गेले पाच वर्षात राज्यात एकूण ७२१९ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या: अमोल वेटम


विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रात; लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

वाढती बेरोजगारी, रखडलेल्या परीक्षा व निकाल, भ्रष्टाचार, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, कर्ज यास जबाबदार

सांगली दि.०५: एमएचआरडी, नँशनल क्राईम रेकोर्ड ब्युरो व इतर अहवालानुसार देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रमाण महाराष्ट्र राज्याचे जास्त आहे. या देशात दर तासाला १ विद्यार्थी तर प्रत्येक दिवसाला २८ विद्यार्थी हे आत्महत्या करतात.  प्रत्येक ७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागील  एक विद्यार्थी हा महाराष्ट्रातील असतो. तर दर दिवशी या राज्यात ४ विद्यार्थी आत्महत्या करतात. १५- ३९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे. या राज्यात सन २०१६ रोजी १३५०, सन २०१७ रोजी १४३७ , सन २०१८ रोजी १४४८ , सन २०१९ रोजी १४८७, सन २०२० रोजी १४९७ असे एकूण ७२१९ विद्यार्थ्यानी आत्महत्या केली आहे अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.

नुकतेच एमपीएससी उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही निर्दयी, संवेदनहीन व्यवस्थेने घडवलेला मनुष्यवध आहे, यापूर्वी पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला, डॉ.पायल तडवी यांनी जातीय व्यवस्थेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. स्पर्धा परीक्षाच्या युगात विविध क्लासेसची लागलेली चढाओढ, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, वाढती बेरोजगारी, खासगीकरण, कमी होणारी जॉबची संख्या, स्पर्धा परीक्षा व नोकरीतील भ्रष्टाचार व राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचे कर्ज, शैक्षणिक कर्ज, गरीब परिस्थिती, वाढती वयोमर्यादा व मर्यादित परीक्षेसाठी अटेम्प्ट, रखडलेल्या विविध सरकारी तसेच स्पर्धा परीक्षा व याचे निकाल यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक, शाररीक, आर्थिक दडपण येत आहे, शोषण होत आहे. प्रसंगी ते आत्महत्या सारखे टोकाचे पाउल उचलताना दिसतात. कोणताही लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील आमदार देखील राजकीय पक्षाचे बटिक झाले आहेत ते देखील मुगगिळून गप्प बसलेले आहेत. महाआघाडी सरकारने तत्काळ सर्व विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत पाऊले उचलावीत अन्यथा बेरोजगार तरुणांचा उद्रेक होईल.

एमपीएससी, यूपीएससी हेच एकमेव करिअर आहे असा समज गावातील लोकामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. याकरिता संबंधित पालक, कोचिंग क्लासेस जबाबदार आहेत. परंतु यातील रिक्त जागा केवळ शंभराच्या आकड्यात आहेत यासाठी लाखो विद्यार्थ्या फॉर्म भरतात. विद्यार्थ्यांनी केवळ शासकीय नोकरी अथवा स्पर्धा परीक्षेवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय, शेती आदीबाबत विचार करावा. स्पर्धा परीक्षेच्या निकालामुळे खचू नये ,आपल्या आई वडिलांचा आपणच आधार असल्याने आत्महत्या सारखी टोकाची पाऊले विद्यार्थ्यांनी उचलू नयेत, असे आवाहन अमोल वेटम यांनी केले.