डॊ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्त्री मुक्ती चळवळ


महिलांच्या प्रगतीच्या आधारावर समाजाची प्रगती मोजली जावी. -डॊ.बाबासाहेब आंबेडकर.                                     

डॊ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील थोर समाजसुधारक होते महान अर्थतज्ञ, कायदेपंडित, दलिंतांचे कैवारी, राज्य घटनेचे शिल्पकार या बिरुदावलीने त्यांचा गुणगौरव केला जातो. एकोणिसाव्या शतकात भारतात जी स्त्रीवादी चळवळ सुरु झालेली होती या चळवळीत डॊ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे योगदान लक्षणीय ठरते. भारतीय स्त्रियांच्या दास्यमुक्तीच्या अंगाने अनेक विचारवंतांनी समाज सुधारणेच्या समग्र विचारातून अनेक प्रयत्न केले. स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने स्थान मिळवून पुरूष दास्यातून मुक्ती करणारा विचार प्रथम सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मांडला. त्यासाठी त्यांनी भिक्खू संघातील प्रवेश स्त्रियांसाठी मुक्त केला. आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा धर्म, संस्कृती आणि समाज पूर्वीपासून अंगभूत परंपरा, सापत्नभाव या पायावर आधारलेला दिसून येतो. 

19 व्या शतकामध्ये राजाराम मोहन रॊय आणि समाज क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील स्त्रीकडे पाहण्याचा मानवाचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न केला. भारतात सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतील क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे महान कार्य विसाव्या शतकात डॊ.बाबासाहेब आंबेडकर या थोर महामानवाने केलेे. सामाजिक परिवर्तनासाठी प्रथम सामाजिक जाणीव माणसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे, यासाठी समाजामध्ये समतेची आवश्यकता मानली कारण समाजाच्या प्रगतीच्या, विकासाच्या व परिवर्तनशिलतेच्या  मार्गातील मुख्य अडचण म्हणजे समाजातील सर्व प्रकारची विषमता होय. समाजातील याच विषमतेवर घाव घालण्याचे काम महामानव डॊ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.

डॊ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्या, शेतकर्‍यांच्या, कामगारांच्या, रंजल्या- गांजलेल्या बहुजन समाजाच्या उद्धाराकडेच लक्ष दिले नाही तर त्यांनी स्त्रियांचे प्रश्‍नही सोडवण्यासाठी आपली बुध्दिमत्ता व कर्तव्यशक्ती कामी आणण्याचा कसोटीने प्रयत्न केला. भारतीय स्त्री ही समाजाची आधारशिला आहे आपल्या संस्कृतीचे ते अस्सल प्रतिक आहे. नीतिमत्तेचे ते श्रद्धास्थान आहे. त्यांना पुरुषांप्रमाणे समान हक्क, न्याय, प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. स्त्री संबंधीचे डॊ.बाबासाहेब आंबेडकर यांचे केवढे हे निस्सीम प्रेम, उदार मनाची तळमळ व कळकळ होती आपल्या भगिनींनी शिकावे, उच्चवर्णीय स्त्रियांप्रमाने दिसावे, वागावे आणि स्वाभिमानाने जगावे, असे डॊ बाबासाहेब आंबेडकरांना तळमळीने वाटत असे, अशा प्रकारचे विचार स्त्रियांचा स्वाभिमान जागृत होण्यास मार्गदर्शक झाले.

डॊ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्री शिक्षण विषयक कार्याचा विचार करताना स्त्रियांच्या सर्वकष शोषणा विरुध्द धार्मिक पातळी वरचा पहिला विरोध दर्शवून समाजक्रांती करणारा स्त्री स्वातंत्र्याचा पहिला उद्गाता सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि स्त्री स्वातंत्र्याचा महान प्रचारक व खंबीर पुरस्कर्ते महात्मा जोतीराव फुले या दोन गुरूचा आदर्श डॊ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्री शिक्षण विषयक कार्यात निश्‍चितच प्रेरक ठरला आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करुन दया म्हणजे तो बंड करून उठेल, असे डॊ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पण ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषासाठी नाहीत तर स्त्रियांनाही आवश्यक आहेत. ते समजण्यासाठी शिक्षित माणसाची गरज असते. शिक्षणाशिवाय माणसाला स्वतःची ओळख होऊ शकत नाही. शिक्षण हे मानवी जीवनात क्रांती घडवून आणते डॊ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांचे मित्र श्री.जमेदार यांना पत्र लिहितात, त्या पत्रात स्त्री शिक्षणाचे महत्व विषाद करताना बाबासाहेब लिहितात की, मुलांप्रमाणे मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे, ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषासाठी नाहीत तर स्त्रियांनाही आवश्यक आहेत. असे. डॊ बाबासाहेबांचे मत होते. स्त्री शिक्षणाच्या विचारातून त्यांची मुक्ती नक्की आहे. अश्या विचारातून बाबासाहेबांनी स्त्री मुक्तीचा मार्ग दाखविला.

भारतीय स्त्रियांना व्यक्ती स्वातंत्र्य व समान हक्क दिल्याशिवाय त्यांची उन्नती होणे अशक्य आहे. याबद्दल डॊ.बाबासाहेब आंबेडकरांना चांगली जाणीव होती. म्हणून भारतीय राज्यघटनेत त्यांनी सर्व महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य व समान हक्क मिळवून दिले आहेत. या हक्कामुळे स्त्रियांच्या जीवनात ऐतिहासिक क्रांती घडून आली. कारण या देशातील स्त्रिया शासनात व प्रशासनात मोठ्या पदावर आरूढ झालेल्या दिसुन येतात. बाबासाहेबांनी स्त्रीमुक्ती संदर्भात त्यांनी केवळ विचारच मांडले नाहीत तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री पदावर असताना स्त्रियांची स्थिती बदलण्यासाठी त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ याची मांडणी केली. हिंदू कोड बिल हे बाबासाहेबांच्या जीवनाचे ध्येय झाले होते. 1947 पासून सतत 4 वर्ष 1 महिने 26 दिवस त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांचे हिंदू कोड बिलाचे अंतिम उद्दिष्ट स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी हेच होते. परंतू हे बिल संसदेत संपूर्णपणे एकत्रित मान्य न होऊ शकल्याने बाबासाहेबांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आजच्या समाजातील स्त्रियांच्या दर्जातील बदलासाठी आणि त्यांना मुक्त करण्यासाठी केलेली वैचारिकता व कृती हे त्यांच्या कार्याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.

विश्‍वरत्न डॊ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवजातीच्या स्वातंत्र्य मूल्याचे पाईक होते. भारतीय स्त्रियांच्या गुलामगिरीकडे त्यांचे लक्ष होते. सर्वकष स्वातंत्र्याचा विचार करणार्‍या नेत्याला स्त्री स्वातंत्र्याचा विचारही करावा लागतो, भारतीय स्त्री- शुद्रांची दयनीय, गुलामगिरी सारखी अवस्था होण्यास येथील परंपरा, धर्मग्रंथ आणि त्यातील विचार होते. अस्पृश्याबरोबर स्त्रियांची गुलामी व्यक्त करणारा, त्यांचे सर्व मानवी हक्क हिरावून समाजाची विषम रचना निर्माण करणारा प्रातिनिधिक ग्रंथ म्हणजे ‘मनूस्मृती’  होय. विषमता अन्याय समाजरचना नष्ट करण्याचे प्रतिक म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृती दहन करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती  हा लेख बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. यात स्त्रियांच्या भूतकालीन व वर्तमानकालीन स्थितीचे वर्णन करणारा हा लेख मुळातून वाचावा इतका महत्वाचा आहे.

विश्‍वरत्न डॊ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील संपूर्ण स्त्री जातीला त्यांच्या सर्व हक्कांसाठी कायद्याचे प्रभावी शस्त्र त्यांच्या हाती देऊन त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली. व्हॊईसरॊयच्या मंत्रिमंडळात (1942) बाबासाहेब मजूर मंत्री असताना त्यांची स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून त्यांच्या नैसर्गिक भावनांचा विचार करून अशा स्त्री मजुरांसाठी विशेष गोष्टी उपलब्ध करुन दिल्या. कोळसा खाणीत काम करणार्‍या मजूर स्त्रियांच्या गरोदरपणी त्यांच्या आरोग्याच्या सोयी, मनोरंजनाच्या सोयी, कामाच्या वेळा निश्‍चित केल्या. यावरून स्त्रियांच्या भवितव्यासाठी एवढ्या जिव्हाळ्याने विचार करणारे बाबासाहेब हे कदाचित एकमेव असतील. मी स्त्री मुक्तिसाठी व स्त्री उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक संघर्ष जो मी केला आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे ते म्हणतात.