शासन प्रशासनाची दिरंगाई आणि सुपिक मेंदूचा खून ; एमपीएससी परीक्षार्थी स्वप्निल लोणकरची आत्महत्या
शासन प्रशासनाची दिरंगाई आणि सुपिक मेंदूचा खून
एमपीएससी परीक्षार्थी स्वप्निल लोणकरची आत्महत्या
पुणे/वृत्तसंस्था :
एमपीएससी परीक्षार्थी स्वप्निल लोणकर याने दोन दिवसापुर्वी आत्महत्या केली. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणार्या स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झाली नाही त्यामुळे स्वप्निल निराश झाला होता. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज या कारणामुळेच स्वप्निलने हे पाऊल उचलले असावे. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
त्याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्र लिहून आपल्या वेदना मांडल्या आहेत. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, आत्महत्येसाठी कोणतीही व्यक्ती कारणीभूत नाही. एमपीएससी हे मायाजाळ आहे. यात पडू नका असे आवाहनही त्याने केले आहे.
महाराष्ट्राचे काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे. अशा अनेक स्वप्निलचे डोळे या एमपीएससीकडे लागले आहेत. आतातरी सरकार जागे होणार का? आणि अशा अनेक स्वप्निलला न्याय मिळणार का? अशी आशा आता त्यांना लागून राहिली आहे. वय आणि वेळ ही निघून गेल्यावर स्पर्धा परीक्षा देणारा परीक्षार्थी काय करणार? रोजगार नाही, पैसा नाही यातून आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर स्पर्धा परीक्षांचे निकाल, नियुक्त्या करून महाराष्ट्रातील या परीक्षार्थ्यांचे आयुष्य सावरले पाहिजे.
या घटनेनंतर महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा परीक्षार्थ्यांनी आंदोलन केली आहेत. आतातरी सरकार जागे होणार का असा सवाल ते विचारत आहेत?


0 Comments