आषाढ पौर्णिमा म्हणजे धम्म राज्याची मुहूर्तमेढ !


महाकारूणिक तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात व बौद्ध जीवनपद्धतीत पौर्णिमांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सम्यक संबुद्धाच्या 45 वर्षाच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण उल्लेखनीय घटना कोणत्या ना कोणत्या पौर्णिमेस घडलेल्या आहेत. प्रत्येक पौर्णिमा म्हणजे जागतिक बौद्धांचे उत्सव, महोत्सव, सर्व, सण- समारंभाचे परम पवित्र दिवस आहे. हा बौद्धांचा सांस्कृतिक, कला, शिल्प व वांग्मयाचा इतिहास आहे. पौर्णिमेचा दिवस उपोषण व्रताचे सर्वोच्च शिखर आहे. या पौर्णिमेचे आत्यंतिक महत्त्व भगवान बुद्धाच्या जीवनाशी संलग्न महत्त्वाचे प्रसंग ह्या पौर्णिमेला घडले आहेत.

त्यातील चार महत्त्वपूर्ण अशा घटना आहेत. 1) राणी महामायेला पडलेले स्वप्न इ.स.पू.564. 2) सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग (महाभिनिष्क्रमण) इ.स.पू.534. 3) सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खुंची धम्मदीक्षा इ.स.पू.528 4) भिक्खुंचा वर्षावास प्रारंभ इ.स.पू.528. या पौर्णिमेस घडलेल्या इतर घटना खालील प्रमाणे आहेत; 5) राजपुत्र राहुलचा जन्म. 6) तावतिंस येथे भगवंताद्वारे त्यांच्या संबोधिप्राप्ती नंतर सातव्या वर्षी देवांना व स्वतःचा मातेला अभिधम्माच्या उपदेशाची सुरूवात. 7) भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वानंतर तीन महिन्यांनी राजगृह येथे अर्हत महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली पांचशे अर्हत भिक्षूच्या उपस्थितीत भगवान बुद्धाच्या उपदेशांचे संगायन. 8) भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर दोनशे छत्तीस वर्षांनी महाअरिठ्ठ आणि इतर पंचावन्न शिष्यांची उपसंपदा (श्रीलंका). 9)  श्रीलंकेतील मिहिंतले येथील चेतियगिरीत बासष्ट अर्हतांचा प्रथम वर्षावास. 10) रूवनवेली विहाराचा पायाभरणी समारंभ राजा दुटु गेमुनु यांचे हस्ते. (भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तीनशे ब्याऐंशी वर्षांनी) 11) रूवनवली येथील विहारात भगवंताच्या पवित्र अस्थिची स्थापना. 12) भगवान बुद्धाच्या दंत धातुचे श्रीलंकेत आगमन निमित्ताने ‘दलदा पेरहारा’ ची सुरूवात. हा दंत धातु राजकन्या हेममाला आणि राजपुत्र दंतकुमार यांनी भारतातून राजा किर्ती सिरीमेवन यांचे कार्यकाळात आणला होता.

वाराणशीजवळ सारनाथ येथील ऋषीपत्तन मृगदाय वनात भगवान बुद्धाने 2556 वर्षांपूर्वी धम्मचक्र प्रथम गतिमान केले. तो चिरस्मरणीय दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा प्रसंग होता. त्यांचे पाच सन्याशी मित्र - कौडिण्य, भद्दिय, वप्प, महानाम आणि अश्‍वजीत यांना धम्मोपदेश देण्याचा. दोन महिन्यापूर्वीच भगवंताने बोधगया (बुद्धगया)येथे बाधिवृक्षाखाली संबोधि प्राप्त केली होती. हा प्रथम धम्मोपदेश ज्याला ‘धम्मचक्क पवत्तन सुत्त’ या प्रसिद्ध नावाने ओळखले जाते, त्यात चार आर्य सत्य व आर्य अष्टांगिक मार्ग समाविष्ट आहे. या उपदेशाच्या श्रवणाने व साधनेने ते पाच संन्यासी मित्रांचे ज्ञानचक्षू उघडले. सत्याचा साक्षात्कार झाला. ते भगवान बुद्धाचे शिष्य झाले. याप्रमाणे ह्या दिवशी बुद्ध शासन अस्तित्वात आले. धम्मराज्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. ऋषीपत्तनच्या सुपीक भूमीत धम्मबिजाचे रोपन होऊन धम्मवृक्ष बहरू लागला. त्याच्या प्रचंड फांद्या जगात सर्वदूर पसरल्या.

सर्वप्रथम कौन्डीण्य याचे धर्मचक्षू उघडले त्यावेळी देवांनी आणि श्रमणांनी हर्षध्वनी केला. एक विशेष प्रकारची आभा सर्व जगात पसरली. भगवान बुद्धाने स्वतः  चार आर्यसत्यांचे महत्त्व विषद करताना म्हटले आहे की - भिक्खुनो, तुमचे आणि माझे प्रदिर्घ काळपर्यंत जन्म-मृत्युचे फेरे झाले आहेत ते केवळ चार आर्यसत्यांबद्दल असलेल्या अज्ञानामुळे (दिघ निकाय) आम्ही साधारणजन चार आर्यसत्यांच्या अज्ञानामुळे अनेक युगे दुःख भोगत आलो आहोत, जीवनाच्या चिरंतन सत्यांची हळूहळू ओळख करून घेऊन आपण ह्या जीवनात अत्यंत सुखाचे जीवन जगण्यास समर्थ होऊ शकू. ह्या चार चिरंतन सत्यांची उकल करण्याची भगवान बुद्धाची पद्धत एखाद्या अत्यंत निष्णात वैद्यासारखी आहे. भगवान बुद्धाला महाभिषक (महावैद्य) म्हटले जाते. तिक्ष्ण दृष्टीचा शल्यचिकित्सक सुद्धा म्हटले जाते (सल्लकत्तो अनुत्तरो). त्यांनी प्रथम या भयानक रोगाचे निदान केले. ज्या भयानक रोगाने सर्व जगताला ग्रासले आहे. नंतर ह्या रोगाची कारण परंपरा शोधली त्यांनी पाहिले की ही दुर्धर व्याधि दूर करता येऊ शकते आणि शेवटी त्या व्याधिवर उपाय शोधला. ‘दुक्ख’ ही जीवनाची दूर्धर व्याधि होय.

‘तृष्णा’ ही त्या व्याधिचे मूळ आहे. या व्याधिला नष्ट (निरोध) करता येते आणि ह्या व्याधिचे औषध आहे आर्य अष्टांगिक मार्ग. चार आर्य सत्य बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे आणि नीतिमत्तेचे अधिष्ठान आहे. 

पहिले तीन सत्य तात्त्वीक आहेत आणि चौथे सत्य आचरणात्मक आहे. बुद्धिवादी आणि चिंतकांचा समज ‘बुद्धाचे उपदेश केवळ तात्त्वीक आहेत’ याला उपरोक्त मांडणीने तडाखा बसतो. बुद्धाचे उपदेश केवळ तात्त्वीक नाहीत - ते नैतीक व व्यावहारिक आहेत. आचरणात आणण्यासारखे आहेत. जे लोक त्यानुसार वागतील (साधना करून प्रत्यक्ष आचरतील) त्यांचे हृदय प्रकाशाने उजळून निघेल व त्यांना आनंदाचा, सुखाचा लाभ होईल, म्हणून बुद्धाचे उपदेश चमत्कारिक नाहीत, गृहीतकावर आधारित नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवाच्या प्रमाणावर आधारित आहेत. ‘जगातील भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी अवास्तव, अनिवार तृष्णेच्या आहारी जावून आपण दुःख, दौर्मनस्य ओढवून घेत असतो’, असे आपण आपल्या विचारशक्तीला चालना दिल्यास कळून येईल. आपण आपल्या इच्छा जाणिवपूर्वक कमी केल्यास आपण अधिक सुखाचा अनुभव करू. आणि आपण आपल्या इंद्रियजन्य तृष्णांचा समूळ उच्छेद केला तर आपणास अत्यानंदाचा अनुभव येईल. पहिले आर्यसत्य दुःख दर्शविते. ह्या दुःखाचे कारण तृष्णा- हे दुसरे आर्यसत्य. आपण ह्या तृष्णेचा समूळ उच्छेद केला तर दुःखाचा निरोध होईल - हे तिसरे आर्यसत्य. दुःखाच्या निरोधानंतर निर्वाणप्राप्ती. ती कशी प्राप्त होईल? आर्य अष्टांगिक मार्गाच्या पालनाने- चौथे आर्यसत्य धम्मपदातील गाथा क्रमांक 336 म्हणते... 

यो चेतं सहति जम्मिं तण्हं लोके दुरच्चयं। सोका तम्हा पपतन्ति उदबिन्दू व पोक्खरा|| 

जो मनुष्य ह्या निरंतर जन्म घेणार्‍या दुर्जय तृष्णेला जिंकतो, त्याचे सर्व शोक कमळावरून जसे पाणी निघून जाते तसे विरून जातात. बुद्ध, धम्म आणि संघ यांना पवित्र त्रिरत्ने म्हटले जाते. बौद्धांना ते श्रद्धेय, वंदनिय, पूजनिय आहेत. बुद्ध हे एकमेव महान, सर्वोत्तम चिकित्सक आहेत. जीवनाच्या दूर्धर व्याधिंवर भगवंताने खात्रीलायक ‘धम्मरूपी’ औषध दिले आहे. आर्य संघ अशा व्याधिमुक्त लोकांचा गट होय.

- भन्ते अश्‍वजित, औरंगाबाद, 9673292297