेच्या बौद्ध ग्रंथांमधून त्यांना ‘पियादस्सी’ हा शब्द ‘सम्राट अशोक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय राजाचे प्रतिक असल्याचे समजले आहे व त्यांनी असेही सांगितले की सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्यचा नातू आहे.

अनेक शिलालेखांचे अध्ययन व वाचन करत असताना जेम्स प्रिन्सेप यांनी बघितले की, अनेक शिलालेखात ‘इयं धम्मलिपी’ असा उल्लेख केला आहे, यावरून ही लिपी दुसरी तिसरी कोणतीही नसुन धम्मलिपीच आहे हे त्यांच्या लक्षात आले.

धम्मलिपीचा उलगडा करण्याव्यतिरिक्त, प्रिंसेपने ‘खरोस्टी’ लिपीचा सुद्धा उलगडा केला. ही लिपी संस्कृत आणि प्राकृत लिहिण्यासाठी भारताच्या उत्तर-पश्‍चिम भागात वापरली जाणारी प्राचीन लिपी होती, हे अभ्यासण्यासाठी प्रिंसेपने पंजाबवर राज्य करणार्‍या इंडो-ग्रीक राजांच्या नाण्यांचा वापर केला. नाण्यांवर एका बाजूला ग्रीक आणि दुसर्‍या बाजूला खरोस्टीमध्ये राज्यकर्त्यांची नावे होती. सर्व काही व्यवस्थित घडत असताना एक गोष्ट वाईट घडत होती, ती म्हणजे कामाच्या प्रचंड ताणाने प्रिंसेपच्या आरोग्यावर परिणाम होत होता. खराब तब्येत असूनही ते काम करत राहिले परंतु त्यांना प्रकृती खराब झाल्याने उपचारासाठी लंडनला परत जावे लागले. 23 एप्रिल 1840 रोजी वयाच्या 41 व्या वर्षी मेंदूच्या आजाराने जेम्स प्रिन्सेप यांचे निधन झाले. 1843 मध्ये कलकत्त्याच्या नागरिकांनी हुगली नदीच्या काठावर त्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक बांधले, ज्याला आजही ‘प्रिंसेप घाट’ म्हटले जाते.

जेम्स प्रिंसेपचे यांनी देवानाप्रिय सम्राट अशोक कालीन धम्मलिपी चार शोध लावून प्रियदर्शी राजा सम्राट अशोक व भगवान बुद्ध यांच्या ऐतिहासिक घटनांची पुराव्यानिशी माहिती करून दिली. सम्राट अशोक कालीन मृत लिपीस पुनरूजिवन जेम्स प्रिन्सेप यांनी दिले. त्यामुळे सम्राट अशोक कालीन इतिहास व भगवान बुद्ध यांच्या ऐतिहासिक घटनांची पुराव्यानिशी माहिती मिळण्यास मदत झाली. जेम्स प्रिन्सेप यांना  तश्थ वखध बस्त्रश्स्र् वश्झझभ (भिंती वाचणारा माणूस) असे संबोधण्यात आले.

 त्यांनी जे शोधले ते भविष्यातील इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांसाठी एक अमूल्य संशोधन सिद्ध होत आहे. जेम्स प्रिन्सेप यांनी भारताच्या इतिहासाचे संपूर्ण अध्याय उघडले. त्यामुळे सर जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म दिवस 20 ऒगस्ट जागतिक धम्मलिपी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

- राहूल खरे, नाशिक, 9960999363