आंबेडकरी राजकारणाचे बदलते संदर्भ
आंबेडकरी राजकारणाचे बदलते संदर्भ
आंबेडकरी राजकारण अत्यंत नव्या वळणावर आलेले आहे. रिपब्लिकन ऐक्य ही भाषा आपण आता बंद करणे गरजेचे आहे. बौद्ध समाज पूर्वी छुप्या पद्धतीने आमिषा पोटी इतर पक्षाला मतदान करीत होता. परंतु आता मात्र तो उघडपणे इतर पक्षांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. काँग्रेसचा बौद्ध, बीजेपीचा बौद्ध, राष्ट्रवादीचा बौद्ध, आरएसएसचा बौद्ध अशा विविध पक्षांमध्ये व संघटनांमध्ये आंबेडकरी समूह कार्यरत आहे. डॊ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हा समूह पोट जातींमध्ये विभागला गेलेला होता. आपापले पोटजाती नुसारच नेते निवडलेले होते. त्याच सर्व नेत्यांना एकत्रित करण्याची भाषा आजपर्यंत आपण करीत आलेलो आहे. रिपब्लिकन ऐक्य होणे असे प्रत्येक सुज्ञ माणसास वाटणे साहजिक असले तरी ते वास्तवात उतरणे कठीणच नाही तर अशक्यच आहे.म्हणून मी रिपब्लिकन ऐक्याला ‘दीपशिखा’ अशी उपमा देत असतो. ही दीपशिखा दिवा धरायला जाते आणि स्वतःच जळून खाक होते, तशीच परिस्थिती रिपब्लिकन ऐक्याची आहे. आपणा सर्वांना ऐक्य म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे ऐक्य हे एकच समीकरण योग्य वाटते. परंतु ते समीकरण आज घडीला अवास्तव आहे. तसा प्रयत्नही करण्यात कोणीही वेळ वाया घालवू नये. त्यामागील कारणे अनेक आहेत. परंतु आपण ही कारणे दुर्लक्षित का करतो हेच कळत नाही. नुकतीच आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याची जी घोषणा केलेली आहे तीसुद्धा वास्तवाला धरून नाही. कारण आनंदराज आंबेडकर साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जागा लढविण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभी करता येणार नाही. ही त्यांची मर्यादा आहे. कारण उमेदवार लढविणे सोपी गोष्ट नाही. मात्र रेखा ठाकूर यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची केलेली घोषणा हा सुद्धा अंतिम निर्णय नसावा. कोल्हापूरच्या संभाजी राजेंबरोबर एका पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट विधान केले की, मी संभाजीराजे यांचे बरोबर राजकारणामध्ये युती करणार आहे. परंतु तसा त्यांनी नवा पक्ष काढला तर त्यांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, इतर डावे पक्ष या सर्वांसोबत मी जायला तयार आहे. परंतु या सर्वांनी मला अस्पृश्य केलेले आहे. मी त्यांच्याशी युती करायला तयार आहे परंतु ते माझे सोबत सन्मानपूर्वक जागा वाटप फॊर्मुला मान्य करून युती करायला तयार नसतात. बीजेपी सोबत मला जायचे नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
आपणा सर्वांना असेही वाटते की, रिपब्लिकन ऐक्य होत नसेल तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांचे बरोबर युती करावी. परंतु ही बाब सुद्धा जागा वाटपाच्या सन्मान जनक नसलेल्या फॊर्म्युल्यावर अडून पडते. आपणास कल्पना असेल की, आज रोजी प्रस्थापित पक्षाचे तिकीट घेण्याचे अलिखित दर कोट्यावधीच्या घरात असावेत. आपण जागा देऊन पैसे कमवायचे सोडून आंबेडकरांना जागा देणे हे प्रस्थापित पक्षांना तोट्याचे वाटते. आमदारकीचा अलिखित आकडा 25 कोटी तर खासदारकीचा आकडा यापेक्षाही जास्त असतो. त्यामुळे निवडणुकांच्या तिकीट वाटपात उभं राहिलेलं अर्थकारण तोट्याकडे नेणे प्रस्थापित पक्षांना परवडत नसावे. म्हणून ते आंबेडकरी पक्षांबरोबर अर्थात प्रकाश आंबेडकरांबरोबर युतीसाठी तयार होत नाहीत. कारण बाळासाहेब जेवढ्या जागा मागतात त्या त्यांना देणे प्रस्थापित पक्षांना तोट्याचे असावे. त्यामुळे ते षडयंत्र करून आंबेडकर यांनी मागितलेल्या जागांचा आकडा हास्यास्पद आहे, अशा अपप्रचाराला निवडणुकीपूर्वीच सुरुवात करतात. मुख्य बाब म्हणजे महाराष्ट्रातील प्रभावशाली असणार्या दोनच जाती संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण करतात. एक जात धर्मांध राजकारणाचा पुरस्कार करते, तर दुसरी जात पुरोगामी राजकारणाचा बुरखा घालते. परंतु हा केवळ दिखावा असतो. या दोन्ही जाती वेळप्रसंगी पुरोगामी आणि प्रतिगामी पक्षामध्ये स्थलांतर करीत असतात. त्या मात्र प्रकाश आंबेडकरांना युतीमध्ये घेत नाहीत, ही वास्तवता आहे.
मागील 2019 च्या निवडणुकीमध्ये खासदारकीसाठी काँग्रेसने तीन तीन वेळेस सातत्याने हरलेल्या 12 जागा प्रकाश आंबेडकर मागूनही काँग्रेसने त्या जागा न देण्यामागे काय कारण असावे, याचा अभ्यास आपण न करता ते देतील तेवढ्या जागांवर आपण युती करावी, असे आपणच आपल्या नेत्यांना मार्गदर्शन करीत असतो. खुला प्रवर्ग याचा अर्थ अमागास असाच चूकीचा घेऊन तिकिटे वाटली जातात. खुले म्हणजे सर्वांसाठी खुले असा अर्थ घेऊन खुल्या जागांवर काँग्रेससारखा पुरोगामी पक्ष व त्याचे समविचारी पक्ष सुद्धा मागास वर्गाला तिकीट देत नाहीत. 52 टक्के ओबीसी आणि 22.5 टक्के अनुसूचित जाती व जमातीला म्हणजे 74.5 टक्के जाती तिकीटअभावी सत्तेपासून गेल्या 75 वर्षांपासून लांब आहेत. प्रकाश आंबेडकर मात्र ही उणीव भरून काढतात व सर्वांना तिकिटे देतात. म्हणून आज पक्ष 40 लाखाचा आकडा पार करू शकला. पूर्वी आपल्या पक्षाचे तिकीट घेण्यातच अस्पृश्यता होती. सर्व जागा खुल्या पण तिकीट कोणच मागत नाही, अशी गट होती. आज प्रकाश आंबेडकर यांचेकडे तिकिटासाठी रांगा लागतात हे आंबेडकरी राजकारणाचे नवे संदर्भ आपण लक्षातच घेत नाही. प्रस्थापित पक्षांच्या बरोबर आपण युती केली तर आपल्या जागा निवडून येऊ शकतात हे सत्य आहे. परंतु प्रस्थापित पक्षांना आंबेडकर नावाचे वावडे आहे की काय, काहीच कळत नाही. त्यामागे फार मोठे राजकारण आहे. त्यांची जात किंवा धर्म यापलीकडे जाऊन जरी विचार केला तरी एक बाब लक्षात येते, ती ही की सध्याचे राजकारण ज्या वळणावर आहे ते वळण प्रकाश आंबेडकर यांना पचनी पडण्यासारखे नाही. या सर्व प्रस्थापित पक्षांचे कार्यकर्ते अंतर्गत एकमेकांशी संबंध ठेवून असतात. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सरकारच्या जागा कवडीमोल किंमतीने नजराना भरून किंवा भाडेपट्टा करून ताब्यात घेणे आणि स्वतःच्या खाजगी कंपन्या काढून भांडवलदार होणे, हेच एक उद्दिष्ट काही निवडक आमदार, खासदार वगळता जवळजवळ सर्वांचे आहे. त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी पक्ष वेगळे असले तरी कार्यकर्ते दोन्हीकडे एकमेकांचे लागेबांधे असणारेच आहेत. आणि त्यांनी आपली जहागिरी आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. त्यासाठी ते साम-दाम-दंड-भेद नीती वापरून भांडवलदारी जपत असतात. परंतु प्रकाश आंबेडकर ही अशी व्यक्ती आहे की त्यांना भांडवलशाही साटेलोटे पटण्यासारखे नाही.ते जागतिकीकरणाला व खाजगीकरणाला विरोध करतात ज्यामुळे आपण पुन्हा गुलामीत आणि नव्या अस्पृश्यतेत जाऊ शकतो. म्हणून ही व्यक्तीच आपल्या युतीमध्ये नको, भलेही आपण निवडणूक हरलो तरी चालेल, असेच प्रस्थापित पक्षांना वाटत आलेले आहे. भरपूर जागा मागितल्या म्हणून आम्ही युती केली नाही, असे सांगणे हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी असते. मुळात प्रकाश आंबेडकर यांचे सोबत त्यांना युती करायचीच नसते. कारण ही व्यक्ती स्वतः खोटेनाटे व्यवहार करणार नाही आणि आपल्यालाही करू देणार नाही, असेच त्यांना वाटत आलेले आहे. कवडीमोल किंमतीत अब्जावधी रुपयाच्या सरकारी जागा लाटण्याची अनेक प्रकरणे सध्या गाजत आहेत. हे आपणास माहीत असेलच याच कारणामुळे त्यांच्यासोबत आंबेडकरांची युती होऊच शकत नाही मग आता अशावेळी रिपब्लिकनांनी राजकारण करणे बंद करावे काय? प्रस्थापित पक्षांचे राजकारण केवळ अर्थ स्वार्थप्रेरित असते. परंतु आंबेडकरी राजकारण हे सातत्याने अन्याय अत्याचाराच्या भोवर्यात कसे बुडवून ठेवण्यात येईल याची काळजी प्रस्थापित पक्षाने पुरेपूर घेतलेली असते.
आपल्याला मोर्चे काढण्यात गुंतवून प्रस्थापित पक्ष मात्र करोडो रुपयाचे व्यवहार पार पाडतात. टेंडर घेतात, टोल नाके घेतात, रग्गड कमावतात. ज्याचा आपल्याला थांगपत्ताही नसतो. प्रस्थापित पक्ष आपल्याला त्यांच्यासोबत सन्मानजनक जागा देऊन युतीत घ्यायला तयारच नसतील तर आपण राजकारण करायचं नाही काय? त्यामुळे आपल्यापुढे पर्याय उरतो तो स्वबळावर निवडणुका लढविण्याचाच. म्हणून आपण रिपब्लिकन ऐक्य करून एकच जात एकत्र न जुळणारी केवळ एकच जात जोडल्यापेक्षा बारा बलुतेदार आणि 18 अलुतेदार जाती घेऊन 40 लाख मतांपर्यंत पोहोचलो. दुर्मिळात दुर्मिळ प्रसंग म्हणून आपण रिपब्लिकन सर्व गट एक करून राजकारण केले तरी 12 लाख मतांच्या पुढे जात नाही. त्यापेक्षा ऐक्यात शक्ती वाया न घालवता 12 लाखाचे 40 लाख मतं करणे चूक की बरोबर याचा विचारवंतांनी विचार करावा आणि मगच प्रकाश आंबेडकर यांना दोष द्यावा. रिपब्लिकन ऐक्य करत आपण बसलो तरी अगदी गाव पातळी वरून सर्व नेत्यांचे कार्यकर्ते समाविष्ट करून कार्यकारण्या घोषित करायला गेलेला निरीक्षक जीवंत बायका-लेकरात जाईल की नाही, याची खात्री नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्र बांधणी प्रक्रियेतच दोन चार निवडणुका निघून जातील. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जरी आपल्याला सहज वाटत असले की ‘रिपब्लिकन ऐक्य व्हावे’, तरी मी नोंदवलेली अडचण कोण लक्षात घेईल? थोडावेळ ऐक्याचा विचारही केला तरी आठवले आणि आंबेडकर यात दोन गटांच्या व्यतिरिक्त राजकारणात तिसरा गट केवळ बीएसपी आहे. जेव्हा रिपब्लिकन ऐक्याचा विषय येतो तेव्हा या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त कवाडे, गवई, फुलझेले, खोब्रागडे व इतर अनेक गट ऐक्यात घुसण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा पक्ष एकदाही राज्य लेवलवर पूर्ण जागा लढविलेला नसतो. ते मात्र सर्वजण प्रकाश आंबेडकर विरोधी गटात एकत्रित येतात आणि ऐक्य आंबेडकर यांच्या नेतृत्वात कसे राहणार नाही याची काळजी घेतात. हीच बाब प्रकाश आंबेडकर यांना मान्य नाही. त्यामुळे ते ऐक्यात येत नाहीत आपण मात्र त्यांना दोष देतो. संपूर्ण आयुष्य ज्यांच्या उमेदवारांना एकूण 50000 सुद्धा मते मिळाली नाही तेही त्यांच्या पक्षाचे केवळ रिपब्लिकन नाव आहे म्हणून ऐक्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि मोठा वाटा मागण्याचा प्रयत्न करतात. हे वाटप पर्याप्तपणे करणे अशक्य असते. छोटेमोठे गट केवळ एकत्र येत नाही तर वेळ प्रसंगी ते सुरक्षा साधने बाळगून असतात आणि प्रकाश आंबेडकरांवर दबाव आणतात त्यामुळे प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यात सहभागी होत नाहीत कारण ती टिकणारे नाही ही वास्तवता त्यांना माहित आहे.
त्यामुळे त्यावर वेळ घालविणे त्यांना व्यर्थ वाटते म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे नेते म्हणतात प्रकाश आंबेडकरांनी ऐक्यामध्ये यावे आम्ही त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहोत. त्यांचेसाठीच प्रकाश आंबेडकरांनी खासकरून वंचित बहुजन आघाडी राजकीय मंच तयार केलेला असून इतर नेत्यांनी त्यामध्ये सामिल व्हायला काय हरकत आहे.ताकदीच्या आंबेडकर नावाला राजकीय बळ देणे अनिवार्य झाले असून त्याशिवाय समाजावरील अन्याय अत्याचाराला वाचा फुटत नाही, हे सत्य आहे. अन्याय करणारे इतके कोट्याधीश झाले की ते कोणत्याही नेत्याला विकत घेऊन केसची फाईल बंद करू शकतात फक्त प्रकाश आंबेडकर हेच एक अपवाद आहेत. प्रकाश आंबेडकरांची भूमिका मांडणार्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा आमचे विचारवंत अंधभक्त म्हणायला लागले. त्यांना वैचारिक समीक्षा करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रकाश आंबेडकरांशिवाय समाज सुरक्षित हक्क उपभोगू शकत नाही हे वास्तव आहे. त्यांच्या कामाच्या शैलीत आपण नक्की बदल सुचवू शकतो.परंतु त्यांची राजकीय भूमिका कालानुरूप आहे.
- प्रा. डॊ.डी.वाय इंगळे, जेधे कॊलेज, पुणे.


0 Comments