आपला माय-बाप कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी की आंबेडकर...!
आपला माय-बाप कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी की आंबेडकर...!
बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके नुसता चाळून आणि आता चाललेल्या राजकारणावर आंबेडकरी चळवळीतील या ना त्या नेत्याची भूमिका कशी अयोग्य आहे याचा प्रचार आणि चळवळीबद्दल नकारात्मक चर्चा करण्याचे काम काही मंडळींकडून सुरू आहे. या सर्वांमध्ये विचारवंतांची भूमिका पार पाडणारा तथाकथित तज्ञ शिक्षित वर्ग. जो कालही आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रेसर नव्हता आणि आजही नाही. परंतू चळवळीबद्दल शंका उपस्थित करण्यात पटाईत असल्याचा पहावयास मिळतो. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर ज्या ताकदीने चळवळ उभी राहिली पाहिजे होती तशी न उभी होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे समाजामध्ये वाढत चाललेली चमचेगिरी. याचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीचा इतिहास पडताळावा लागेल. या चळवळीचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॊ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये करणे. याच नामांतरासाठी शेकडो जणांनी आपल्या जीवाची बाजी लावली, प्रसंगी आपला जीव दिला आणि समाजापुढे चळवळीचा अग्नी अखंड तेवत ठेवला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गळाला लागून त्यावेळच्या काही पुढार्यांनी आपले राजकिय अस्तित्व प्रबळ करण्यासाठीच काँग्रेस राष्ट्रवादीची चमचेगिरी सुरू केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सेटलमेंटमुळे जो राजकीय, सामाजिक दबदबा आंबेडकरी चळवळीचा निर्माण झाला त्यास बगल दिल्याने इथूनच या मनुवादी पक्षांची चमचेगिरी करण्यास सुरूवात झाली. आपली जागृत आणि ज्वलंत झालेली चूल वेगळी न ठेवता ती मोडून काहींनी आपला माय-बाप काँग्रेस, राष्ट्रवादीलाच मानल्याने चळवळीमध्ये फूट फडली. या चालू झालेल्या चमचेगिरीमुळे आज चळवळीची सामाजिक आणि राजकीय ताकद किती आहे याची जाणीव आपणांस आहे.
सध्यस्थितीचा विचार करता आंबेडकरी चळवळ जोमाने आणि निष्ठेने पेलणार्या व्यक्तीस सामाजिक किंवा राजकीय स्तरावर खोटेनाटे, घाणेरडे आरोप करून त्याची बदनामी केली जाते. त्याचे राजकीय अस्तित्व संपवून मनुवादीवृत्तीलाच बळ देण्याचे काम सुरू या चमचेगिरी करणार्या मंडळींकडून सुरू आहे. मुळात बाबासाहेबांनी काँग्रेस (काँग्रेसमधून जन्मलेली राष्ट्रवादी) ही जळते घर आहे त्यांच्या नादी लागू नका हे सांगूनसुध्दा आमचे नेते वर्षानुवर्षे त्यांच्यासोबत राहिले आणि स्वत:चे घर म्हणजे चळवळ जाळून घेतलीसुध्दा ! एकतर केंद्रात सत्तेत असून सामाजिक अत्याचार, अन्याय, जातीयतेचे मुद्दे न मांडता विनोदी कलाकाराची भूमिका अत्यंत उत्तमपणे पार पाडत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस बरोबर असलेले नेते मुग गिळून गप्प आहेत. या सर्वांना समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचाराबाबत काहीही देणे घेणे नाही. या सर्व बाबींकडे बघत असताना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांचा आपल्याच लोकांकडून झालेला मानसिक छळ व भैय्यासाहेबांच्या निर्वाणानंतर आंबेडकर घराण्यावर जिवे मारण्याचा हल्ला करून त्यांना संपविण्याच्या कामात आपल्याच लोकांनी महत्वाची भूमिका बजावली होती हे ही आपणांस माहित असणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळीला वेळोवेळी संपविण्यासाठी काँग्रेस, आर.एस.एस. ने घातलेले खतपाणी विसरण्यासारखी गोष्ट नाही.
एक नवीन सामाजिक आणि राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी या चमचेगिरी करणार्या लोकांना बाजूला काढावे लागेल. बाबासाहेबांचे विचार फक्त वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते अस्तित्वात आणून या मनुवादी व्यवस्थेशी संघर्ष करूनच निष्ठावान व स्वाभिमानी नेतृत्व उभे करावे लागेल. मरगळत पडलेली चळवळ पुन्हा जोमाने उभी करून तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व द्यावे लागेल. कारण आपला मायपण आणि बापपण आंबेडकरच !


0 Comments