मुगळी येथील मृतांच्या नातेवाईकांना सरकारी मदतीची अपेक्षा

कागल/प्रतिनिधी-

गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे मागासवर्गीय समाजातील तीन जणांची पोल्ट्रीची भिंत कोसळून दुर्दवी अंत झाला होता. त्यामध्ये अजित अर्जुन कांबळे (वय 48, रा. नांगणूर), संगिता बसाप्पा कांबळे (वय 45) आणि गिरीजा कांबळे यांचा समावेश आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, अजित कांबळे यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे ती माहेरी नांगनूर येथे राहते. गुरुवारी अजित, गिरीजा व त्यांच्या दुसर्‍या भावाची पत्नी संगीता कांबळे हे तिघे गिरीजाच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते. तेथून नांगणूरकडे परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी मुगळीपासून जवळ नूल मार्गावर असलेल्या भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला होता. यावेळी वादळी वार्‍याने पोल्ट्रीची भिंत अचानक कोसळून तिघेही गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना अपघाती असून शासनाने या गरीब कुटुंबातील नातेवाईकांना मदत करावी, अशी अपेक्षा मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.