करंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात सत्यनारायण पूजा; संविधानाची अवहेलना
करंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात सत्यनारायण पूजा; संविधानाची अवहेलना
प्रशासनाकडून ग्रामपंचायतीवर अद्याप कारवाई नाही; पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रध्देला खतपाणी
हसुर खुर्द/अशोक कांबळे :
ज्या कार्यालयातून जनतेला रहिवाशी, जात, उत्पन्न, भूमिहीन, सातबारा, आठ/अ, दारिद्र्य रेषा, वर्तणूक, घरकर, पाणीपट्टी कर, जन्म-मृत्यू नोंद असे दाखले शासकीय नियम, कायद्या आणि शर्थीच्या अधीन राहून दिले जातात. त्याच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जर बेकायदेशीर पणे बोला सत्यनारायण महाराज की जय....! असे नाद घुम लागले तर..? जाब विचारायचा कोणाला असा प्रश्न निर्माण होतो.
ज्या संविधानाच्या आधारे गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य यांनी पद ग्रहण केली आहेत. ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करुन समाजाने नियम मोडू नयेत, खोट्या अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती पाळू नयेत म्हणून संविधानाच्या कक्षेत राहून कारभार करायचा आहे, त्यांनीच जर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित केले असतील तर..? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधायची असा प्रश्न निर्माण होतो.?
ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या कारभार्याचांचा हा अपमान नाही, तर तो संविधान आणि लोकशाही प्रधान व्यवस्थेचा पराभव आहे असेच म्हणावे लागेल...! ही घटना आहे चंदगड तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतची .... !
श्रावण मासानिमित्य ग्रामपंचायत पदाधिकार्यांनीच गाव शांतीसाठी चक्क सत्यनारायण महाराजाची पूजा आयोजित केली. आणि तीही चक्क ग्रामपंचायत कार्यालयात.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या कार्यक्रमांचे सार्वजनिक ठिकाणी आयोजन करणे..? हे बेकायदेशीर आहे याचे भान न ठेवता सोपस्कार पार पाडले जात असतील तर संविधानिक पदावर अश्या लोकांनीं न थांबलेलेच बरे..! वास्तुशांती, लग्न, नवीन व्यवसायास असो, नाहीतर कोणत्याही शुभ कार्याची सुरवात असो, सत्यनारायण पूजा घालणे अनिवार्य आहे... असा भटजीनी घालून दिलेला नियम आहे. ज्यांनी हे नियम घालून दिलेत बहुतांशी ते आपल्या घरी कधीही सत्यनारायण पूजा करताना दिसत नाहीत. मग इतरांनीच हा नियम का पाळायचा..? असे प्रश्न विज्ञानवादी समाज विचारत आहे. मात्र त्याचे उत्तर कोणीही देत नाही हे आश्चर्य आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो अशी मराठीत म्हण आहे. समाजातील या अंधश्रद्धा कोणत्या थराला जातात. ते नुकतेच कागल तालुक्यातील सोनाळी येथे घडलेल्या घटनेने संपुर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. मूल होत नाही म्हणून दुसर्याच्या मुलाचा बळी द्या..! गावातीलच एका माथेफिरूने कुठल्यातरी देवरूषाच्या/भोंदूबाबाच्या सल्याने मित्राच्या मुलाचा वरद पाटील या सात वर्षाच्या बालकाचा बळी दिला. पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करतीलच. पण समाजाने अंधश्रद्धेकडे दुर्लक्ष केले की घटना कोणत्या थराला जातात हे या दुर्दैवी घटनेवरून दिसून आले आहे. जादूटोणा करणे, मूठ मारणे, करणी करणे, देव उठवून दुसर्यावर घालणे, अंगात येणे, भुताटकी, मुलं होत नाही म्हणून सोळा सोमवार आणि शुक्रवारी उपास-तापास करणे, भोंदूबाबा सांगतील ते नरबळी देण्यासारखे अघोरी उपाय करणे... श्रद्धेच्या नांवावर मांडलेल्या बाजाराकडे समाजाने आतापर्यंत कदाचीत दुर्लक्ष केले ही असेल. मात्र अंधश्रद्धेपायी कोवळ्या बालकाचा बळी जात असेल...? आणि समाज जर डोळे झाकून गप्प बसत असेल...? तर पुढील काळात आपल्याही घरातील वरद बळी जाणार नाही कशावरून..? याचे समाजाने आत्मचिंतन करणे आवश्यक आहे...! शासकीय कार्यालयात देवदेवतांचे फोटो लावण्यास न्यायालयीन आदेशानुसार मनाई असताना चंदगड तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतीने कार्यालयात 1 सप्टेंबर 2021 रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करून, न्यायालयीन आदेशाची, व संविधानाच्या तत्वांची पायमल्ली केली आहे, संबंधित अधिकारी व पदाधिकारी याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन चंदगड तालुका सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने प्रांत अधिकारी, पोलिस निरीक्षक व चंदगड तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांना नुकतेच दिले आहे. घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना खतपाणी मिळणार नाही.


0 Comments